Jump to content

जादवपूर विद्यापीठ

जादवपूर विद्यापीठ हे प. बंगाल राज्यातील एक विद्यापीठ. १९०६ साली नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन या नावाची राष्ट्रीय शिक्षण देणारी शिक्षणसंस्था कलकत्ता (बंगाल) येथे स्थापन झाली. देशसेवेच्या उदात्त हेतूने ही संस्था काम करीत होती. या संस्थेत अभियांत्रिकी व तंत्रविद्या महाविद्यालय १९१९ मध्ये समाविष्ट झाले. हे महाविद्यालय व नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन यांचा एकूण दर्जा विचारात घेऊन प. बंगाल सरकारने २४ डिसेंबर १९५५ रोजी त्यास विद्यापीठाचा दर्जा दिला. कलकत्त्यातील जाधवपूर या उपनगरात त्याची प्रतिष्ठापना झाली. त्याचे नावही जाधवपूर विद्यापीठ असे ठेवण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप एकात्म व अध्यापनात्मक असून त्याच्या कक्षेत विद्यापीठ कार्यालय हे केंद्र धरून साडेतीन किलोमीटर त्रिजेचा सर्व भूप्रदेश समाविष्ट होतो. हे विद्यापीठ एकात्म अध्यापनात्मक असले, तरी त्यास गृहशिक्षण देणारे एक महिला महाविद्यालय संलग्न आहे. विद्यापीठात मानव्यविद्या, विज्ञान आणि अभियांत्रिकी व तंत्रविद्या अशा एकूण तीन प्रमुख विद्याशाखा आहेत. या शाखांचे एकूण २२ अध्यापन विभाग आहेत. विद्यापीठात विविध परिषदा व मंडळे–उदा., विद्वत्‌परिषद, प्रशासनपरिषद, अभ्यास मंडळे, क्रीडा मंडळे इ. भिन्न क्षेत्रांत कार्य करतात. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत. शिक्षणाचे माध्यम बंगाली व इंग्रजी असून फ्रेंच, जर्मन, रशियन वगैरे परकीय भाषांत पदविका-प्रमाणपत्रके देण्याचीही येथे सोय आहे. विद्यापीठाने त्रिवर्ष अभ्यासक्रम व वर्षार्ध परीक्षापद्धती अवलंबिली असून परीक्षांत उच्च क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके मिळतात.

विद्यापाठाची चार वसतीगृहे असून त्यांत ८५० विद्यार्थी राहतात. त्यांपैकी ६० विद्यार्थिंनी आहेत. विद्यापीठाच्या आवारात एक आरोग्यकेंद्र व पूर्ण वेळ काम करणारा वैद्यक आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून १,७८,३४८ ग्रंथ आणि २७,४९९ नियतकालिके त्यात होती (१९७२). विद्यापीठाचा अर्थसंकल्प सु. १७५ लाख रुपयांचा असून प. बंगाल शासन सु. ७५ टक्के अनुदान देते ( १९७२). विद्यापीठाची दोन घटक महाविद्यालये व एक संलग्न महाविद्यालय यांतून १९७२ मध्ये सु. ४,१७४ विद्यार्थी शिकत होते.