Jump to content

तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारच्या शिक्षण प्रणाली

तंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारच्या शिक्षण प्रणाली

मागील लेखात, तंत्रज्ञानाचा उपयोग परिणामकारक शिक्षणासाठी कसा करायचा हे आपण समजून घेतले. शिक्षणप्रणालीतील आंतरक्रियात्मक नसलेल्या (Non-Interactive) व असलेल्या (Interactive) शैक्षणिक कृतींच्या मिश्रणाप्रमाणे, तंत्रज्ञान आणि शिक्षकांची सांगड घालणे आवश्यक असते हे पण आपण समजून घेतले. ह्या लेखात, तंत्रज्ञानावर आधारित प्रमुख दोन प्रकारच्या शिक्षणप्रणालींची ओळख आपण करून घेणार आहोत.

शिक्षण प्रक्रिया

कुठल्याही शिक्षण प्रक्रियेत, काही शिक्षक आणि अनेक विद्यार्थी विशिष्ट विषयाच्या संदर्भात आपसात माहितीची देवाण घेवाण करत असतात आणि एकमेकांशी संवाद साधत असतात. शिक्षकाला बहुधा बहुतेक विद्यार्थ्याच्या तुलनेत विशिष्ट विषयाच्या संदर्भात जास्त ज्ञान, कौशल्य आणि अनुभव असतो. त्यामुळे शिकविण्याची (Teaching) जबाबदारी नेहमीच शिक्षकावर असते. शिक्षक एकच विषय एकाच वेळी एकाच पद्धतीने अनेक विद्यार्थ्याना जरी शिकवीत असला तरी प्रत्येक विद्यार्थ्यात शिकण्याची (Learning) म्हणजेच ज्ञान निर्मितीची प्रक्रिया मात्र वेगवेगळी व स्वतंत्रपणे होत असते. ह्याचमुळे एकाच वर्गात, जेव्हा काही विद्यार्थी चांगले ज्ञान संपादन करतात तेव्हाच काही विद्यार्थी मात्र, ज्ञान संपादनात मागे राहतात.


शिक्षकामुळे, बहुतेक विद्यार्थ्याचे शिकणे, सहज सोपे आनंददायी आणि वेगाने होते. परंतु, तरीही शिकण्याकरिता शिक्षक आवश्यक नसतो. ह्याचमुळे एखादा एकलव्य कुठल्याही शिक्षकाच्या मदतीशिवाय (पण प्रयत्नपूर्वक) शिकतो. शिक्षक हा शिकण्याकरिता केवळ प्रेरक आणि मार्गदर्शकच असतो. पण शिकण्याची जबाबदारी फक्त विद्यार्थ्यावरच असते. त्याचमुळे, शिकण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यास जगातील सर्वोत्तम शिक्षक देखील शिकवू शकत नाही.


“शिक्षण म्हणजे माहितीचे ज्ञानात रूपांतर” ह्या अर्थाने प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी, जन्म झाल्यापासून ते मृत्यू येईपर्यंत, “प्रत्येक चुकेतून आणि प्रत्येक अनुभवातून” आयुष्यभर शिकतच असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या ह्या युगातही “जीवनभर निरंतर शिक्षण” ही प्रत्येकाची नितांत गरजच झाली आहे.


शिक्षण चक्र


परंतु, आपल्या देशात, वयाच्या ५ ते २२ वर्षांपर्यंत, औपचारिक शिक्षण व्यवस्थेत (जसे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, वगैरे) बहुतेक व्यक्ती प्राधान्याने, त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घेण्यावर प्रयत्न केंद्रित करतात. पण जीवन शिक्षणाची प्रक्रिया मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी आयुष्यभर निरंतर सुरूच राहते.

शिक्षण प्रक्रियेतील मुख्य पाच टप्पे

कुठल्याही शिक्षण प्रक्रियेचे मूलभूत विश्लेषण केल्यास शिक्षण प्रक्रियेतील पाच मुख्य टप्पे आपण वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे ओळखू शकतो.


  • शिकण्याची उद्दिष्टे ठरविणे (Learning Objectives)


  • शिकण्यासाठी आवश्यक माहितीचे आदान प्रदान आणि स्वयं अध्ययन (Delivery of Information and Self-Study)


  • आंतरक्रियात्मक असलेल्या (Interactive) आणि सहयोग (Collaboration) आवश्यक असलेल्या शैक्षणिक कृतींमध्ये सहभाग


  • शिकण्याच्या उद्दिष्टाप्रमाणे मूल्यमापन (Evaluation)


  • शिकण्याच्या उद्दिष्टपूर्ती संदर्भात दिलेले प्रत्याभरण (Feedback)


औपचारिक शिक्षण व्यवस्थेत, विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रक्रियेतील वरील पाचही मुख्य टप्पे, हेतुपूर्वक (intentionally) पूर्ण करण्याची अपेक्षा असते. परंतु, जीवन शिक्षणाच्या निरंतर प्रक्रियेत वरीलपैकी काही टप्पे आपण निर्हेतुकपणे (unintentionally) पूर्ण करीत असतो.


मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, बहुतेक विद्यार्थ्यास माहितीला ज्ञानात उत्क्रान्त करण्यास, म्हणजेच शिकण्याकरिता (Learning), आंतरक्रियात्मक (Interactive) असलेल्या शैक्षणिक कृतींची आणि त्याकरिता शिक्षकाच्या मदतीची आवश्यकता भासते. ह्याच कारणामुळे, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीतसुद्धा मानवी शिक्षक हा नेहमीच अत्यावश्यक असतो.


“शिकण्याच्या उद्दिष्टाप्रमाणे मूल्यमापन (Evaluation)” आणि “शिकण्याच्या उद्दिष्टपूर्ती संदर्भात दिलेले प्रत्याभरण (Feedback)” हे दोन्ही टप्पे शिक्षण प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु विद्यार्थी संख्या वाढल्यास, शिक्षकावर त्याच प्रमाणात कामाचा भार वाढतो. त्यातच अभ्यासक्रम नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे, ह्या महत्त्वाच्या क्रियांवर बहुतेक शिक्षक सहसा फक्त ५ ते १० टक्के वेळ देतात. ह्यामुळे बहुतेक विद्यार्थ्याना ह्या अत्यावश्यक शैक्षणिक सेवा पुरेशा मिळत नाहीत.

आनंददायी सहज शिक्षण

जगातील संशोधनाचे निष्कर्ष हे दर्शवितात की जर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कृतींच्या खालील “२” गटांवर जवळपास सारखा वेळ आणि प्रयत्न दिले तर शिक्षण हे आनंददायी व सहज होते.


  • (१) शिकण्याची उद्दिष्टे ठरविणे (२) शिकण्यासाठी आवश्यक माहितीचे आदान प्रदान व स्वयं अध्ययन


  • (३) आंतरक्रियात्मक असलेल्या आणि सहयोग आवश्यक असलेल्या शैक्षणिक कृतींमध्ये सहभाग (४) शिकण्याच्या उद्दिष्टाप्रमाणे मूल्यमापन (५) शिकण्याच्या उद्दिष्टपूर्ती संदर्भात दिलेले प्रत्याभरण


आनंददायी सहज शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढते. गेल्या काही वर्षांपासून, औपचारिक शिक्षण व्यवस्थेत, वर्गात “मानसिक पातळीवर” (शारीरिक उपस्थिती नव्हे), स्वतःहून (नियम आहे म्हणून नव्हे), उपस्थित विद्यार्थ्यांची खरी संख्या (हजेरीपटावरील नव्हे), कमीच होत आहे. आनंददायी सहज शिक्षणाचा अभाव हे ह्याचे मुख्य कारण असावे.

चिकित्सक प्रतिसादाचा वेळ

शिकण्यासाठी आवश्यक माहितीचे आदान प्रदान व स्वयंअध्ययन झाल्यानंतर त्या विषयासंबंधी “चिकित्सक प्रतिसाद” (Critical Reflection) देता येईल इतकी तयारी होण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला काही किमान वेळ लागतो.


उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्याला लागणारा हा वेळ कमी असतो. कमी क्षमतेच्या विद्यार्थ्याला लागणारा हा वेळ जास्त असतो. परंतु, ह्या कमीतकमी वेळेनंतरच, विद्यार्थी आंतरक्रियात्मक असलेल्या आणि सहयोग आवश्यक असलेल्या शैक्षणिक कृतींमध्ये, उपयुक्त आणि अर्थपूर्ण सहभाग देउन शिकू शकतो.


औपचारिक शिक्षण व्यवस्थेत, व्याखान हे मध्यम क्षमतेचा विद्यार्थी गृहीत धरून दिले जाते. जेव्हा एकाच व्याखानात, शिक्षक खूप संकल्पना, एका पाठोपाठ एक अश्या समजून सांगतो, तेव्हा “कमी क्षमतेच्या” किती विद्यार्थ्यांना चिकित्सक प्रतिसाद देण्याकरिता लागणारा हा किमान वेळ उपलब्ध होतो हा एक प्रश्नच आहे.

समकालिक आणि असमकालिक

समकालिक (Synchronous) शैक्षणिक कृतींमध्ये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी, एकाच वेळी सहभाग घेणे आवश्यक असते. जसे, औपचारिक शिक्षण व्यवस्थेत, शाळा किंवा महाविद्यालयांमधील बहुतेक शैक्षणिक कृती ह्या समकालिक प्रकारच्या असतात.


