जैसलमेर
जैसलमेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.हे शहर जैसलमेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे पश्चिम राजस्थानात असून प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या शहराला मानाने गोल्डन सिटी (सोनेरी शहर) असे संबोधतात. या शहरातील मध्ययुगीन प्राचीन किल्ला आजही शाबूत आहे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या शहराची स्थापना ११ व्या शतकात राजपूत महारावळ यांनी केली. इस्लामी राजवटीतही या घराण्याचे शहरावरील नियंत्रण कायम राहिले.
भौगोलिक
जैसलमेर हे शहर थार वाळवंटाच्या अगदी मध्य भागी स्थित नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी भागात स्थित आहे. शहराच्या आजूबाजूला सर्वत्र वाळूच्या टेकड्या, छोट्या टेकड्या, डोंगर, संमिश्र काटेरी वने आहेत. यांपैकी एका टेकडीवर जेसलमेरचा किल्ला वसला आहे. वाळूच्या टेकड्या सततच्या विषम वातावरणाने आपले भौगोलिक स्थान बदलत असतात. इंदिरा कालव्याच्या पाण्याने सद्यस्थिती पूर्ण पणे बदललेली आहे व शहर परिसरात अनेक ठिकाणी वनराया तयार झालेल्या आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
१) जैसलमेरचा किल्ला - राणा जैसल याने बांधलेला हा पिवळ्या दगडातील किल्ला गेली हजार वर्षे जैसलमेर मध्ये उभा आहे. या किल्ल्यात प्रवेश मोफत आहे. किल्ल्यात अतिशय सुरेख बांधकाम असणारा राजवाडा आहे. तसेच एक अतिशय कोरीव काम कसणारे जैन मंदिर आहे. खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
२) पटवा हवेल्या - पटवा बंधूनी १८७० च्या सुमारास बांधलेल्या या पाच हवेल्या आपल्या कोरीव कामासाठी विख्यात आहेत. पटवा बंधू हे व्यापारी होते आणि त्यांच्या संपत्तीची कल्पना हा हवेल्यांच्या बांधकामावरून येते. "नाथमलजी कि हवेली" या नावाने प्रसिद्ध असणारी एक हवेली पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. हवेली बघण्यासाठी १०० रुपये तिकीट आहे.
३) सलीम सिंघ कि हवेली - सलीम सिंघ हा जैसलमेरच्या राजाचा दिवान होता याची हवेली तिच्या वैशिष्ट्यपूर्ण शिखरासाठी प्रसिद्ध आहे.
४) गडीसर तलाव -राजा रावल जैसल याने बांधलेला हा तलाव जैसलमेरचा पाण्याचा एकमात्र स्रोत होता. तलावाकाठी असणारे मंदिर आणि कमान प्रेक्षणीय आहे. असे म्हणतात कि एका नर्तकीने ही कमान बांधून घेतली. राजाने ही कमान तोडू नये म्हणून तिने या कमानीच्या वरच्या मजल्यात एक श्रीकृष्णाचे मंदिर बनवले. राजाला, नर्तकीने बनवलेल्या कमानीतून जाणे अपमानास्पद वाटल्याने त्याने बाजूने एक वेगळाच जिना बनवून घेतला.
५) बडा बाग - या ठिकाणी राज घराण्यातील अनेकांच्या कोरीव समाध्या आहेत.
६) सेना संग्रहालय - भारतीय सेनेच्या तीनही दलांची माहिती देणारे संग्रहालय जैसलमेरच्या बाहेर आहे.
७) वाळवंट सफारी हा देखील जैसलमेर मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केन्द्र स्थान आहे.
चित्रदालन
- King's palace in jaisalmer fort , जैसलमेर किल्ल्यातील राजवाडा
- जैसलमेर शहराचे किल्ल्यावरून पाहिलेले दृश्य
- सोन्याचा पत्र वापरून केलेले पटवा हवेलीतील छत
- पटवा हवेलीचे बाह्यरूप
- इ.स.१८१५ मधील सलीमसिंघची हवेली
- गडीसर तलावातील छत्री
- गडीसार तलावाच्या कमानीवरील मंदिर
संदर्भ
- बी.बी.सी जैसलमेर स्लाईडशो
- जैसलमेर पर्यटन संपूर्ण माहिती Archived 2020-10-09 at the Wayback Machine. -प्रवास मित्र