ज्युथिका रॉय
ज्युथिका रॉय (नामभेद - ज्युथिका राय. ज्युथिका रे; आमटा (हावरा जिल्हा), २० एप्रिल १९२०; - ६ फेब्रुवारी २०१४) या एक बंगाली गायिका होत्या. त्यांनी हिंदीत गायलेली मीराबाईची भजने एकेकाळी अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी दोन्ही भाषांत मिळून एकूण ३४० गाणी गायली.
वयाच्या सातव्या वर्षीच गाऊ लागलेल्या ज्युथिका रॉय यांच्या गाण्यांच्या, वयाच्या १२व्या वर्षीच ध्वनिमुद्रिका निघू लागल्या. त्यांचे गाणे आणि त्यांचा आवाज ऐकून त्या काळचे प्रसिद्ध कवी काझी नझरूल आणि संगीत दिग्दर्शक कमल दासगुप्ता हे दोघेही प्रभावित झाले, आणि त्यांनी ज्युथिका रे यांना हवी ती मदत देऊ केली. १९४० आणि १९५० च्या दशकांत ज्युथिका रॉय यांनी गायलेली मीराबाईंची ध्वनिमुद्रित गाणी लोकांना इतकी आवडली, की लोक त्यांना आधुनिक मीरा म्हणून ओळखू लागले. त्यांच्या भक्तिगीतांसाठी त्यांना भारतभरांतील शहरांमधून सतत आमंत्रणे येऊ लागली..
१५ ऑगस्ट १९४७ या भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंडित नेहरूंनी ज्युथिकाबाईंना एक खास विनंती केली. ती अशी की, जोपर्यंत नेहरू लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवत नाहीत तोपर्यंत, ज्युथिका रे यांनी रेडियोवर आपली गाणी चालूच ठेवावीत. त्या दिवशी त्यांची रेडियोवर एकापाठोपाठ एक अशी सातआठ गाणी झाली.
महात्मा गांधी त्यांची दैनंदिन भजनसभा सुरू होण्यापूर्वी ज्युथिका रॉय यांच्या गाण्याची ध्वनिमिद्रिका आवर्जून लावत असत. .
ज्युथिका रॉय यांनी ’धूलि’ आणि ’रत्नदीप’ या बंगाली चित्रपटांत पार्श्वगायन केले होते. या चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्याही निघाल्या होत्या.
ज्युथिका राय यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गाणी
- आज मेरे घर प्रीतम आये
- कन्हैया पे
- कब आओगे क्रिशन मुरारी
- घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे
- चारों फेलियो धीरे
- चुपके चुपके बोल मैना
- जोगी मत जा मत जा
- तुलसी मीरा सूर कबीर
- नाचुंगी मैं तो गिरिधर आगे
- पद घुंगरु बांध मिरा नाची रे
- पिया इतनी बिनती सुनो मोरी
- बसो मेरे नैननमें नंदलाल (सहगायक कमल दासगुप्ता)
- मन चाकर राखो जी
- मीरा लागो रंग हरी
- मेरी वीणा रो रही है
- मैं तो प्रेम दिवानी मेरा दर्द न जाने कोय
- सोने का हिंदुस्तान (१५ ऑगस्ट १९४७ रोजी गायलेले गीत)
पुरस्कार
१९७२साली, ज्युथिका राय यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Legendary bhajan singer Juthika Roy dead" (इंग्रजी भाषेत). फर्स्टपोस्ट. ७ फेब्रुवारी २०१४. ९ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ज्युथिका रॉय चे पान (इंग्लिश मजकूर)