जाई निंबकर
मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या जाई निंबकर (जन्म : १४ ऑक्टोबर १९३२) या इरावती कर्वे आणि धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव दिनकर धोंडो कर्वे यांच्या कन्या. बोनबिहारी विष्णू निंबकर हे जाई निंबकरांचे पती. गौरी देशपांडे या जाई निंबकराच्या धाकट्या भगिनी.
जाई निंबकर (माहेरच्या जाई कर्वे) या पुणे विद्यापीठातून बी.ए. झाल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातून समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. केले. इ.स. १९५९पासून जाई निंबकर लेखन करीत आहेत. इंग्रजी-मराठी कादंबऱ्या, इंग्रजी कथासंग्रह, अनेक इंग्रजी-मराठी स्फुट लेख, आणि परदेशी लोकांना मराठी शिकविण्यासाठी लिहिलेली पुस्तके असा त्यांचा मोठा ग्रंथसंभार आहे.
जाई निंबकरांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील फलटण गावात असते. तेथे त्यांच्या पतींनी आणि मुलींनी चालविलेली निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) ही समाजकार्य करणारी बिनसरकारी स्वायत्त संस्था आहे. जाई निंबकरांच्या मुली चंदा, नंदिनी आणि मंजिरी या त्या संस्थेत काम करतात.
जाई निंबकर यांच्या साहाय्याने मॅक्सीन बर्नस्टन यांनी फलटण येथे प्रगत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
जाई निंबकरांची इंग्रजी पुस्तके
- A basic Marathi-English dictionary (सहलेखिका : मॅक्सीन बर्नस्टन - १९७५)
- Come Rain (कादंबरी - १९९३)
- A joint venture (१९८८)
- The lotus leaves & other stories (कथासंग्रह)
- Marathi conversational situations (सहलेखिका : मॅक्सीन बर्नस्टन - १९८३)
- Marathi readings (१९८३)
- A Marathi Reference Grammar (सहलेखिका : मॅक्सीन बर्नस्टन - १९७५)
- Marathi Structural Patterns, (१९८२)
- Marathi vocabulary manual (१९८३)
- The phantom bird and other stories (कथासंग्रह -१९९३)
- Temporary Answers (कादंबरी - मार्च १९९८)