Jump to content

झां आनुईय

एक अर्वाचीन फ्रेंच नाटककार होत. त्यांचा जन्म बॉर्दो येथे झाला. लुई जुव्हे या प्रसिद्ध प्रयोगशील नाट्यनिर्मात्याकडे सचिव या नात्याने काम करताना नवीन नाट्यप्रयोगांचे निरीक्षण करण्याची व नाट्यतंत्राचा अभ्यास करण्याची त्याला संधी मिळाली. ð इऱ्हीरोदूच्या Siegfried या नाटकाने आनुईयला नाट्यलेखानाची प्रेरणा दिली. L’Ermine (१९३२) हे आनुईयचे पहिले यशस्वी नाटक. त्याच्या नाटकांवर म्यूसे, मारीव्हो, तसेच शॉ व पीरांदेल्लो यांच्या नाटकांची छाप दिसते.

आनुईयने आपली नाटके समर्पक शीर्षके देऊन चार विभागांत संकलित केली आहेत :

  1. आनंदपर्यवसायी किंवा ‘गुलाबी’  नाटके
  2. दुःखपर्यवसायी किंवा ‘काळी’ नाटके
  3. संमिश्र, झगमगीत नाटके
  4. कटुभीषण नाटके

यांपैकीVoyageur sans bagages (१९३७), La Sauvage (१९३८), Eurydice (१९४१), Antigone (१९४४) आणि Ardele (१९४८) ही काही प्रमुख नाटके होत.

मानवी स्वभावातील विसंगती आणि परस्परविरोधी प्रवृत्ती आनुईयने अतिशय प्रभावीपणे रेखाटल्या आहेत. आनुईयच्या मते सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक भिन्नता प्रेमपूर्तीच्या व सुखाच्या आड येते (La Sauvage). प्रौढ माणसांच्या व्यवहारी, दांभिक, मतलबी व खोट्या जगात तरुणांच्या निखळ आवेगाला व आदर्श मूल्यांना वाव नाही शुद्ध प्रेमाला मृत्यूशिवाय अन्य पर्याय राहत नाही (Ardele). सुख माणसाच्या अधःपाताला कारणीभूत होते, हे जाणून ‘आंतिगॉन’ ने सुखासाठी तडजोडीवर आधारलेले मानवी जीवनच नाकारले आहे. स्वातंत्र्याचे आश्वासन देऊ शकेल, अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे मृत्यू. जर्मन आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आनुईयचा प्रतीकवाद अधिक उठून दिसतो. काव्यमय भाषाशैली, कल्पनाविलास, नर्मविनोद हे सर्व जमेस धरूनसुद्धा आनुईयच्या नाटकांवर गाढ नैराश्याची स्पष्ट झाक दिसते.

आनुईयच्या हल्लीच्या नाटकांपैकी झ्यान दार्कच्या जीवनावर आधारित L’Alouette (१९५३), Becket ou 1′ honneurde Dieu (१९५९), La Grotte (१९६१) या नाटकांचा उल्लेख करावा लागेल. समर्थ आशय व अत्यंत परिणामकारक नाट्यतंत्राचा वापर करूनसुद्धा भावनिक एकात्मतेच्या अभावी व उपरोधिक व छद्मी भाषाशैलीच्या हव्यासामुळे आनुईयची नाटके शोकात्मिकेची उंची गाठू शकत नाहीत. या लेखकाची बहुसंख्य नाटके अन्य भाषांतून अनुवादित झाली आहेत.