ह्यात, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा “एकाच वेळी” सहभाग आवश्यक असला तरी, “एकाच जागी” सहभाग आवश्यक नसतो. जसे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीत “चाट” किवा “व्हिडिओ चाट” ह्या कृती देखील समकालिक प्रकारच्याच आहेत. ह्या कृतींमध्ये शिक्षक व विद्यार्थी ह्यांना वेगवेगळ्या स्थळावरून सहभागी होता येते परंतु त्यांना एकाच वेळी सहभागी व्हावे लागते.


असमकालिक (asynchronous) शैक्षणिक कृतींमध्ये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा “एकाच वेळी” सहभाग आवश्यक नसतो. ज्याप्रमाणे औपचारिक शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाने दिलेला गृहपाठ असमकालिक प्रकारची कृती आहे, तसेच तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीत चर्चामंचावर (Discussion Forum) केलेली चर्चा ही देखील असमकालिक प्रकारचीच कृती आहे.


असमकालिक शैक्षणिक कृतींमध्ये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा “एकाच वेळी” सहभाग आवश्यक नसल्यामुळे, प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या क्षमतेनुसार आवश्यक असणारा “चिकित्सक प्रतिसाद देण्याकरिता लागणारा कमीतकमी वेळ” किंवा “नीट अभ्यास करण्याकरिता लागणारा वेळ” उपलब्ध होऊ शकतो. ह्या कारणाने कमी किंवा उच्च क्षमतेच्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना असमकालिक शैक्षणिक कृतींमध्ये व्यवस्थित अर्थपूर्ण सहभाग देता येतो. औपचारिक शिक्षण व्यवस्थेतील बहुतेक समकालिक शैक्षणिक कृतींमध्ये, निदान “कमी क्षमतेच्या” विद्यार्थ्यांना, वरील दोन्ही कालावधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना व्यवस्थित शिकणे कठीण वाटते.


औपचारिक शिक्षण व्यवस्थेत, बहुतेक फक्त समकालिक शैक्षणिक कृतीच असतात. ह्यामुळे, विद्यार्थ्यांच्या क्षमते नुसार आवश्यक असलेला अनुरूप बदल करण्याची लवचीकता, औपचारिक शिक्षण व्यवस्थेत कमी असते.


तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीचे मात्र, समकालिक किंवा असमकालिक किंवा ह्या दोन्ही प्रकारच्या शैक्षणिक कृती वापरून आरेखन (Design) करणे शक्य आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक असलेला अनुरूप बदल करण्याची लवचीकता, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीत जास्त असते.

दोन प्रकारच्या शिक्षण प्रणाली

तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीचे खालील दोन मुख्य प्रकारात वर्गीकरण करता येते.


  • दूरस्थ वर्ग पद्धत : ह्या प्रकारात औपचारिक शिक्षण व्यवस्थेतील वर्गातल्या, मुख्यत: समकालिक शिक्षण प्रक्रियेचे, आभासी (Virtual) जगातील प्रतिरूप, तयार केले जाते. ह्यात “Video Conferencing” किवा “आभासी वर्ग (Virtual Classroom)” ह्या प्रकारच्या समकालिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ह्यामुळे शिक्षकाच्या व्याखानात, जगातील वेगवेगळ्या भागातील अनेक विद्यार्थी, एकाच वेळी सहभागी होतात. एकमेकांशी Audio किवा Video पद्धतीने तात्काळ संवाद साधतात किवा चर्चा करतात. परंतु, ह्यात समकालिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सहभाग घेणे आवश्यक असते. सहसा विद्यार्थ्यांना शिक्षक व्याखान देतो त्याच वेळी सहभाग घ्यावा लागतो. ह्या अर्थाने ही पद्धत शिक्षक-केंद्री (Teacher-Centric) आहे. विद्यार्थ्यांमधले फक्त भौगोलिक अंतर ह्यामुळे दूर होऊ शकते. परंतु एकाच वेळेचे बंधन मात्र तसेच राहते. ह्या पद्धतीत लागणारे उपकरण भरपूर महागडे आहे. त्यामुळे ह्या पद्धतीच्या उभारणीसाठी सुरुवातीला भरपूर भांडवल लागते. पद्धतीच्या यशस्वी आयोजनाकरिता भरपूर पूर्वतयारी आणि चांगले पूर्व नियोजन अत्यावश्यक असते. समकालिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक असलेला अनुरूप बदल करण्याची लवचीकता, दूरस्थ वर्ग पद्धतीत कमी असते. औपचारिक शिक्षण व्यवस्थेतील वर्गातल्या, मुख्यत: समकालिक शिक्षण प्रक्रियेचे, आभासी (Virtual) जगातील प्रतिरूप असल्याने उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची क्षमता दूरस्थ वर्ग पद्धतीत निश्चितच आहे. पण, ह्याच कारणाने दूरस्थ वर्ग पद्धतीत, शिक्षणप्रणालीचे नावीन्य (Innovation) फारच कमी आहे. प्रामुख्याने, USA सारख्या प्रगत देशात दूरस्थ वर्ग पद्धतीचा वापर केला जातो. पण वर नमूद केलेल्या कारणांमुळे, भारतासारख्या प्रगतीशील देशात दूरस्थ वर्ग पद्धतीचे यशस्वी उपयोजन कठीण आणि खूपच खर्चिक आहे.


  • शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती पद्धत: ह्या प्रकारात औपचारिक शिक्षण व्यवस्थेतील वर्गातल्या, मुख्यत: समकालिक शिक्षण प्रक्रियेचे, अनुकरण केले जात नाही. ह्यात प्रामुख्याने “Pre-Recorded Video Lecture” किवा “विकी” ह्या प्रकारच्या असमकालिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ह्यामुळे शिक्षकाच्या व्याखानात, जगातील वेगवेगळ्या भागातील अनेक विद्यार्थी, वेगवेगळ्या, पण त्यांना हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणाहून सहभागी होतात. ह्या अर्थाने ही पद्धत विद्यार्थी-केंद्री (Student-Centric) आहे. शिक्षकाच्या व्याखानात परत परत सहभाग पण ह्यात शक्य आहे. हे सर्वजण एकमेकांशी “चर्चा मंच” किवा “चाट” पद्धतीने संवाद साधतात किवा चर्चा करतात. ह्यात असमकालिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सहभाग घेणे आवश्यक नसते. विद्यार्थ्यांमधील भौगोलिक अंतरासोबत “एकाच वेळेचे” अंतर देखील ह्यामुळे दूर होऊ शकते. ह्या पद्धतीत लागणारे उपकरण खूपच स्वस्त आहे. त्यामुळे ह्या पद्धतीच्या उभारणी करीता अत्यल्प भांडवल सुरुवातीस लागते. अत्यल्प पूर्वतयारी आणि पूर्व नियोजन ह्याच्या यशस्वी आयोजनाकरिता पुरेशी असते. प्रामुख्याने असमकालिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक असलेला अनुरूप बदल करण्याची लवचीकता, “शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती” पद्धतीत जास्त असते. नावीन्यपूर्ण परिणामकारक शिक्षणप्रणालीमुळे, उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची क्षमता “शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती” पद्धतीत निश्चितच आहे. वर नमूद केलेल्या कारणांमुळे, ही पद्धत सर्व जगात लोकप्रिय होत आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशात तर ही पद्धत अतिशय योग्य आणि विशेष उपयुक्त आहे.


ह्या लेखात, आपण शिक्षण प्रक्रिया, शिक्षण चक्र, शिक्षण प्रक्रियेतील ५ मुख्य टप्पे, आनंददायी सहज शिक्षण, चिकित्सक प्रतिसादाचा वेळ, समकालिक आणि असमकालिक शैक्षणिक कृती ह्या सारख्या महत्त्वाच्या संकल्पनांची ओळख करून घेतली. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीच्या “दूरस्थ वर्ग” व “शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती” पद्धतीची आणि त्याच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची पण आपण ओळख करून घेतली. ह्या लेखमालेतील पुढील लेखात, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीच्या हितकारक आणि अहितकारक वैशिष्ट्यांची आणि यशस्वी उदाहरणांची पण आपण ओळख करून घेऊ या.

ह्या लेखमालेची आगळी वेगळी वैशिष्टे

ह्या लेखमालेतील प्रत्येक लेखाचे “Online Version” खालील प्रत्येक संकेतस्थळावर प्रत्येक विद्यार्थ्याकरिता निःशुल्क उपलब्ध असेल:





वरील प्रत्येक संकेतस्थळ प्रत्येक शिक्षकास “Online Class”च्या निर्मितीकरिता पूर्णपणे निःशुल्क मुभा देते. ह्या “Online Version” खालील सुविधा पुरवतील:


  • ह्या लेखाचे पूर्ण शैक्षणिक दृक्‌श्राव्य अनुभव देणारे “SCORM or Video” मधील रूपांतर


  • ह्या लेखासंदर्भात, मी आणि जगातील तुमचे इतर मित्र, यांच्यासोबत विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी आणि आपल्या परखड विचारांसाठी “Discussion Forum” आणि थेट तात्काळ चर्चा करण्यासाठी “Chat Room”


  • स्वतःच्या आकलनाचा अंदाज घेण्याकरीता स्वयंचाचणी आणि इतर खूप काही


एकदा तरी मित्रांसह आवर्जून अनुभव घेण्याची आग्रहाची विनंती.