तारक मेहता
तारक मेहता (डिसेंबर, इ.स. १९२९:अहमदाबाद, गुजरात, भारत - १ मार्च, इ.स. २०१७:अहमदाबाद) हे एक गुजराती विनोदी लेखक, नाटककार व सदरलेखक होते. गुजराती भाषेत त्यांनी विनोदी नाटके लिहिलीच, पण देश-विदेशातील अनेक उत्तमोत्तम नाटकेही त्यांनी आवर्जून गुजरातीत आणली. तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय विनोदी मालिकेचे लेखक आहेत.
तारक मेहता | |
---|---|
जन्म | २६ डिसेंबर १९२९ अहमदाबाद |
मृत्यू | १ मार्च, २०१७ (वय ८७) अहमदाबाद |
धर्म | हिंदू |
भाषा | गुजराती |
साहित्य प्रकार | विनोदी लेखक, नाटककार |
प्रसिद्ध साहित्यकृती | दुनियाने उंधा चष्मा |
पुरस्कार | पद्मश्री, इ.स. २०१५ |
शिक्षण
मेहता इ.स. १९४५मध्ये मॅट्रिक झाले. १९५६मध्ये मुंबईतील खालसा महाविद्यालयातून गुजराती विषय घेऊन बी.ए. आणि त्यानंतर १९५८ मध्ये भवन्स महाविद्यालयात त्याच विषयातून त्यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५८ ते ५९ या काळात गुजराती नाट्यमंडळात त्यांनी कार्यकारी मंत्री या पदावर कार्य केले. तारक मेहता हे १९५९ ते ६० मध्ये प्रजातंत्र दैनिकात उपसंपादक होते.
जीवन
त्यांनी १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्ये काम केले. २०१५ मध्ये त्यांना "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साहित्य
महेता तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी दूरचित्रवाणी मालिकेचे लेखक होते. ही मालिका दुनियाने उंधा चष्मा या सदरावर आधारित होती. हे गुजराती भाषेतले सदर पहिल्यांदा चित्रलेखा साप्ताहिकात मार्च १९७१ला प्रसिद्ध झाले, आणि पुढे सलग ४० वर्षे छापून आले. हे सदर समाजात घडणाऱ्या तात्कालिक घटनांवर विविध अंगांनी पाहिल्यावर होणाऱ्या विनोदांवर आधारित होते. तारक मेहता यांची एकूण ८० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतील तीन दिव्य भास्कर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सदर लेखनाची संकलने आहेत, आणि उरलेली तारक मेहता का उल्टा चष्माच्या कथा आहेत. या कथांचे आधी पुस्तकात रूपांतर झाले व नंतर त्यावर तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका झाली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. लिम्का बुकमध्ये या मालिकेची नोंद झाली.
देहदान
तारक मेहता यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले.
काही पुस्तके (एकूण सुमारे ८०)
नवुं आकाश नवुं धरती - ( इ.स. १९६४ )
दुनियाने ऊंधा चष्मा - ( इ.स. १९६५ )
तारक मेहतानी टोळकी परदेसना प्रवासी - ( इ.स. १९६५ )
तारक मेहताना आठ एकाकियो - ( इ.स. १९७८ )
तारक मेहता का उल्टा चष्मा - ( इ.स. १९८१ )
तारक मेहतानो टपुडो - ( इ.स. १९८२ )
ॲक्शन रिप्ले
अलबेलूं अमेरिका वंठेलूं अमेरिका
आ दुनिया पांजरापोळ
कोथळामांथी खिलाडी
चंपकलाल टपूनी जुगलबंदी
बेताज बाटलीबाज पोपटलाल ताराज
पुरस्कार
- गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार
- रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक
- पद्मश्री (इ.स. २०१५)
बाह्य दुवे
- http://archive.indianexpress.com/news/comedy-inc/640054/0
- http://archive.indianexpress.com/news/laughing-away-to-success/652415/0
- https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/writer-taarak-mehta-the-inspiration-behind-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-no-more/articleshow/57405136.cms