Jump to content

जॉन (इंग्लंडचा राजा)

जॉन (जन्म ११६५ मृत्यू १२१६) हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द ११९९ ते १२१६ होती.

जॉन हा दुसऱ्या हेन्रीचा सर्वात धाकटा मुलगा. त्यामुळे त्याच्याकडे राज्याचा कारभार येणे अपेक्षित नव्हते. पण दुसऱ्या हेन्रीच्या चार मुलांमधल्या भाऊबंदकीच्या संघर्षात तीन मुले दगावल्यावर शेवटी दुसऱ्या हेन्रीच्या मृत्यूनंतर केवळ दहाच वर्षांत—पहिल्या रिचर्डच्या म्हणजे जॉनच्या ज्येष्ठ भावाच्या, दुसऱ्या हेन्रीच्या तिसऱ्या मुलाच्या, मृत्यूनंतर—जॉन राजा झाला. इंग्लंडच्या लोकमानसात जॉन कमालीचा मुर्ख, संशयी, लोभी, व क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या राजवटीत आज फ्रांसमध्ये असलेली भूमी इंग्लडच्या हातातून निसटली. स्वतःच्याच घरात बघितलेल्या भाऊबंदकी व दगाबाजीमुळे जॉन इतका संशयी झाला की त्या भरात त्याने इंग्लंडच्या लोकप्रिय सरदारांना दूर ढकलून पैसे-दिले-म्हणजे-विश्वास-ठेवता-येईल या न्यायाने चोर-दरोडेखोरांना आपल्या सेवेत ठेवले. इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा धर्मप्रमुख कोणाला नेमावे यावर १२०८ मध्ये जॉनने रोममधल्या पोपसोबत भांडण उकरले व त्यामुळे १२१४ मध्ये झालेल्या युद्धात स्वतः पराभूत झाला. या सुमारास त्याच्या राज्यात अराजकता व असुरक्षितता इतकी वाढली की १२१५ च्या जूनमध्ये इंग्लंडच्या काही सरदारांनी राजाने त्यांच्या संमतीशिवाय वाटेल तसे कोणास मृत्यूदंडाची शिक्षा देऊ नये व वाटेल तशी खंडणी गोळा करू नये अशा करारावर स्वाक्षरी करण्यास जॉनला भाग पाडले. १२१४ च्या पराभवानंतर सत्तेवरच्यी पकड निसटत चाललेल्या जॉनला निमुटपणे या करारावर सही करावी लागली, पण एकाच वर्षांत जॉन पुन्हा सैन्य गोळा करून या सरदारांविरूद्ध चालून गेला. याच मोहिमेत ऑक्टोबर १२१६ मध्ये वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी त्याचा जुलाबाने मृत्यू झाला. अशा रितीने एकाच वर्षांत खारिज झाला असला तरीही “माग्ना कार्टा” (“महा करार”) म्हणून ओळखला जाणारा १२१५चा करार इंग्लंडच्या राजनैतिक इतिहासातला मैलाचा दगड मानला जातो. राजाच्या अमर्याद हुकुमतीवर लोक कायदेशीर मार्गाने अंकुश ठेवू शकतात ही कल्पना इंग्लिश लोकांना आली. इंग्लंड आज गणराज्य नसले तरी लोकशाही आहे. याचे बीज १२१५ च्या माग्ना कार्टाने रोवले असे काही वेळा म्हणले जाते. जॉनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा तिसरा हेन्री इंग्लंडच्या गादीवर आला. तेराव्या शतकापासून चालत आलेल्या इंग्लंडच्या रॉबिन हुड लोककथांचा जॉन आजतागायत खलनायक आहे.