Jump to content

ट्रॅक्टर


ट्रॅक्टर हे कोणतीही गोष्ट सहजतेने ओढून नेता यावी या साठी बनवले गेलेले वाहन आहे. याचा उपयोग शेती साठी होतो.(कर्षित्र, कर्षक). गाड्यावर घातलेली वा त्यालाच सरळ जोडलेली शेतकामाची व अन्य प्रकारची यंत्रे; तेल, पाणी किंवा अन्य पदार्थ असलेल्या गाड्यांवरील टाक्या; सामान लादलेले चालीत डबे (अनुवाहन, ट्रेलर) वगैरे ओढण्यासाठी वापरावयाचे स्वयंचलित शक्तिसाधन. अचल यंत्रेही ट्रॅक्टर (त्यावरील कप्पी-पट्ट्याच्या मदतीने) चालवू शकतो. ट्रॅक्टर हे केवळ चाके लावलेले एंजिन असते आणि त्यामुळे स्वतः ट्रॅक्टरावर सामान वगैरे काही लादता येत नाही. तरी पण हे विविध प्रकारची कामे करणारे बहुगुणी यंत्र आहे.


ट्रॅक्टर जनावरांऐवजी नुसते ओढण्याचे कामच करीत नाही; तर तो मालसामान भरण्याचे, कणसे-लोंब्या खुडण्याचे, कापण्याचे, फवारा मारण्याचे, झोडण्याचे, थप्प्या लावण्याचे वगैरे माणसांनी करावयाची कामेही करू शकतो. त्याचा सर्वांत जास्त उपयोग शेतीसाठी, पड जमीन नांगराखाली आणण्यासाठी आणि मोठाल्या बांधकामात होतो. भारतात त्याचा प्रसार मुख्यत्वे शेतीसाठी होत आहे.

युरोप खंडातील एक आधुनिक ट्रॅक्टर

इतिहास

किले नावाच्या ब्रिटिश तंत्रज्ञांनी १८७५ मध्ये शेतीची अवजारे (मोठी यंत्रे) ओढण्यासाठी जनावरांऐवजी वाफेच्या एंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टराचा उपयोग केली. त्या वेळी नांगर वगैरे अवजारे ट्रॅक्टराला तारदोरांनी जोडीत असत. ट्रॅक्टराचा जन्म जरी अशा तऱ्हेने इंग्लंडात झाला असला, तरी त्याचा खरा विकास अमेरिकेतच झाला. तेथे विपुल जमीन असल्यामुळे शेती उद्योगाच्या यांत्रिकीकरणाला खुपच वाव होता. अमेरिकेत शेतकामाची यंत्रे, उदा., झोडणी, मळणी, कोळपणी, लाकूड कापणी (शेती उद्योगातील उपांग) करणारी यंत्रे सु. १८५० पासून वापरात येऊ लागली. ती एकाच जागी मालकाच्या शेतात असत. वर उल्लेखिलेला वाफ एंजिनाचा ट्रॅक्टर आल्यावर तो मग घोडे लावून यंत्र असलेल्या ठिकाणी नेण्यात येत असे व ट्रॅक्टराची कप्पी यंत्राच्या कप्पीला पट्ट्याने फिरवी. या पद्धतीचा गव्हाच्या शेतीला अमेरिकेत त्या वेळी फार उपयोग झाला. काही दिवासांनी या ट्रॅक्टराला गाड्यावर बसवण्यात आले व तो ओढून नेण्यासाठी घोडे अनावश्यक झाले. बांधलेले रस्ते किंवा रूळ न लागणाऱ्या ट्रॅक्टरांनी जेव्हा जमीन नांगरण्यात येऊन लागली तेव्हा ‘ट्रॅक्टर’ शब्दाचा जन्म झाला. त्या वेळी ट्रॅक्टराची चाके पोलादाची असत आणि जमिनीत पकड मिळवण्यासाठी त्यांच्या प्रधींवर (कडांवर) कंगोरे ठेवलेले असत (आ. १).


