ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही पुण्यातील सदाशिव पेठेतील एक माध्यमिक शाळा आहे. ही शाळा डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ अप्पा पेंडसे ह्यांनी सुरू केली. ही शाळा CBSEच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देते.
ह्या शाळेत ५वी ते १०वी या इयत्ता आहेत. प्रत्येक इयत्तेत मुले व मुली अश्या दोन तुकड्या व प्रत्येक तुकडीत ४० मुले असतात.. शाळेत इंग्रजी, हिंदी, मराठी व संस्कृत ह्या चार भाषा आहेत. गणित, समाजशास्त्र व शास्त्र हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविले जातात. शाळेत दर आठवड्यातील शुक्रवारी एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्ट्य गट यांसारखे प्रकल्प असतात. याचबरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हराळी इत्यादी ठिकाणीही प्रशाला चालतात.
गणवेश
प्रबोधिनीतील मुलांचा गणवेश गुलाबी रंगाचा गुडघ्यापर्यंत उंचीचा झब्बा, पांढऱ्या रंगाची सलवार व डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा आहे; तर मुलींचा गणवेश आकाशी कुर्ता, पांढरी सलवार व पांढरी ओढणी असा आहे. हा गणवेश मुलांना आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी तसेच काही खास कार्यक्रमांना घालून यावा लागतो. इतर दिवशी मुले कोणतेही साधे नेहमीचे कपडे (कॅज्युअल्स्) घालू शकतात मात्र ७वीपासून मुलींना भारतीय कपडे (उदा. पंजाबी ड्रेस) व ९वीपासून मुलांना फुलपॅंट घालणे बंधनकारक आहे.
प्रवेश
ज्ञान प्रबोधिनीत (पुणे) प्रवेश हा ५वीत दिला जातो. त्यासाठी दोन टप्प्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. पहिला टप्पा हा लेखी असतो. ह्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र होतात. दुसरा टप्पा हा लेखी असतोच, तसेच विद्यार्थ्यांची मुलाखतही घेतली जाते. त्यातून अंतिम ४० मुलांचा व ४० मुलींचा अशा ८० जणांचा प्रवेश निश्चित केला जातो. ह्या परीक्षेची रूपरेषा ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिकेने निश्चित केलेली असते.
क्रीडा प्रकार
ज्ञान प्रबोधिनी मध्ये शाळा सुटल्यानंतर मुले-मुली दलावर जातात. मुलांचे दल युवक विभागाकडून तर मुलींचे दल युवती विभागाकडून चालवले जाते. शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे दलावर मार्गदर्शक म्हणून काम करतात. दलाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची जबाबदारी या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींवरच असते. उदा. मुलामुलींना एखाद्या सहलीसाठी घेऊन जाणे, एखादे शिबीर घेणे, गणेशोत्सवातील सुप्रसिद्ध 'बरचीनृत्या'चा सराव करून घेणे, त्याचबरोबर रोजच्या खेळण्यासाठी मैदाने निवडणे, तिथली व्यवस्था बघणे, इत्यादी.
बाह्य दुवे
- ज्ञान प्रबोधिनी Archived 2017-05-11 at the Wayback Machine.
- गप्पा, एक मुक्तपीठ Archived 2011-03-05 at the Wayback Machine.
- ज्ञान प्रबोधिनी प्रशाला