Jump to content

ज्ञान प्रबोधिनी

ज्ञान प्रबोधिनी ही पुण्यातील एक समाजसेवी संस्था आहे. कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे. ज्ञान प्रबोधिनी ही नेतृत्व विकसनासाठी स्थापन झालेली संस्था असून, शिक्षण, संशोधन, ग्राम विकास, आरोग्य व युवा संघटन, स्त्री-शक्ती-प्रबोधन या क्षेत्रात काम करते. ज्ञान प्रबोधिनीच्या शाळा पुणे, निगडी, सोलापूर, हराळी, आंबेजोगाई येथे आहेत. निगडी येथील शाळेमध्ये गुरुकुल आणि क्रीडाकुल असे विभाग कार्यरत आहेत.[] ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबाजोगाई, डोंबिवली, बोरिवली येथे आहेत.

ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही १९६८ सुरू झालेली शाळा आहे. ही शाळा CBSEच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देते. ह्या शाळेत ५वी ते १०वी या इयत्ता आहेत. प्रत्येक इयत्तेत मुले व मुली अश्या दोन तुकड्या व प्रत्येक तुकडीत ४० मुले असतात. शाळेत इंग्रजी, हिंदी, मराठी व संस्कृत ह्या चार भाषा आहेत. गणित, समाजशास्त्र व शास्त्र हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविले जातात. शाळेत दर आठवड्यातील शुक्रवारी एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्ट्य गट यांसारखे प्रकल्प असतात. याचबरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हराळी इत्यादी ठिकाणीही प्रशाला चालतात.

संत्रिका

संस्कृत संस्कृती संशोधिका म्हणजेच ‘संत्रिका’ हा ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग आहे. २२ जुलै १९७५ रोजी या विभागाची स्थापना कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या विभागामध्ये १३००० ग्रंथ असलेले ग्रंथालय आहे. त्यात संस्कृत पुस्तके, हस्तलिखिते, कोश, संदर्भकोश व अन्य ग्रंथसंपदा आहे. रामायण संग्रह हे या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य आहे. या रामायण संग्रहात १९५७ पुस्तके असून ती ३३ भाषांत व १८ विविध लिपींमध्ये आहेत. २३ भारतीय भाषा व १० परदेशी भाषांतील ही संस्करणे आहेत. या विभागास पौरोहित्याचे मोठेच योगदान आहे. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने संस्कार करणारे ४० पेक्षा जास्त पुरोहित सध्या कार्यरत असून ते संपूर्ण भारतभर प्रबोधिनी पद्धतीने विविध संस्कार व विविध प्रकारच्या शांती करतात. सार्थता, सामूहिकता, शिस्त व समभाव हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. १९९२ पासून संत्रिकेत सर्व जाती पंथांच्या लोकांसाठी पौरोहित्याचे वर्ग घेतले जातात. स्वयम्‌ पौरोहित्य शिकवणे हा या वर्गांमागील हेतू आहे.

युवक/युवती विभाग

प्रशालेतील व अन्य शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्याथीनींची क्रीडादले, विज्ञानदले घेतले जाते. साहस-सहली, तंबू शिबिरे, क्रीडा प्रात्याक्षिके, विक्री उपक्रम, गणेशत्सव-पालखी या सार्वजनिक उत्सवांमध्ये जोशपूर्ण सहभाग, अभ्यास दौरे, अभ्यास शिबिरे, विस्तार शिबिरे अशा आणिक माध्यमांतून युवक-युवती संघटन व नेतृत्व विकसन होते.

स्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण)

पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भोर, वेल्हे व हवेली या ३ तालुक्यांत ग्रामीण महिलांसाठी काम केले जाते. पुणे जिल्हातील शिवगंगा-गुंजवणी खोऱ्यात दारूबंदी आंदोलनाद्वारे ग्रामीण शक्तीचे संघटन सुरू झाले. बचत गटाचे हे काम १९९५ मध्ये सुरू झाले. ३०० बचत गटांचे हे काम ४५ गावांत चालते. या गटांमध्ये ५२०० महिला सभासद आहेत. गटांची वार्षिक उलाढाल २.५ कोटी रुपये आहे. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांसाठी सुरू झालेल्या या कामानंतर महिलांना उद्योजकता विकास, आरोग्य व ग्रामीण नेतृत्व याचेही प्रशिक्षण दिले जाऊ लागले. बचत गटाच्या कामातून ग्रामीण महिला आर्थिक साक्षर होते. या कामाचा एक भाग म्हणून २०१०-११ मध्ये पुण्याच्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग या रिझर्व्ह बँकेच्या कॉलेज सोबत खोपी या भोर तालुक्यातील गावात काम झाले. देशव्यापी चाललेल्या बँक इन्क्ल्यूजन कार्यक्रमांत १००% बँक खाती काढून खोपी हे गाव महाराष्ट्रात पहिले आले. महिलांच्या या कामामध्ये किशोरी विकास, युवती विकास, नव माता (हिरकणी) अशा विविध वयोगटांतील महिलांच्या प्रशिक्षणाची भर पडली आहे. वेल्हे भागात दुर्गम भागातील मुलींचे वसतिगृह चालवले जाते. शब्द ते शक्ती या प्रकल्पाद्वारे किशोरी, युवती व महिला यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकसन, आरोग्य, स्वयंरोजगार व नेतृत्व प्रशिक्षण यासाठी काम चालते. २०० युवतीसाठी स्वयंरोजगार कौशल्य व नेतृत्व प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. ग्रामीण माता व बालके यांच्यासाठी २५ गावात आरोग्य प्रकल्प व आरोग्य प्रबोधिका प्रशिक्षण घेतले जाते. १२५ अंगणवाडी ताईचे गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण घेतले जाते.

ग्रामविकसन विभाग - नैसर्गिक संसाधने विभाग

ग्राम विकसन विभाग हा ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा एक महत्त्वाचा आणि सगळ्यात जुना विभाग आहे. मराठवाड्यातील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईचे भरीव योगदान आहे.

स्त्री शक्ती प्रबोधन (शहरी) : संवादिनी

पदवीधर गृहिणींनी सन २००० साली या गट पुण्यात स्थापना केला. 'व्यक्तिविकासातून सामाजिक विकास करणे' या हेतूने स्वतःचा व्यक्तिविकास करताना समाजासाठी काहीतरी करणारा हा महिलांचा गट आहे. मासिक बैठक घेऊन त्याला नियमित येणाऱ्या सभासदांचे विविध विषयाचे प्रशिक्षण करत आवडीच्या गटात समाजाभिमुख होऊन कामाला लागणे ह्या प्रेरणेने महिला या गटात येतात.

स्पर्धा परीक्षा केंद्र

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याची तयारी या विभागात केली जाते. उत्तम अधिकारी निर्माण होण्यासाठी तेथे प्रशिक्षण दिले जाते.

छात्र प्रबोधन

किशोरवयीन मुलांना सकस साहित्य वाचनास मिळावे म्हणून संस्थेच्या वतीने १९९२ पासून छात्र प्रबोधन नावाने मासिक चालवले जाते. किशोरवयीन मुलांना वाचनाची गोडी लागावी हा आग्रह असतोच. २०१० पासून दरवर्षी ५०,००० प्रतींची दिवाळी अंकांची विक्रमी विक्री केली जाते. वाचकांच्या कृतीशील सहभागासाठी संपादक मंडळ जागरूक असते. आता अंकाची सुलभ आवृत्ती, इंग्राजी आवृत्ती, युवकांसाठी 'युवोन्मेष' असेही अंक काढले जातात.

नागर वस्ती विभाग

पुण्याच्या ३० वस्त्यांचा अभ्यास करून ज्ञान प्रबोधिनीने नागर वस्ती विकासासाठी काम सुरू केले. त्यात किशोर विकास, महिला विकास, किशोरी विकास यासाठी यासाठी स्वतंत्र उपक्रम घेतले जातात.

ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र

ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई

ज्ञान प्रबोधिनी, डोंबिवली

ज्ञान प्रबोधिनी, बोरिवली

संदर्भ

  1. ^ ज्ञान प्रबोधिनी, एक अभिनव शैक्षणिक प्रयोग - खंड ३. पुणे: ज्ञान प्रबोधिनी. १९९५.

बाह्य दुवे

चित्रदालन