हा ट्रॅक्टर इंधन व पाणी भरण्यासाठी अधून-मधून थांबवावा लागे. नांगराच्या तेरा फाळांपैकी सहा फाळ वापरून हा ट्रॅक्टर ७२ मिनिटांत २.६३ एकर ( १ हेक्टरांपेक्षा किंचित जास्त) जमीन नांगरीत असे. या कामात गुंतलेली माणसे म्हणजे ट्रॅक्टराचा परिचालक, लाकडे आणि पाणी यांच्या पुरवठ्यासाठी एक माणूस व घोडे, एक आगवाला, दोन नांगर परिचालक आणि संशोधकातर्फे एक माणूस (ट्रॅक्टराच्या देखरेखीसाठी) अशी सहा माणसे व काही घोडे असत.


आ. १. पोलादी चाकांचा वाफ एंजिन ट्रॅक्टर (१९११) : ट्रॅक्टर १२ फाळांचा नांगर ओढत आहे.आ. १. पोलादी चाकांचा वाफ एंजिन ट्रॅक्टर (१९११) : ट्रॅक्टर १२ फाळांचा नांगर ओढत आहे.

ट्रॅक्टर हा अंतर्ज्वलन (सिलिंडरातच इंधनाचे ज्वलन होणाऱ्या) एंजिनाचाच असला पाहिजे अशी नंतरच्या काळात श्रद्धा बनली आहे. वाफ ट्रॅक्टर ही एक केवळ सुरुवातीची अल्पकालिक अवस्था होती. १८८९ मध्ये एका वाफ ट्रॅक्टराच्या गाड्यावर द. डकोटा राज्यात, जेव्हा एक एकसिलिंडरी ‘चार्टर’ वायू एंजिन, चार्टर गॅस एंजिन कंपनीने बसवून नव्या तऱ्हेचा ट्रॅक्टर तयार केला तेव्हाच खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर पर्वाला सुरुवात झाली असे मानतात. या कंपनीने असले आणखी सहा ट्रॅक्टर बनिवले. पहिला पेट्रोल एंजिन ट्रॅक्टर जे. आय्. केस थ्रेशिंग मशीन कंपनीने १८९२ मध्ये बनविला. पुढील ७–८ वर्षांत जॉन फ्रोएलिक व जॉन डीअर यांनी अमेरिकेत, नीकोलाउस ओटो यांनी जर्मनीत व तसेच काही तंत्रज्ञांनी इंग्लंडात अंतर्ज्वलन एंजिनाचे ट्रॅक्टर बनविले. ओटो यांनी तर आपले १५ ट्रॅक्टर अमेरिकेत विकले. १९०१ मध्ये सी. डब्ल्यू. हार्ट व सी. एच्. पार यांनी एक मोठ्या तेल-शीतन मंद गती, दोन फेरी आवर्तन एंजिनाचा ट्रॅक्टर बनविला. तसलेच आणखी १५ ट्रॅक्टर त्यांनी १९०३ पर्यंत विकले. ते इतके चांगले होते की, त्यातील निम्मे तरी १९२० पर्यंत चांगले काम देऊ शकले. १९०४ मध्ये बेंजामिन होल्ट यांनी पहिला पेट्रोल एंजिनी साखळीपट्ट्याचा ट्रॅक्टर बनिवला. पट्ट्याला लाकाडाचे ठोकळे बसविलेले होते. यात प्रत्येक पट्ट्याला स्वतंत्र क्लच बसविला होता व त्यामुळे तो वळविणे सोपे झाले. हे तत्त्व साखळीपट्ट्याच्या सर्व वाहनास अजूनही वापरले जाते. अशा तऱ्हेने ट्रॅक्टराचा विकास होत असता १९०६ मध्ये एकदम ११ ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेने ट्रॅक्टर उद्योगाला सुरुवात झाली.


