झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय
झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय हे भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराजवळ स्थित संग्रहालय आहे.[१]
वैशिष्ट्य
श्री.अजित गाडगीळ यांनी संकलित केलेल्या विविध प्राचीन वस्तूंचे, समकालीन चित्रांचे आणि छायाचित्रांचे दर्शन घडविणारे हे संग्रहालय आहे.[२]या संग्रहालयात दहा कलादालने आहेत. या दालनात ठेवलेल्या वस्तू अथवा चित्रे ही नेहमी बदलत राहतील अशी रचना येथे केली गेली आहे ज्यायोगे भेट द्यावयास आलेल्या सदस्यांना प्रत्येक भेटीत नवीन माहिती मिळू शकेल.[३]
दालने
या संग्रहालयात एकूण १० कला दालने आहेत. यामध्ये चित्रकला विभागात राजा रवी वर्मा यांची चित्रे आहेत. त्याच जोडीने रवींद्रनाथ टागोर, बद्री नारायण,अतुल दोडिया,के. लक्ष्मा गौड अशा विविध चित्रकारांची जलरंगातील चित्रे तसेच रेखाचित्रे आहेत. बी. प्रभा यांसारख्या शिल्पकारांनी तयार केलेल्या शिल्पाकृती सुद्धा येथे मांडलेल्या आहेत. वस्त्र दालनात प्रामुख्याने पैठणी साडीचे १८ आणि १९ व्या शतकातील विशिष्ट नमुने आणि पितांबर या वस्त्र प्रकाराचे नमुने मांडलेले आहेत.प्राचीन नाणी, प्राचीन दिवे, विविध अलंकार, सोन्या-चांदीचे दागिने आणि पानदान,शिल्पकारांनी विविध नमुने पहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील काडेपेटीचे नमुने, पत्र्याचे विविध आकाराचे आणि चित्रांचे डबे, ग्रामोफोन, रेल्वे स्थानकावर वापरले जाणारे विविध कंदील अशा प्रकारच्या जुन्या आणि नव्या वस्तूंचे प्रदर्शन येथे पहायला मिळते. पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांचा हा उपक्रम असल्याने सोने या धातूपासून दागिने तयार करण्याची प्रक्रिया छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविली गेली आहे.
अन्य उपक्रम
झपूर्झा संग्रहालय येथे विविध विषयांशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. चित्रपट, नाट्य, संगीत इत्यादी विषयांचे कार्यक्रम येथे नियमित स्वरूपात होतात. यासाठी येथे २०० लोकांची आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह आहे. सुमारे ६०० प्रेक्षक बसू शकतील असे खुले आंफी थिएटर येथे आहे. हस्तकला, नृत्य, कुंभारकला अशा विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या छोट्या कार्यशाळा येथे होतात त्याचा लाभ नागरिक घेतात.[१]
चित्रदालन
- झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय येथील आगपेटी वेष्टने प्रदर्शन
- झपूर्झा कला आणि संस्कृती ग्रहालय अलंकार दालन
- झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय वस्रदालनातील पितांबर विषयक प्रदर्शन
- झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय याचे बाहेरच्या भागातील सुशोभीकरण
संदर्भ
- ^ a b "पुण्यात साकारले गेले 'झपूर्झा' कला व संस्कृतीचे संग्रहालय, १९ मे रोजी उद्घाटन". eSakal - Marathi Newspaper. 2022-09-15 रोजी पाहिले.
- ^ "The mushrooming of contemporary museums". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 2022-09-10. 2022-09-13 रोजी पाहिले.
- ^ "'पीएनजी'च्या अजित गाडगीळ यांचे 'झपूर्झा': एक इनोव्हेटिव्ह 'आर्ट डेस्टिनेशन'". www.mahamtb.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-12 रोजी पाहिले.