Jump to content

झुल्फिकार अली भुट्टो

झुल्फिकार अली भुट्टो

झुल्फिकार अली भुट्टो (सिंधी: ذوالفقار علي ڀُٽو ; उर्दू: ذوالفقار علی بھٹو ; रोमन लिपी: Zulfikar Ali Bhutto ;) (जानेवारी ५, इ.स. १९२८ - एप्रिल ४, इ.स. १९७९) हा पाकिस्तानी राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्या बेनझीर भुट्टो हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.

बालपण व शिक्षण

झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील श्रीमंत जमीनदार घराण्यातून होते. त्यांचा आयुष्याचा सुरुवातीचा काळ भारतातच गेला. भुट्टोंचे वडील तत्कालीन जुनागड संस्थानाचे दिवाण होते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानाशी संधान साधले. तसे सल्ले त्यांनी नवाबाला ही दिले. याची कुणकुण लागल्यावर भारताने पोलीस कारवाईचा ताकीद दिली. जुनागडाचा नवाब पाकिस्तानात पळून गेला. पण याचा विपरीत परिणाम झुल्फिकार अली भुट्टोंच्या भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अर्जावर झाला. त्यांची भारतीय बनण्याची तीव्र इच्छा होती. पुढे १९५७ मध्ये पाकिस्तानी सरकारात मंत्री पद मिळाल्यावर त्यांनी भारताच्या सर्वोच्य न्यायालयात असणारा आपला नागरिकत्वाचा अर्ज मागे घेतला. फाळणीपुर्वीचे त्यांचे शिक्षण भारतात मुंबई येथे झाले. फाळणीनंतर ते १९४७ साली उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. पुढे १९५० साली ते लंडनला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले. तेथुन ते पुन्हा भारतात परतले. पण त्यांचे वडील त्यापूर्वीच पाकिस्तान गेले होते. भारताचे नागरिकत्व ही मिळ्णे धुसर होते. अशात ते पाकिस्तानात वडिलांकडे गेले. तेथे त्यांनी घराण्याच्या व्यवसायात लक्ष घातले. तसेच सिंध विद्दयापिठात नोकरी पत्करली.

राजकारण

पाकिस्तानात त्यांची ओळख राजकारणी वर्तुळाशी झाली. उच्चशिक्षित असल्याने बुद्धिवादी वर्गासोबतही त्यांची उठबस होती. १९५७ साली त्यांना संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. येथुन राजकारणातल्या पायऱ्या भुट्टो वेगाने चढले. पाकिस्तान लष्करशहा अयुब खान यांची सत्ता आली होती. त्यांच्या सरकारात भुट्टोंना मंत्री पद मिळाले. अयुब खानांची मर्जी त्यांनी लवकर संपादन केली. १९६२ साली त्यांना परराष्ट्रमंत्री पदी बढती मिळाली. सुरवतीला त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेच्या प्रभावातुन दुर ठेवण्याची भूमिका घेतली. १९६२ च्या भारत - चीन युद्धात अमेरिकेने भारताला मदत केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेवर टिका केली. यांनंतर त्यांनी चीन शी मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याची भूमिका घेतली. अयुब खानंच्या सोबत चीन दौऱ्यावर असतांना त्यांनी सैनिकी मदत मिळावणारे करार केले. तशात १९६३ साली त्यांनी चीन सोबत सीमा करार करतांना ७५० चौ. कि मीचा पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश चीनच्या ताब्यात दिला.

पंतप्रधान पद

इ.स. १९७१ साली बांगला मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अश्या आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. इ.स. १९७४ सालातल्या भारताच्या अणुचाचण्यांनंतर त्यांनी पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामी देशांना लक्षून इस्लामी बॉंब या संकल्पना मांडली. याच इस्लामी बॉंबनिर्मितीसाठी त्यांनी लिबिया व सौदी अरेबिया इत्यादी देशांकडून बरेच अर्थसहाय्य मिळवले व आवश्यक तंत्रज्ञान कमवण्यासाठी विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले [ संदर्भ हवा ].

अखेरचा काळ

पुढे इस्लामी कट्टरपंथी आणि महत्त्वाकांक्षी लष्करशाहीच्या कचाट्यात ते सापडले. शरिया लागू करण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दडपण वाढू लागले. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पद्धतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसदलांशिवाय पंतप्रधानांच्या आधिपत्याखालील स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात एकत्र येत व्यापक आंदोलन पुकारले. त्यातच इ.स. १९७७ सालातल्या निवडणुकींत घोटाळ्याचे आरोप झाले. सुरुवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देणाऱ्या भुट्टोंनी अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचे निमित्त करून जनरल झिया उल हक यांनी लष्करी उठाव केला. भुट्टोंना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेवून खटले चालवण्यात आले. त्यांच्यासह आणखी ४ सहकाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कमी करावी किंवा अमलात न यावी यासाठी मोठा आंतरराष्ट्रीय दबाव आला. तरीही झिया उल हकांनी इ.स. १९७९ साली झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवले.

संदर्भ

  • पाकिस्तान अस्मितेच्या शोधात; ले.: प्रतिभा रानडे

बाह्य दुवे