जुना करार
जुना करार(इंग्रजी:OLD TESTAMENT) म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी जुन्या, पहिल्या भागातील ग्रंथांचा संच होय. थोड्याफार फरकाने हे ग्रंथ ज्याला हिब्रू बायबल म्हणले जाते, त्या वाङ्मयात गणले जातात.
यहुदी समाज आणि हिब्रू बायबल (जुना करार) : ख्रिस्ती धर्माचा उदय झाला तेव्हा यहुदी समाजात मोशेचे धर्मशास्त्र (तोराह - ग्रंथपंचक), संदेष्ट्यांचे लेखन ( नबीईम ), व अन्य धार्मिक साहित्य (खतुविम), प्रचलित होते. आरंभीच्या यहुदी ख्रिस्ती लोकांसाठीसुद्धा हे पवित्र ग्रंथ होते. कारण येशू स्वतः आणि त्याचे अनुयायी धर्माने यहुदी होते. मात्र ते याला जुना करार असे संबोधित नव्हते. कारण तेव्हा नव्या कराराचे लेखन, संपादन व संकलन पूर्ण झाले नव्हते. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या कराराचे लेखन पूर्ण झाले. इसवी सन चवथ्या शतकापर्यंत नव्या कराराची अधिकृत संहिता तयार झाली होती. त्यानंतर यहुद्यांची धार्मिक पुस्तके जुना करार म्हणून ओळखली जाऊ लागली. या जुन्या कराराला नव्या करारातील २७ पुस्तकांची जोड देण्यात आली. अशा रीतीने ख्रिस्ती लोकांचा बायबल हा धर्मग्रंथ अस्तित्वात आला. ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्मग्रंथात यहुद्यांच्या धर्मग्रंथाचा (जुना करार) समावेश केला. मात्र यहुद्यानी आपल्या धर्मग्रंथात ख्रिस्ती पुस्तकांचा स्वीकार केला नाही. कारण त्यांच्या मते नवा करार अधिकृत नाही. येशू हा ख्रिस्त किवा मसीहा आहे. हे त्यांनी स्वीकारले नाही. यहुद्यांच्या धार्मिक पुस्तकाला आता जुना करार असे संबोधित नाहीत तर आधुनिक पंडित त्याला "हिब्रू बायबल" असे म्हणतात.
यहुदी धर्मशास्त्राचे प्रमाणीकरण : इसवी सन ९० साली इस्राएल देशातील यामनीया या ठिकाणी यहुदी धर्मपंडितांनी एक धर्मसभा आयोजित केली. या धर्मसभेत हिब्रु बायबल (जुना करार) मधील ३९ पुस्तकांना मान्यता देण्यात आली.
हिब्रु बायबलच्या प्रमाणीकरणाचे निकष : ख्रिस्ताच्या जन्माच्या अनेक शतके आधी पालेस्तिनमधील यहुद्यांनी (परूशी लोकांनी) जुन्या करारातील पुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी पुढीलप्रमाणे निकष तयार केले.
ग्रंथपंचकाच्या (मोशेचे नियमशास्त्र) कसोटीवर ही पुस्तके उतरावयास हवी.
ही पुस्तके संदेष्टा एज्रा याच्या कालावधीच्या आधी लिहिली गेलेली असावीत.
ही पुस्तके हिब्रु भाषेत लिहिलेली असावीत.
ही पुस्तके पालेस्तिन देशात लिहिली गेली असावीत.
