झर्झर
झर्झर हे चर्मवाद्य असून त्याचा आकार ढोलासारखा असतो. या वाद्याचे विशेष वर्णन 'तट्टीकासार सुंदरी' या ग्रंथात आहे. झलरी, झल्ली, झल्लकी अशी या वाद्याची अन्यही नावे आहेत. डॉ. वासुदेव शरण अग्रवाल यांच्या मते झर्झर म्हणजेच आधुनिक झांज होय. हे वाद्य वाजविणाऱ्याला 'झार्झरिक' असे म्हणत. याचा उल्लेख अष्टाध्यायीत आहे.
भरहूत येथील स्तूपावरील एका शिल्पपट्ट्यातील वादकवृंदात एक झार्झरिक (झर्झर वाजविणारा) कोरलेला आहे. यातून त्या वाद्याचे आणि त्याकाळातील वाद्य वाजविणाऱ्याचे महत्त्व प्रतित होते. या वाद्याची माहिती देवेंद्रकुमार पाटील यांच्या 'कल्चलर हिस्ट्री फ्रॉम दि वायू पुराण' (१९४६) या पुस्तकात सापडते. तसेच त्याचा उल्लेख काही प्रमाणात वासुदेवशरण अग्रवाल यांच्या 'पाणिनीकालीन भारतवर्ष' (१९५५) या ग्रंथातही सापडतो.