जैतुनबी
जैतुनबी ऊर्फ जयदास महाराज (इ.स. १९३०:माळेगाव, बारामती, महाराष्ट्र - ७ जुलै, इ.स. २०१०:पुणे, महाराष्ट्र) या एका वारकरी संत होत्या.
बालपण आणि वारकरी होण्याची सुरुवात
जैतुनबी यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे गवंडी होते. बारामतीजवळचे माळेगाव हे त्यांचं मूळ गाव होते. मकबूलभाईंची भेट वारकरी संप्रदायाच्या गुण्याबुवांशी पडली. गुण्याबुवा जवळच्या पुरंदर तालुक्यातील भिवडीला गवंडीकाम करीत. गुण्याबुवा आणि मकबूलभाई मित्र बनले आणि एकत्र मिळून गवंडी काम करू लागले. त्यांच्या हरिभक्तीमुळे लोक गुण्याबुवांना हनुमानदास महाराज म्हणत. पाचवीत असलेली दहा वर्षांच्या जैतुनबींनी तेव्हापासून भजनकीर्तनात भाग घेतला व नंतर वारकरी संप्रदायात सामील झाल्या.
जैतुनबींनी बारामतीच्या घाणेकरबुवांकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते. त्याचा उपयोगच्या कीर्तनात करीत.
जैतुनबीच्या हरिभक्तीला मुल्ला-मौलवींनी विरोध केला. घरच्यांनीही विरोध केला. पण जैतुनबींनी वारकरी पंथा सोडला नाही. विवाह करण्यासही त्यांनी नकार दिला.
दीक्षा आणि वारीत सहभाग
मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या जैतुनबी यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. लहानपणी सापडलेल्या श्बाळकृष्णाच्या मूर्तीमुळे त्यांना पांडुरंगाचा ध्यास लागला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हनुमानदास महाराज बैराग यांच्याकडे दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. सूफी परंपरा असूनही ज्ञानोबा-तुकारामांच्या पालखीबरोबर एकसष्ट वर्षे त्यांनी वारी केली. ६२व्या वारीच्या दरम्यान, पालख्या पुण्यात असताना त्या निधन पावल्या
भागवत संप्रदायाची शिकवण आचरण्यात आणणाऱ्या जैतुनबी उत्तम कीर्तनकार होत्या. प्रसंगी सायकलवरून गावोगावी जाऊन त्यांनी कीर्तने केली. रसाळ वाणी आणि स्पष्ट विचार यामुळे त्यांच्या कीर्तनाला भाविकांची नेहमीच गर्दी असे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ात स्वतःची दिंडी घेऊन जैतुनबी नेमाने सहभागी होत. त्यांच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असत. पालखी मार्गावर कीर्तन, भजन करीत आपले विचार सामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले. महाराष्ट्रातील वारकऱ्यांना जैतुनबी यांच्याबद्दल कमालीचा आदर होता.
आळंदी आणि पंढरपूर येथे जैतुनबींचे मठ आहेत.
स्वातंत्रलढ्यात सहभाग
तरुण जैतुनबी लढ्यासाठी स्फूर्तिगीते गात गावोगाव फिरू लागली.. १९४२ च्या लढ्याच्या वेळी माधवराव बागल यांच्या सभेत तिने धिटाईने पोवाडा म्हटला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बागल यांनी जैतुनबीला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभे केले . जैतुनबी नंतर नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले. महात्मा गांधी यांचा पुण्याजवळच्या उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंदात मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता.
कीर्तनकार जैतुनबी
स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जैतुनबी माळेगावला आईवडिलांकडेच होत्या. तोपर्यंत अध्यात्माची खोली त्यांच्या लक्षात आली होती आणि वारकरी संप्रदायाची ताकद समजली होती. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथावाचलेली व एकनाथी भागवत मुखोद्गत केलेल्या जैतुनबी सुरेख कीर्तन करू लागल्या.. गुरू हनुमानदासांबरोबर वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबी यांनी मरेपर्यंत कायम ठेवला.
वारीत मुक्कामाच्या ठिकाणी करत असलेल्या कीर्तनाने वयाच्या चोविशीतच जैतुनबींच्या नावाने दिंडी ओळखली जाऊ लागली आणि हनुमानदासांनीही दिंडीचा सर्व कारभार त्यांच्याकडे सोपवला. विशेष म्हणजे सुरुवातीला पालखीत महात्मा गांधींचा फोटो ठेवून त्या वारीत सहभागी होत.
आषाढी आणि कातिर्की दोन्ही वाऱ्या करणारी जैतुनबींची दिंडी सासवडपासून वारीसाठी प्रस्थान ठेवत असे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चाले.. कीर्तन करता यावे यासाठी दिंडी मुख्य वारीत सामील होत नसे. जैतुनबींच्या कीर्तनाला मोठी गर्दी असे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पांढऱ्याशुभ्र कपड्यात कमरेला शेला गुंडाळून उभ्या राहिल्यानंतर जैतुनबी खणखणीत आवाजात कीर्तन करत. त्यांचे कीर्तन कर्मकांडात अडकत नसे. कीर्तनात सामाजिक आशय असे. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्यात भाष्य असे. स्त्री शिक्षणावर त्यांचा मोठा भर असे.
मुस्लिम धर्माचरण
जैतुनबी स्वतः मुस्लिम धर्माप्रमाणे आचार पाळतात. पैगंबर मानतात. नमाज पढतात. रोजे करतात. पण पैगंबर आणि विठ्ठल यांत भेद करत नाहीत. ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' ही उक्ती त्यांनी कृतीत आणली आहे. .
समाजकार्य आणि निधन
अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीशिक्षण यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. भागवत धर्माची पताका आयुष्यभर खांद्यावर फडकवत ठेवणाऱ्या ऋषितुल्य जैतुनबी यांना पालखी सोहळा सुरू असतानाच इहलोकीची यात्रा संपवता आली. पालख्या पुणे मुक्कामी आल्यानंतर जैतुनबी यांचे रात्रीचे कीर्तन नित्याप्रमाणे यथासांग पार पडले. त्यानंतर त्यांना मृत्यू आला.