जयंत श्रीधर टिळक
जयंत श्रीधर टिळक (जन्म – आश्विन शुक्ल एकादशी, इ.स. १९२१; - १९८०) हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक होते.
ग.वि. केतकरांनी संपादकपद सोडल्यावर सन १९५०मध्ये जयंतराव टिळक केसरीचे संपादक झाले. त्यांची ही कारकीर्द प्रदीर्घ काळ म्हणजे सतत तीस वर्षे चालू राहिली. जयंतराव संपादक झाल्यावर केसरी आठवड्यातून दोनाच्याऐवजी तीन वेळा प्रसिद्ध होऊ लागला.
केसरी
ग.वि. केतकर संपादक असतानाच टिळकांच्या मुलाचे चिरंजीव जयंत श्रीधर टिळक हे संपादकीय विभागात काम करू लागले. साप्ताहिक केसरी सन १९२९मध्ये द्विसाप्ताहिक झाला होता. मूळ केसरी दर मंगळवारी प्रसिद्ध होत असे. नंतर तो शुक्रवारीही प्रसिद्ध होऊ लागला. त्रिसाप्ताहिक झाल्यावर तो रविवारीदेखील प्रसिद्ध होऊ लागला. रविवारच्या आवृत्तीत जे विविध विषय विभाग असत, ते चांगले लोकप्रिय झाले. त्यांतील लघुनिबंध, खेळ व खेळाडू, शेती व शेतकरी इत्यादी सदरे लोकांना आवडत. लंडन व दिल्लीची वार्तापत्रे हेही या आवृत्तीचे वैशिष्ट्य ठरले. लंडनचे वार्तापत्र द.वि. ताम्हणकर लिहीत व दिल्लीचे वार्तापत्र द्वा.भ. कर्णिक. या रविवारच्या केसरीची दखल ग. त्र्यं. माडखोलकरांनी नागपूरच्या तरुण भारतच्या अग्रलेखातही घेतली होती.
गोवा मुक्तिसंग्रामात आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यात केसरीचा विशेष पुढाकार
जयंतरावांच्या कारकिर्दीत केसरीने गोवा मु्क्तिसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राचा लढा या आंदोलनांत विशेष पुढाकार घेतला. पत्राचे धोरण हिंदुसभावादीच राहिले, तरी या दोन्ही लढ्यांचा केसरीने सक्रिय पाठपुरावा केला. संपादक जयंतराव टिळक हे स्वतःच या दोन्ही आंदोलनांत आघाडीवर होते. केसरी पुन्हा अधिकाधिक लोकाभिमुख व स्वागतशील बनला. यामुळे त्रिसाप्ताहिक केसरी हा दैनिक होणे अपरिहार्य होते. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर केसरी वृत्तपत्र दैनिक झाले. वृत्तपत्राचे मतपत्र हे स्वरूप संपुष्टात आले होते. वाचकांना बातम्या हव्या असतात. त्याही केवळ राजकीय नाही, तर विविध विषयांवरील सचित्र बातम्या, हे केसरीकारांच्या लक्षात आले. त्याप्रमाणे केसरीत बदल होणे अपरिहार्य होते.[१]
केसरीच्या धोरणात बदल
केसरी दैनिक झाल्यावर त्याचे धोरण बदलत गेले. संपादकांनी काँग्रेसशी मैत्री केली. काही काळाने जयंतराव राज्यसभेवर गेले. केसरीत इंदिरा गांधीच्या नेतृत्वाचा पुरस्कार सुरू झाला. सन १९८० च्या जून महिन्यात जयंतराव इंदिराबाईंच्या इच्छेप्रमाणे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. जयंतरावांच्या कारकिर्दीत विशेषत १९८०नंतर केसरी दलिताभिमुख झाला. दलितांच्या सामाजिक चळवळींची विशेष दखल घेण्यात येऊ लागली. दैनिक होताना केसरीच्या पहिल्या अंकात म्हणले होते, की 'काळ कोणाकरताच थांबत नाही. थांबला तो संपला हा सृष्टीचा कठोर नियम आहे. हे वारुळाचे वैभव केसरीला नको. त्याऐवजी पत्राचे नवनवीन सतेज रूप पाहण्यात आम्हाला आनंद आहे. किंबहुना, जे नित्यनूतन असते तेच सनातन होय.' असे बरेच नवीन करण्याचा यशस्वी प्रयत्न संपादक जयंतरावांनी केला. जयंतराव टिळक मंत्री झाल्यावर चंद्रकांत घोरपडे केसरीचे संपादक झाले. त्यानंतर, डॉ. शरच्चंद्र गोखले, अरविंद व्यं. गोखले हे संपादक होते.
जहालातून मवाळापर्यंत
जयंतराव टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केसरी वृत्तपत्राचे स्वरूप टिळकांच्या काळात असलेल्या जहालवरून मवाळ झाले. इतकेच काय पण केसरीच्या ध्येय-धोरणांचे निदर्शक म्हणून ओळखला जाणारा श्लोक गायब केला. तो श्लोक असा होता : -
- गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी।
- मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
- नखाग्रांनी येथे गुरूतर शिला भेदुनि करीं।
- भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
जयंतराव टिळक यांनी लिहिलेली पुस्तके
- वारसा (विविध विषयांवरील आत्मचरित्रात्मक लेखांचा संग्रह)
संदर्भ
- ^ बावडेकर, ऋता (2009). महाराष्ट्रातील प्रमुख संपादक. पुणे: दत्तात्रय गं. पाष्टे. pp. 57, 58. ISBN 978-81-8483-217-4.