जळगाव जिल्हा
जळगाव जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नाशिक विभाग |
मुख्यालय | जळगाव |
तालुके | जळगाव, मुक्ताईनगर भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, बोदवड, भडगाव, रावेर, यावल, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ११,७६५ चौरस किमी (४,५४२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ४२,२४,४४२ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३१३ प्रति चौरस किमी (८१० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७९.७३% |
-लिंग गुणोत्तर | ९२२ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | आयुष प्रसाद |
-लोकसभा मतदारसंघ | जळगाव (लोकसभा मतदारसंघ), रावेर (लोकसभा मतदारसंघ) |
प्रमुख_शहरे | भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा |
संकेतस्थळ |
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जळगाव शहर हे जळगाव जिल्ह्यचे प्रशासकीय केन्द्र आहे.[१] हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रात आहे आणि प्रशासकीय विभाग ' नाशिकचा' भाग आहे.
परिचय
जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते.[२] जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारताच्या इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारताच्या सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी,पांझरा,बोरी
प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची जळगाव जिल्हा ही कर्मभूमी होती.
इतिहास
१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते[३] खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्हाचे मुख्यालय होते.
१९०६ला खानदेश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन नवीन जिल्हे बनवले गेले. [३] पूर्व खान्देश मध्ये आताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये आता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनला. पूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता. १०/१०/१९६०ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देशला जळगाव जिल्हा म्हणून नाव बदलले. १९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले[४].
राजनीतिक इतिहास
- महत्त्वपूर्ण राजकीय पदांवर राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती -
जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभा पाटिल या जिल्ह्यातील आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार व महाराष्ट्राचे भूतपूर्व महसूल मंत्री एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातून आहेत[५]. महाराष्ट्रचे सध्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागाचे मंत्री गुलाब पाटिल हे जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून २०१४ पासून आमदार आहेत. धनाजीनाना पाटिल यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे काँग्रेस नेते या जिल्ह्यातून होते.
तालुके
जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.
अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर , जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, यावल व रावेर.
अनुक्रमांक | तालुका | क्षेत्रफळ (चौ किमी) | लोकसंख्या (२०११) | लोकसंख्येची घनता (चौ किमी) (२०११) | साक्षरता (२०११) | लिंग गुणोत्तर (२०११) |
---|---|---|---|---|---|---|
१ | जळगाव | ८२२.२२ | ६,७६,०४१ | ८२२ | ७४.२४% | ९१३ |
२ | चाळीसगाव | १२१०.९२ | ४,१४,८७९ | ३४३ | ६५.७२% | ९०९ |
३ | भुसावळ | ४५३.४३ | ३,५९,४६१ | ७९३ | ७६.६४% | ९३७ |
४ | जामनेर | १३४९.६८ | ३,४९,९५७ | २५९ | ६४.५९% | ९१६ |
५ | चोपडा | ११५४.२० | ३,१२,८१५ | २७१ | ६२.८% | ९३६ |
६ | रावेर | ९१०.३६ | ३,१२,०८२ | ३४३ | ६७.५२% | ९३७ |
७ | पाचोरा | ८१२.७८ | २,८९,६२८ | ३५६ | ६५.८३% | ९२२ |
८ | अमळनेर | ७९८.९३ | २,८७,८४९ | ३६० | ६९.५८% | ९३७ |
९ | यावल | ९५० | २,७२,२४२ | २८७ | ६८.३३% | ९४५ |
१० | पारोळा | ७८४.२२ | १,९६,८६३ | २५१ | ६५.५९% | ९१३ |
११ | धरणगाव | ५०१.९८ | १,७३,४४७ | ३४६ | ६७.५८% | ९१८ |
१२ | एरंडोल | ५१३.२९ | १,६६,५२१ | ३२४ | ६४.२५% | ९२९ |
१३ | मुक्ताईनगर | ६३९.३४ | १,६३,४४४ | २५६ | ६५.०३% | ९३२ |
१४ | भडगाव | ४९१.३४ | १,६२,८८९ | ३३२ | ६६.५३% | ९२७ |
१५ | बोदवड | ३७२.३१ | ९१,७९९ | २४७ | ६९.३४% | ९२९ |
भूगोल
जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी. आहे.
जळगाव जिल्ह्यात बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आहेत[६]
जळगाव जिल्ह्याच्या पूर्व सीमेला बुलढाणा जिल्हा लागून आहे तर उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला धुळे जिल्हा आहे आणि दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे.[३] जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.[३]
जळगाव जिल्ह्यातून जाणारा धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे आणि नागपूर या शहरांना जोडतो.
जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणासाठी जळगाव येथे विमानतळ आहे. ते जळगावमध्ये आहे.
साहित्य
प्रसिद्ध मराठी कवित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. त्यांच्या ग्रामीण जीवनावरील कविता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बहिणाबाईंच्या सन्मानार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले[७] बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील होते. २०१४ला ज्ञानपीठ प्राप्त प्रथितयश लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धों. महानोर हे देखील जळगावचे भूषण आहेत. नंतरच्या पिढीच्या लेखक व कवि, कवयित्री यांनी साहित्य क्षेत्रात निर्मितीचे कार्य सुरू ठेवले आहे.
प्रशासन
जळगाव शहर येथ जळगाव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सध्या अभिजित राऊत हे येथे जिल्हाधिकारी आहेत[८] जळगाव जिल्हा हा अनेक तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार हा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे.
