तरुण गोगोई
तरुण गोगोई | |
कार्यकाळ १७ मे २००१ – २४ मे २०१६ | |
मागील | प्रफुलकुमार महंत |
---|---|
पुढील | सर्बानंद सोनोवाल |
लोकसभा सदस्य | |
कार्यकाळ १९९८ – २००२ | |
मतदारसंघ | कलियाबोर |
कार्यकाळ १९९१ – १९९६ | |
मतदारसंघ | कलियाबोर |
कार्यकाळ १९७१ – १९८५ | |
मतदारसंघ | जोरहाट |
जन्म | १ एप्रिल, १९३६ जोरहाट, ब्रिटिश भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | डॉली गोगोई |
तरुण गोगोई (आसामी: তৰুণ কুমাৰ গগৈ ; रोमन लिपी: Tarun Kumar Gogoi, एप्रिल १, इ.स. १९३६, २३ नोव्हेंबर २०२०) हे एक भारतीय राजकारणी व आसाम राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी मे २००१ पासून मे २०१६ पर्यंत तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. २०१६ आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले व काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. भाजपचे नेते सर्बानंद सोनोवाल ह्यांनी मुख्यमंत्रीपद हाती घेतले.
राजकीय कारकीर्द
शाळेत असताना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे भाषण ऐकून प्रेरित झालेल्या गोगोई यांनी दहाव्या इयत्तेपासूनच राजकीय रिंगणात पहिली उडी घेतली. यामुळे त्यावर्षी ते नापास झाले. परंतु, पुढच्याच वर्षी पास होऊन ते कॉलेजात गेले. तेथेही त्यांचा राजकीय झंझावात सुरूच होता. ते भारत युवक समाजाच्या आसाम विभागाचे सक्रिय कार्यकर्ते होते. यानंतर ते इ.स. १९६३ मध्ये काँग्रेसमध्ये आले, तेव्हापासून ते गांधी कुटुंबीयांचे खंदे समर्थक आहेत. पक्षात प्रवेश करताच त्यांनी इ.स. १९६८ जोरहात मधील पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला जागा मिळवून दिली, तर इ.स. १९७१ मध्ये ते स्वतः येथील लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले पहिले खासदार ठरले. काँग्रेसच्या तिकिटावर सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून गेले. याचदरम्यान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात इ.स. १९९१ ते इ.स. १९९५ या काळात ते केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रीही होते. पक्षाने वेळोवेळी दिललेली जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारीही काही काळ सांभाळली.
मुख्यमंत्रीपदावरील कार्यकाळ
आसामच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारताना गोगोई यांनी इ.स. २००१ मध्ये राज्याचा विकास आराखडा तयार करून उद्योगजगताच्या मनात आसामाविषयी विश्वास निर्माण केला. याच जोरावर राज्याचा विकास घडवत त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कालखंडात राज्याचे शिलकी बजेट सादर करून दाखवले. विशेषतः अनेक महिन्यांपासून पगार थकलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्यांनी खूष केले. आपल्या राजनैतिक चातुर्याने त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत राज्यातील अनेक दहशतवादी संघटनांना चर्चा करण्यास प्रवृत्त केले. आपल्या कामगिरीने काँग्रेस पक्षाध्यक्षांचा विश्वास संपादला.
पुरस्कार
तरुण गोगोई यांना इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[१]
बाह्य दुवे
- आसाम मुख्यमंत्र्यांचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-01 at the Wayback Machine.
- वैयक्तिक संकेतस्थळ
- ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.