Jump to content

तालिकोटची लढाई

तालिकोटची लढाई किंवा राक्कस-तंगडीची लढाई ही विजयनगरचा सम्राट अलिया रामराया आणि दख्खनमधील पाच मुस्लिम सल्तनतींमध्ये लढली गेलेली लढाई होती. २३ जानेवारी, १५६५ रोजी झालेल्या या लढाईत विजयनगरचा पराभव झाला व दक्षिण भारतात अनर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली.

सध्याच्या कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील तालिकोट या छोट्या शहराजवळ ही लढाई झाली. राक्कसगी आणि तंगडगी गावांच्या मधील माळावर झालेल्या या लढाईत सुलतानांचे ८०,००० सैनिक आणि ३०,००० घोडेस्वार आणि सुमारे ५० तोफात तर विजयनगरकडून १,४०,००० सैनिक, १०,००० घोडेस्वार आणि सुमारे १०० हत्ती लढले. लढाईत विजयनगरची सरशी होत असताना रामरायाचे दोन मुसलमान सरदार त्याच्यावर उलटले. त्यांनी रामरायाला रणांगणात कैद केले व तेथेच त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून विजयनगरचे सैन्य सैरावैरा पळत सुटले व सुलतानांचा विजय झाला. यानंतर अहमदनगरचा निझामशहा, विजापूरचा आदिलशाही, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा यांचे सैन्य विजयनगरची राजधानी हंपीवर चालून गेले व त्या शहराची व आसपासच्या प्रदेशाची त्यांनी अमाप नासधूस केली.