Jump to content

डेनिस रिची

डेनिस मॅकॲलिस्टेर रिची

जन्मसप्टेंबर ९, १९४१
ब्रॉंक्सव्हिल, न्यू यॉर्क, अमेरिका
मृत्यूऑक्टोबर ८, २०११ (वय ७०)
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्रसंगणकशास्त्र
कार्यसंस्थाल्यूसेंट टेक्नॉलॉजीज
बेल लॅब्ज
ख्यातीसी, युनिक्स अल्ट्रान, बी, बीसीपीएल, मल्टिक्स
पुरस्कारट्युरिंग पारितोषिक, नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी
वडीलमॅकएलिस्टर

डेनिस मॅकॲलिस्टेर रिची ( सप्टेंबर ९, १९४१ - ऑक्टोबर ८, २०११) हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ल्यूसेंट टेक्नॉलॉजीजचे प्रमुख म्हणून सिस्टीम सॉफ्टवेर संशोधन विभागामध्ये २००७ पर्यंत काम करत होते.

पार्श्वभूमी

डेनिस रिचींचा ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क येथे जन्म झाला. भौतिकशास्त्र आणि उपयोजित गणित या विषयात हार्वर्ड विद्यापिठातून पदवि संपादन केल्यानंतर इ.स. १९६७ मध्ये, त्यानी बेल लॅब्जच्या संगणन विज्ञान संशोधन विभागात कार्यारंभ केला.

C आणि युनिक्स

C आज्ञावली परिभाषेचा जनक म्हणून सर्वज्ञात असलेले डेनिस रिची युनिक्स संगणक प्रणालीचे प्रमुख विकासक, आणि Cची गिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सामान्यतः 'K/R' वा K&R म्हणून उल्लेखिलेल्या (लेखक केर्निघन आणि रिची) The C Programming Language, या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.

डेनिस रिची (उजवीकडील) केन थॉम्प्सनबरोबर

रिचींचा Cचा शोध आणि त्यांचा केन थॉम्प्सनच्या जोडीने असलेला युनिक्सच्या विकासातील सहभाग, त्यांना आधुनिक संगणनशास्त्राचा प्रणेता बनवितो. C आज्ञावली परिभाषा आजही उपयोजन आणि संगणक प्रणाली विकासात प्रामुख्याने वापरली जाते आणि तिचा प्रभाव बहुतांश आधुनिक आज्ञावली परिभाषांवर जाणवतो. युनिक्ससुद्धा प्रभावशाली असून, तिने आज प्रस्थापित झालेल्या संगणनशास्त्रातील संकल्पना आणि तत्त्वांचा पाया घातला . लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली आणि तिची साधने रिचीच्या संशोधनाचा परिपाक आहे. विंडोज संगणक प्रणालीमध्ये युनिक्स सहत्वी साधने आणि सॉफ्टवेर विकासकांसाठी C संकलक समाविष्ट असतात.

जरी रिची म्हणत असले की, C परिभाषेची निर्मिती 'चांगल काम असल्यासारख वाटत' आणि त्यांच्या जागी इतर कुणीही त्या वेळी तीच गोष्ट केली असती, तरीही बेल लॅब्जमधील त्यांचे सहकारी आणि सी प्लस प्लस (C++)चे विकासक, जार्न स्ट्रॉस्ट्रप म्हणतात त्याप्रमाणे 'जर डेनिसने ते दशक गूढ गणितच्या अभ्यासात घालवायचे ठरविले असते, तर युनिक्सच्या जन्माला अद्याप अवकाश असता'.

युनिक्सच्या यशानंतर, रिचीने संगणक प्रणाली आणि आज्ञावली परिभाषांमधील आपले संशोधन बेल लॅब्जच्या प्लान ९, इन्फेर्नो संगणक प्रणाली आणि लिंबो आज्ञावली परिभाषा यातील योगदानासह सुरू ठेवले.

पारितोषिके

[[चित्|इवलेसे|250px|थॉम्प्सन, रिची आणि क्लिंटन]]

ट्युरिंग पारितोषिक

इ.स. १९८३ मध्ये, रिची आणि केन थॉम्प्सन याना त्यांच्या प्रजातीय संगणक प्रणाली सिद्धान्तावरील कामासाठी आणि विषेशतः युनिक्स संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी संयुक्तरित्या ट्युरिंग पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. रिचीच्या ट्युरिंग पारितोषिकावेळी दिलेल्या भाषणाचे शीर्षक होते, "Reflections on Software Research."

नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी

एप्रिल २७ इ.स. १९९९ रोजी, थॉम्प्सन आणि रिची याना संयुक्तरित्या इ.स. १९९८ सालच्या नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याना हा सन्मान, त्यांचे युनिक्स संगणक प्रणाली आणि C आज्ञावली परिभाषा यांमधील उल्लेखनीय योगदान संगणक हार्डवेर, सॉफ्टवेर, आणि नेटवर्कींग सिस्टिम्स याना प्रचंड प्रगतिपथावर नेणारे, संपूर्ण उद्योगाच्या वाढिस आणि पर्यायाने माहिती युगात अमेरिकच्या आघाडीस हातभार लावणारे ठरले याबद्दल देण्यात आला.

टोपणनाव

डेनिस रिची बऱ्याचदा "डी एम् आर" (त्यांचा बेल लॅब्जमधील इ-मेल पत्ता) या नावाने ओळखले जातात.

डेनिस रिचीचे लेखन