जांभोरा
जांभोरा हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील एक गाव आहे. मोहाडी तालुक्याच्या पूर्व टोकावर पहाडाच्या कुशीत जांभोरा हे हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व जातीधर्माचे लोक राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार जांभोरा गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५३६८८९ आहे. जांभोरा हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय मोहाडी (तहसीलदार कार्यालय) पासून ३५ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय भंडारा पासून २८ किमी अंतरावर आहे.[१]
गोधन पूजा
या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून दीडशे ते दोनेशे गायी आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गोपालन केले जाते. गावातील सर्व गाई चारायला जंगलात नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे. ३०० वर्षांपूर्वी गोधन अंगावरून चालवण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली. ही प्रथा आजही सुरूच आहे.
जनावराचा साधा पाय पडला जखम होते. मात्र, जांभोरा येथे दीडशे गायींचा कळप अंगावरून जाऊनही गुराख्याला साधे खरचट नाही. बलीप्रतिपदेला जांभोरा येथे हा चित्तथरारक अनुभव आला. दीडशे वर्षांपासून ही परंपरा परतेकी कुटुंबाने जोपासली आहे. बलीप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने गोधनाची पूजा केली जाते. रानावनात गुरे चारण्यास नेण्याचे काम पूर्वी आदिवासी समाजातील नागरिक करत आहेत; त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. गाईला अंघोळ घालून जनावरांची गावात मिरवणूक काढून अंगणातील शेणाचे गोधन (गोदन) गाईच्या पावलाने उधळले जाते. जमिनीवर पालथे झोपून आपल्या अंगावरून संपूर्ण कळप चालवून घेण्याची अनोखी परंपरा जांभोरा येथे ३०० वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२ ते दोन वाजतापर्यंत या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी (वय ३५) यांच्या अंगावरून शेकडो गाईंचा कळप धावत गेला. मात्र ते निर्धास्त व सुखरूप होते. त्याला कोणतीही दुखापत व इजा झाली नाही.[२][३]
गावातील सर्व गायींना अंघोळ घातली जाते. शिंगे रंगवून व नवीन गेटे, दावे बांधून त्यांना सजविले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो. काही क्षणातच संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते. तरी देखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या उत्कंठेने जांभोरा येथे हजेरी लावतात. यावेळी आजवर गुराख्याला गाई अंगावरून गेल्याने इजा झाल्याची घटना ऐकीवात नसल्याचे लोक सांगतात.[३][४]
आदिवासी ढालींची परंपरा
गावातील गुरे-ढोरे चारून चरिचार्थ करणाऱ्या आदिवासी गोवारी समाजासाठी दिवाळीचा पाडवा हा पर्वणी ठरली. सकाळी या जनावरांना लक्ष्मीसारखे सजवले गेले. सायंकाळी सर्व गायी-गुरे गावामधून फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाय हंबरेपर्यंत नाचविण्यात आल्या. तत्पूर्वी, दोन बाशावर फाडक्या बांधून पुरुष-ढाल म्हणजे गोहळा व स्त्री-ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात आली. दुपारी बारा वाजताच्या सुमारास आदीवासी गोवारी नृत्याला प्रारंभ झाला. डफळी व मुरलीच्या निनादात दादऱ्याची मैफल रंगल्याने नृत्यात रंगत आली.[३]
जवळची गावे[१]
- करडी
- मुंढरी खुर्द
- मुंढरी बुज
- कान्हाळगाव
- बोरी
- किसनपूर
- लेंडेझरी
- येलकाझरी
- केसलवाडा
- पालोरा
- पांजरा
- निलज बु.
संदर्भ
- ^ a b "Jambhora Village in Mohadi (Bhandara) Maharashtra | villageinfo.in". villageinfo.in. 2022-12-29 रोजी पाहिले.
- ^ "भंडारा | जांभोरा में चरवाहों को रौंदने की परंपरा कायम | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2022-12-29 रोजी पाहिले.
- ^ a b c author/lokmat-news-network (2022-10-25). "भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे आगळीवेगळी गोधनाची पूजा; गुराख्याच्या अंगावरून धावला गायींचा कळप". Lokmat. 2022-12-29 रोजी पाहिले.
- ^ "गुराख्याच्या अंगावरून धावल्या शेकडो गाई अशी आहे परंपरा". ETV Bharat News. 2022-12-29 रोजी पाहिले.