हेन्‍री फोर्ड यांनी १९०६ साली २४ अश्वशक्तीचे (अश.चे) चार सिलिंडरी अभे मोटारगाड्यांचे पेट्रोल एंजिन व ग्रहमाली प्रेषण व्यवस्था वापरून एक प्रयोगिक ट्रॅक्टर बनविला. या रचनेने पूर्वीच्या भारी वजनाच्या ट्रॅक्टरांचे पर्व संपून नव्या हलक्या ट्रॅक्टरांचे पर्व सुरू झाले. यानंतर ट्रॅक्टरांच्या बांधणीत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालूच होते. फोर्ड कंपनीने १९१७ मध्ये एंजिन, प्रेषण चक्रमाला, अंतिम मळसूत्री (वर्म) चालक ही सर्व बिडाच्या एकाच पेटीत बसविली. दंतचक्रे तेलात बुडविलेली होती. तसेच एंजिनाला लागणारी हवा एका मोठ्या ओल्या कपडाच्या गाळणीतून पुरविलेली होती. त्याला खालची चौकट अशी नव्हतीच. या ट्रॅक्टरला ‘फोर्डसन’ असे नाव देण्यात आले होते. हा ट्रॅक्टर लोकांना एकदम पसंत पडून त्याचा मोठा खप झाला व पुढील दशकात ट्रॅक्टरबांधणीसाठी तो प्रमाण मानला गेला. १९१८ हे साल अमेरिकेचे पहिल्या महायुद्धात असल्याचे दुसरे वर्ष होते आणि त्यावर्षी तेथे शेतमजुरांचा भयंकर तुटवडा जाणवू लागला. यामुळे ट्रॅक्टर उत्पदनाला जोर आला. उत्पादनाच्या नव्या सोप्या पद्धती, बांधणीत सुधारणा यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. मोटारगाडी उद्योगातील जोडणी-साखळी पद्धत ट्रॅक्टरांसाठी वापरण्यास सुरुवात झाली. तसेच अभिकल्पात आणि बांधणीत सुधारणा होऊन ट्रॅक्टराच्या मागच्या बाजूने स्वतंत्र्य रीत्या एंजिनचलित्र फिरत्या दंडाच्या रूपाने शक्तिग्रहणाची प्रथमच सोय करण्यात आली. यामुळे मागे जोडलेली अवजारे, उदा., गवत कापणीची, बांधणीची, ट्रॅक्टराच्या पुढे जाण्याच्या कमी-जास्त वेगावर परिणाम न होता एका कायम वेगाने एंजिनानेच चालवणे शक्य झाले. ही व्यवस्था इतकी महत्त्वाची होती की, ती त्यानंतर सर्व ट्रॅक्टरांत आवश्यक गोष्ट ठरून गेली. या आधी या यंत्रांचे चालन त्यांच्या चक्रांनी म्हणजे ट्रॅक्टराच्या गतीने होत असे व ते अर्थातच ट्रॅक्टराच्या वेगांवर अवलंबून असे. यानंतरची मोठी महत्त्वाची घटना म्हणजे १९३१–३२ साली ट्रॅक्टरांकरिता पोलादी धावांच्या लोखंडी चाकांच्या जागी रबरी हवेचे टायर वापरण्यास सुरुवात झाली. प्रथम हे टायर गोल छेदाचे होते पण पुढे त्यांची उंची कमी करून रुंदी वाढविण्यात आली. तसेच त्यातील हवेचा दाब ०.८ ते १.४ किग्रॅ./सेंमी.२ इतका कमी ठेवण्यात येऊ लागला. टायरवर पावले (ट्रेडिंग) व मोठ्या पण दूरदूर असलेल्या सोंगट्या ठेवण्याची पद्धत आली. या गोष्टींमुळे या धावांचा परिघर्षण रोध कमी झाला. जमिनीवरील पकड वाढली व त्यामुळे कार्योपयोगी शक्तीत व परिणामतः ट्रॅक्टराच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. एंजिनाच्या बाबतीत वाफ एंजिन, वायू (कोळशाचा वा नैसर्गिक म्हणजे खनिज) एंजिन, केरोसीन एंजिन, पेट्रोल एंजिन आणि शेवटी आपले स्थान अजूनही टिकवून असलेले डीझेल एंजिन असे त्याच्या विकासातील टप्पे पडतात. सुरुवातीच्या वाफ एंजिनाच्या व लोखंडी चाकांच्या ट्रॅक्टराचे वजन सु. ९ टन असे ते सध्याच्या चार चाकी रबरी हवाई टायरांच्या प्रमाणित ट्रॅक्टराचे सु. १.५ टन किंवा कमीही इतके कमी झाले आहे. ट्रॅक्टराची अश्वशक्ती ३०–४० वरून आता (मोठ्यांची) १२०–१५० पर्यंत गेली आहे.

कार्य

हे डीझेल या इंधनावर चालते. यासाठी डीझेल इंजिन वापरले जाते.

30एचपी

वापराचा दांडा जोडलेला आहे