जैविक घड्याळ
जैविक घड्याळ हे प्रत्येक सजीवाच्या शरीरात असणारी व पृथ्वीच्या गतीनुसार, म्हणजेच सूर्योदय व सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन पातळी आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करणारी यंत्रणा होय. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व रात्रींसाठी अनुकूल झाले. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर कामाच्या पाळ्यांमुळे व रात्रीच्या अधिक तासांच्या प्रवासांमुळे या घड्याळात थोडेफार बदल झाले.[१]
शरीरातील जैविक घड्याळ दैनंदिन गतीवर कसे चालते, त्यासाठी पेशीत दिवसा आणि रात्री कसे बदल होतात यावर १९६० च्या दशकापासून संशोधन चालू होते. झाडे, प्राणी आणि माणसे पृथ्वीच्या गतीप्रमाणे आपल्या शरीरातील जैविक घड्याळात (बायोलॉजिकल क्लॉक) कसे बदल करतात, मानवी शरीरातील जैविक घड्याळाची काय कार्यपद्धती आहे याचा शोध १९८०पासून संशोधन करणाऱ्या जेफ्री हॉल (७२), मायकेल रोसबॅश (७३) आणि मायकेल यंग (६८) या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना २०१७ सालचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला.[२]
नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांचे कार्य
त्यांनी फळांवर बसणाऱ्या माश्यांच्या शरीरातून जैविक घड्याळ नियंत्रित करणारे जनुक वेगळे केले. हे जनुक पेशींमधील एक प्रकारचे प्रथिन तयार करण्यास कारणीभूत असते. हे प्रथिन रात्री पेशींमध्ये साठून राहते व दिवसा लोप पावते. आणि त्यामुळे जैविक घड्याळ नियंत्रित राहते.
शोधाचे महत्त्व
निद्रानाश, वैफल्य व हृदयविकारांसारख्या अनेक व्याधींवरील उपाय शोधण्यास या शोधाची मदत मिळू शकते. तसेच कोणती औषधे दिवसाच्या नेमक्या कोणत्या वेळी घेतली म्हणजे अधिक परिणामकारक ठरू शकतात, याच्या अभ्यासासाठीही हे संशोधन उपयुक्त आहे. अनेक दिवस अनियमित झोप घेतल्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी व रात्री उशिरापर्यंत जगणाऱ्या तरुणांवर इलाज करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होऊ शकतो.