जर्सी गाय
जर्सी गाय हा एक मध्यम आकाराचा ब्रिटिश गोवंश आहे. याचा उगम ब्रिटन मधील जर्सी बेटावर झाला असल्यामुळे या गोवंशाला जर्सी असे नाव पडले आहे. या गोवंशाच्या गाई दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या गायी प्रत्येक वितीस स्वतःच्या वजनाच्या १० पट जास्त दूध देऊ शकतात. या गाईच्या दुधात स्निग्धांश म्हणजेच फॅट मोठ्या प्रमाणावर आढळते, तसेच दुधाला एक वैशिष्ट्यपूर्ण पिवळसर रंगाची छटा असते.[१]
जर्सी विविध हवामान आणि वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेते आणि समशीतोष्ण हवामानात उद्भवणाऱ्या अनेक जातींप्रमाणे या गायी उष्णता चांगल्या प्रकारे सहन करू शकतात. जगातील अनेक देशांमध्ये या गोवंशाची निर्यात झाली आहे. डेन्मार्क, फ्रान्स, न्यू झीलंड आणि युनायटेड स्टेट्स या देशात ही स्वतंत्र जातीमध्ये विकसित झाली आहे.
जर्सी गायीचे वजन ४०० ते ५०० किलोग्राम (८०० ते १,१०० पाउंड) पर्यंत असते. शरीराचे वजन कमी असल्यामुळे, कमी देखभालीची आवश्यकता आणि उत्कृष्ट चरण्याची क्षमता आढळते. कमी त्रासाची प्रसूती असल्याने, संकरासाठी त्यांची लोकप्रियता वाढली आहे. उच्च प्रजनन क्षमता, उच्च बटरफॅट (4.84%) आणि प्रथिने (3.95%), आणि स्थानिक पातळीवर उत्पादित खाद्यावर भरभराट होण्याची क्षमता हा सुद्धा एक जर्सी गायीचा फायदा आहे.[२]
जर्सी तपकिरी रंगाच्या सर्व छटामध्ये, म्हणजे अगदी हलक्या रंगछटेपासून ते जवळजवळ काळ्या रंगापर्यंत आढळतात. जर्सी गायीच्या जबड्याभोवती एक फिकट पट्टी असते. शेपूट मध्यम लांब असून शेपूटगोंडा गडद रंगाचा असतो. पाय मजबूत काटक असून खुर काळ्या रंगाचे असतात. सहसा गायी शांत आणि विनम्र असून बैल आक्रमक असू शकतात.
भारतात ही गाय शुद्ध स्वरूपात तसेच संकर स्वरूपात आढळते. महाराष्ट्राचे पैदास धोरणात, पशुउत्पादन वाढीविण्याकरिता जर्सी जातीचे वळूचे वीर्य वापरून संकरीत गायी निर्मिती करण्यात आली.
संदर्भ
- ^ One Hundred Years of the Royal Jersey Agricultural and Horticultural Society 1833–1933. Compiled from the Society's Records, by H.G. Shepard, Secretary (extract). 12 July 2002 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "जर्सी गाय | पशु पालन के बारे में जानकारी" (हिंदी भाषेत). ८ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.