जळगाव जिल्ह्यात एक महानगर पालिका आहे ती म्हणजे जळगाव महानगर पालिका. जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा परिषद आहे ती आहे जळगाव जिल्हा परिषद. जिल्ह्यात १३ नगरपालिका आहेत त्या आहेत जामनेर, पाचोरा, भुसावळ, यावल, रावेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा इत्यादी. जिल्ह्यात १५ पंचायत समित्या आहेत. चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल, चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड इ. तालुके आहेत.[३]
महत्त्वाची पिके
जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी आणि ऊत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापुस, ऊस, मका, तीळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरुणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.
बाजारपेठ
जळगाव जिल्हा ही सोने व डाळीची प्रमुख बाजारपेठ आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
- शेंगोळा येथील तुलसाबाई मंदिर शेंगोळा ता. जामनेर
- शिरसाळा मारोती मंदिर (मुक्ताईनगर जवळ, तालुका - बोदवड)
- उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे
- ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
- श्री राम मंदिर (जुने जळगाव)
- चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम
- संत चांगदेव मंदिर
- अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर
- श्री पद्मालय, एरंडोल (अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ)
- चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान)
- पारोळा येथील भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला)
- पाल (रावेर तालुका)- थंड हवेचे ठिकाण
- फारकंडे झुलता मनोरा
- अमळनेर येथील भुईकोट किल्ला
- यावल येथील भुईकोट किल्ला
- वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर
- मनुदेवी मंदिर
- संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर)
- संत सखाराम महाराज मंदिर (अमळनेर)
- मंगळग्रह मंदिर (अमळनेर) - मंगळग्रह मंदिर जगातील एकमेव असे मंदिर आहे ज्याठिकाणी मंगळग्रह देवताची मूर्ती आहे. भूमातेची मूर्ती असलेले देखील हे एकमेव मंदिर आहे. मंगळदोष निवारण आणि आपली भक्ती जोपासण्यासाठी जगभरातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. जळगाव, धुळे येथून अवघ्या ५० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर मंदिर असल्याने रेल्वे, बस, खाजगी वाहनाच्या माध्यमातून सहज पोहचता येते.
- गांधीतीर्थ (जळगांव शहर) - कान्हदेशातील जळगाव येथील जैन इरिगेशनचे संस्थापक, भंवरलालजी जैन यांनी जैन हिल्स परिसरात ‘गांधी तीर्थ’चे निर्माण केले आहे. तत्कालिन महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते गांधीतीर्थचे लोकार्पण झाले आहे. निसर्गरम्य परिसरात महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र, साहित्य, घडामोडी, त्यांची अहिंसा मार्गाची चळवळ, देश-विदेशातील त्यांच्या चळवळींची आठवण करून देणारे हे तीर्थ म्हणजे एक विचारपीठच ठरले आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित ऑडिओ-व्हिडीओ गाईडेड विशाल संग्रहालय म्हणून गांधीतीर्थने ओळख निर्माण केलेली आहे. जैन हिल्स परिसरातील निसर्गरम्य अशा आमराई असलेल्या भागात गांधी तीर्थ साकारले आहे. या विशाल भवनात ग्रंथालय, वाचनालय, संग्रहालय, अभिलेखागार, सभागृह आहेत. जळगावला कसे पोहोचाल? जळगाव येथे रेल्वेने अथवा एस.टी.बसने पोहोचता येते. जळगाव शहरापासून चार किमी अंतरावर शिरसोली रोडवर (जळगाव- पाचोरा) गांधीतीर्थ आहे. सोमवार वगळता सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पर्यटक भेट देऊ शकतात. एक वेगळी अनुभूती गांधीतीर्थ पाहिल्यावर येईल यात शंका नाही.
- मेहरुण तलाव
- वाघूर डॅंम
- कांताई बंधारा (जळगाव)
- आर्यन पार्क (जळगाव)
- गांधी उद्यान (जळगांव शहर)
- गणपती मंदिर (तरसोद)
- गोशाळा (कुसूंबा)
- साई बाबा मंदिर (पाळधी)
- श्री कृष्णा मंदिर (वाघळी)
- अप्पा महाराज समाधी मंदिर (जळगाव शहर)
- स्वामी भक्तानंदजी महाराज समाधी स्थळ (निमगव्हाण,चोपडा)
- पाल- थंड हवेचे ठिकाण
हवामान
जळगाव जिल्ह्यातील हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे. त्या त्या काळात कडक थंडी आणि अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या जिल्ह्यात असते. उन्हाळ्यात तापमान कमाल ४६° से. पर्यंत वाढते[३]
प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे
जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ.
औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.
संदर्भ
- ^ "जिल्हा जळगाव".
- ^ "जिल्हा नंदूरबार".
- ^ a b c d e f http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx
- ^ कॅम्पबेल, जेम्स म. (डिसेंबर १८८०). "खान्देश जिल्हा". बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटिर अंक १२ खान्देश. १२: १.
- ^ ऑनलाईन, लोकमत (२०२०). "एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान By ऑनलाइन लोकमत on Sun, October 11, 2020 3:39pm". जळगाव , महाराष्ट्र , भारत.: लोकमत पेपर. line feed character in
|title=
at position 80 (सहाय्य) - ^ http://mahades.maharashtra.gov.in/files/publication/Jalgaondsa_2005_06.pdf&ved=2ahUKEwjP1NKi8r_pAhVKbysKHYENDiYQFjAHegQIAxAB&usg=AOvVaw3wtNPUN09sNoBMOs2MI3Kc&cshid=1589890182054
- ^ https://m.lokmat.com/jalgaon/bahinabai-chaudharys-philosophy-life/
- ^ http://epaperlokmat.in/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20200515_1_7&width=105px
बाह्य दुवे
मध्य प्रदेश | मध्य प्रदेश | |||
धुळे जिल्हा | बुलढाणा जिल्हा | |||
जळगाव जिल्हा | ||||
औरंगाबाद जिल्हा | जालना जिल्हा |