Jump to content

जुल्स व्हर्न

जुल्स व्हर्न
द लाइटहाऊस अॅट द एंड ऑफ द वर्ल्ड ही व्हर्नच्या साहित्यिक टप्प्यातील सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते.

जूल गाब्रिए वेर्न (मराठी लेखनभेद: ज्युल्स गॅब्रियल व्हर्न ; फ्रेंच: Jules Gabriel Verne ;) (फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ - मार्च २४ इ.स. १९०५) हे फ्रेंच लेखक होते. एच.जी. वेल्स यांच्याप्रमाणेच त्यांनाही विज्ञान कथेचे जनक मानले जाते. २० व्या शतकातील अनेकानेक शोधांची कल्पना त्यांच्या कथांमध्ये त्यांनी केली होती. त्यात टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान, ज्युक बॉक्स, इ. कल्पनांचा मोह न आवरल्याने त्या त्या वस्तु प्रत्यक्षात आणल्या गेल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कार्य करण्याचे नेमके कारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रश्नांची जूल वेर्न यांनी दिलेली उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरणारी होती.

जीवन

ज्युल्स यांचा जन्म पश्चिम फ्रान्स मधील लॉयर नदी किनारी असलेल्या नान्ते या गावी फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ रोजी झाला. त्यांचे वडील पेरी आणि आई सोफी यांच्या पाच मुलांमधील ते ज्येष्ठ. शिक्षणाची सुरुवात नान्ते गावातील शाळेतच झाली. लहानपणापासूनच ज्युल्स यांना प्रवासाची, साहसाची आवड होती. नदीतून जाणाऱ्या लहानमोठ्या नावा पाहून त्यांनाही त्यातून प्रवास करून जग पाहावे असे वाटत होते. या त्यांच्या वेडापायी वयाच्या बाराव्या वर्षी ते एका नावेत लपूनछपून चढले, पण वडिलांना सुगावा लागला आणि ज्युल्स पकडले गेले, शिक्षा म्हणून वडिलांनी खूप मारले. त्यावेळीच लहान ज्युल्स यांनी ठरविले की, "यापुढे मी केवळ माझ्या कल्पनेतच जगाची सफर करेन." या घटनेनंतर ज्युल्सची रवानगी एका निवासी शाळेत करण्यात आली. या शाळेत ज्युल्स मुख्यत्वे लॅटिन भाषा शिकले. प्रतिभावान ज्युल्सने थोड्याच दिवसात लॅटिन भाषेत लेख लिहिणे सुरू केले. त्यांचे लेख लोकांच्या पसंतीस उतरू लागले.

शालेय शिक्षणानंतर वडिलांच्या आग्रहाखातर ज्युल्सने पॅरिस येथे कायद्याचा अभ्यास सुरू केला, पण लेख लिहिणेही सुरूच ठेवले. या कामामुळे मुलाचे अभ्यासातील लक्ष उडेल या समजुतीने वडिलांनी त्यांची आर्थिक मदत कमी केली. पैसे कमी पडू लागताच ज्युल्सने आणखी लेख लिहून ते मासिकांना पाठविणे सुरू केले, त्यामुळे चार पैसेही मिळविता येऊ लागले. तसेच त्यांनी समभाग विक्रीची दलाली करण्याचा व्यवसायही सुरू केला. हा व्यवसाय त्यांना मुळीच आवडत नसे पण यश मात्र मिळत गेले. नियमित प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमुळे अलेक्सांद्र(अलेक्झांडर) ड्यूमा) आणि व्हिक्टर ह्यूगो सारख्या मोठ्या लेखकांशी परिचय झाला. ड्युमाशी तर कायमची मैत्री जडली. या दोन्ही लेखकांमुळे ज्युल्स आपल्या लेख्नन कामाकडे आणखी गांभीर्याने पाहू लागले.

१० जानेवारी, इ.स. १८५७ रोजी ज्युल्सने दोन मुले असलेल्या एका विधवा बाईशी विवाह केला. लेख लिहून मिळणारे उत्पन्न पुरेसे होऊ लागले पण मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्युल्सने प्रवास वर्णनाची पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. प्रवासाची आवड असल्याने इ.स. १८६७ साली ज्युल्सने एक छोटी नाव (सेन्ट मिशेल) खरेदी केली. पुढे ती नाव विकून त्यांनी दुसरी नाव(सेन्ट मिशेल २) खरेदी केली. पुढे तीही नाव विकून (सेन्ट मिशेल ३) आणखी मोठी नाव खरेदी केली. या नावेतून ते युरोपच्या सफरीवर जात असत. इ.स. १८७० साली उमराव पदावर ज्युल्सची नियुक्ती करण्यात आली.

९ मार्च, इ.स. १८८६ रोजी त्यांच्या एका पुतण्याने ज्युल्स यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या चालविल्या. सुदैवाने एक गोळी अन्यत्र गेली पण दुसरी गोळी मात्र ज्युल्स यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली लागली आणि ते एका पायाने कायम लंगडत चालू लागले.

इ.स. १८८८ साली ज्युल्स यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते आमियां शहराचे नगरसेवक म्हणून निवडूनही आले. इ.स. १९०५ पर्यंत त्यांनी अविरतपणे नगरसेवक म्हणून काम केले. मार्च २४ इ.स. १९०५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी ज्युल्सचे मधुमेहाच्या दीर्घ आजाराने आमियां गावी निधन झाले.

साहित्य

ज्युल्स व्हर्न यांनी प्रवास, साहस विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या ५४ पुस्तकांना एकत्रितरित्या अद्वितीय सफरी म्हणून ओळखतात. जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (इ.स. १८६४), फ्रॉम द अर्थ टू द मून (इ.स. १८८५), २०,००० लीग्ज अंडर द सी (इ.स. १८६९-७०), पॅरिस इन द ट्वेंटिएथ सेंच्युरी, फाइव्ह वीक्स इन अ बलून, अराउंड द मून, अ फ्लोटिंग सिटी, अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. याशिवाय ज्युल्स यांनी इतर अनेक गोष्टी, निबंध, नाटके आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर अगदी २० व्या शतकातही त्यांच्या हस्तलि्खितांवरून त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

चरित्रे

  • दुसरा विश्वामित्र (लेखक - संजय कप्तान)

बाह्य दुवे

  • दनी कायतासारी. ""ल वोयाज एक्स्ट्राओर्दीनेर" - जुल्स व्हर्न याच्या साहित्यकृतींचे समग्र संकलन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "जुल्स व्हर्न याच्या साहित्यकृती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)