यहुदी धर्मशास्त्राचे स्वरूप (हिब्रू बायबल) : यहुदी लोकांचे धर्मशास्त्र म्हणजे जुना करार, यात ३९ पुस्तके असली तरी, एकूण २४ गुंडाळ्या होत्या. खालील तक्ता पहा :
१. नियमशास्त्र - तोराह (Torah - Law) - उत्पती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद एकूण ५ गुंडाळ्या
२. संदेष्टे - नाबिईम (Nabiim - Prophets)
(अ.). अगोदरचे - यहोशवा, शास्ते, शमुवेल, राजे एकूण ४ गुंडाळ्या
(ब.) नंतरचे - यशया, यिर्मया, यहेज्केल, होशेय ते मलाखी, १२ संदेष्ट्यांची एक गुंडाळी एकूण ४ गुंडाळ्या
३. धार्मिक पवित्र लेख - खतुविम (Kethubim - Hagiographha)
(अ.) काव्य - स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, इयोब - एकूण ३ गुंडाळ्या
(ब. ) सणाच्या गुंडाळ्या - गीतरत्न, रुथ, विलापगीत, उपदेशक, एस्तेर - एकूण ५ गुंडाळ्या
(क.) ग्रंथ - दानीएल, एज्रा, नहेम्या, इतिहास, - एकूण ३ गुंडाळ्या
तानक असा शब्द हिब्रू बायबलसाठी वापरला जातो. हिब्रू बायबलचे तीन मुख्य विभाग आहेत. ग्रंथपंचक (तोराह – TORAH), संदेष्ट्यांचे ग्रंथ (नबीईम – NEBIIM), आणि पवित्र लेख (खतुविम – KETHUBIM). वरील तीनही ग्रंथांची आद्याक्षरे मिळून तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी प्रचलित झाला.
वरील तक्त्यात वर्णन केल्याप्रमाणे यहुदी धर्मशास्त्राचे १. नियमशास्त्र, २. संदेष्ट्यांची पुस्तके व ३. धार्मिक लेख असे तीन विभाग होते. ख्रिस्ताने या तीन विभागांचा नव्या करारात उल्लेख केला आहे. (पहा, नवा करार, लुककृत शुभवर्तमान २४:४४, मत्तय ५:१७). शमुवेल, राजे, इतिहास यांची दोन दोन पुस्तके असली तरी प्रत्येकी एक एक गुंडाळी होती. जुन्या कराराच्या अनुक्रमणिकेत असलेले होशेय ते मलाखी या बारा संदेष्ट्यांची एकच गुंडाळी होती. एज्रा व नहेम्या ही दोन पुस्तके मिळून एक गुंडाळी होती.
अनधिकृत पुस्तके : ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन २०० या चारशे वर्षाच्या कालावधीत यहुदी व ख्रिस्ती लेखकांनी धार्मिक विषयावर बरेच लेखन केले. त्यापैकी काही लेखनाला अपोक्रिफल (गुप्त) लेखन म्हणजे अनधिकृत साहित्य असे म्हणले जाते. या लेखनाचा यहुदी, कॅथोलिक किवा प्रोटेसटट बायबलमध्ये समावेश नाही. या लिखाणात दृष्टान्त व साक्षात्कार यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. जगाचा अंत व इतिहासाचे शेवटचे पर्व असा यातील लेखनविषय आहे. परमेश्वर व दुष्ट शक्ती (सैतान) यांचा अखेरचा संग्राम या लिखाणात वर्णिला आहे. त्यांतील काही अनधिकृत पुस्तके खालीलप्रमाणे :
यहुदी अनधिकृत पुस्तके : १. एसद्रासचे पुस्तक, २. मक्काबीचे तिसरे पुस्तक, ३. आदम आणि एवेचे पुस्तक, ४. यशयाचे हौताम्य, ५. हनोखाचे पुस्तक, ६. बारा कुलपतींचे (पेत्रीआर्क) इच्छापत्र, ७. संदेष्टी सिबलची संदेशवाणी, ८. मोशेचे स्वर्गारोहण, ९. बारुखाची पुस्तके, इत्यादी. यहुदी लोकांना ही पुस्तके वंदनीय नसली तरी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्यांकडे पाहिले जाते.हिब्रु बायबलच्या मूळ भाषा : हिब्रु बायबल मुळात हिब्रु व अरेमाईक भाषात लिहिण्यात आले. याचा बराचसा भाग हिब्रु भाषेत तर काही भाग अरेमाईक भाषेत लिहिला गेला होता.