Jump to content

जेरोम के. जेरोम

जेरोम के. जेरोम
जेरोम के. जेरोम
जन्ममे २, इ.स. १८५९
वॉल्सल, स्टॅफर्डशर, इंग्लंड
मृत्यूजून १४, इ.स. १९२७
नॉर्दॅम्प्टन, इंग्लंड
राष्ट्रीयत्वब्रिटिश
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा इंग्लिश
प्रसिद्ध साहित्यकृती थ्री मेन इन अ बोट

जेरोम क्लॅप्का जेरोम (इंग्लिश:Jerome Klapka Jerome;) (मे २, इ.स. १८५९ - जून १४, इ.स. १९२७) हा इंग्लिश लेखक व विनोदकार होता. त्याची 'थ्री मेन इन अ बोट' ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे.

जेरोमाचा जन्म वॉल्सल, इंग्लंडातील काल्डमोर या गावी झाला. त्याचे बालपण लंडनात हलाखीत गेले. त्याने लंडनातील सेंट मेरिलिबोन ग्रामर स्कूल येथे शालेय शिक्षण घेतले.

'थ्री मेन इन अ बोट' या साहित्यकृतीच्या जोडीनेच त्याची 'आयडल थॉट्स ऑफ अ‍ॅन आयडल फेलो' आणि 'सेकंड थॉट्स ऑफ अ‍ॅन आयडल फेलो' हे निबंधसंग्रह, थ्री मेन ऑन अ बमेल, अ सिक्वल टू थ्री मेन इन अ बोट, इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.

जीवन

जेरोम के. जेरोम हा जेरोम क्लॅप (ज्याने नंतर आपले नाव बदलून जेरोम क्लॅप जेरोम असे केले) व मार्गरिट जोन्स या दांपत्याचे चौथे अपत्य होय. त्याच्या वडिलांचा लोखंडी सामान विकण्याचा व्यवसाय होता व ते हौशी धर्मोपदेशक होते. त्याला पॉलिना व ब्लॅंडिना नावाच्या दोन बहिणी व मिल्टन नावाचा भाऊ होता, जो लहान वयात वारला. त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याचेही नाव आधी 'जेरोम क्लॅप जेरोम' असे नोंदले गेले होते. ते नंतर 'क्लॅप्का' असे बदलले गेले (हंगेरियन जनरल ज्यार्ज क्लॅप्का याच्या नावावरून). स्थानिक खाणउद्योगातल्या पैशाच्या गुंतवणुकीत फटका बसल्याने या कुटुंबाला वाईट दिवस आले. घेणेकरी सतत घरी येत असत. इ.स. १९२६सालच्या आपल्या आत्मचरित्रात जेरोमाने आपले हे अनुभव नमूद केले आहेत.

तरुण जेरोमाची राजकारणात जायची अथवा लेखक व्हायची महत्त्वाकांक्षा होती. पण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांच्या आणि पंधराव्या वर्षी आईच्या मृत्यूने त्याला शिक्षण सोडून काम शोधणे भाग पडले. त्याला 'लंडन आणि वायव्य रेल्वे' या कंपनीमध्ये रुळांवर सांडलेला कोळसा गोळा करायची नोकरी मिळाली, जी त्याने पुढे चार वर्षे केली.