जडजवाहीर
मूल्यवान धातू व रत्ने यांपासून दागिने तयार करण्याची कला मानवाइतकीच प्राचीन आहे. अश्मयुगात दगड, हाडे, शिंपले हीच मानवाला मूल्यवान वाटत होती. त्यांच्या मण्यांपासून तो कंठभूषणे, कर्णभूषणे, बाहुभूषणे, बिंदी इ. अलंकार बनवीत असे. प्राचीन ईजिप्तमध्ये पहिल्या राजघराण्याच्या काळात (ख्रि. पू. ३१०० ते २८८०) राजपुरुष वा प्रतिष्ठित लोक सुवर्णमुकुट अथवा इतर शिरोभूषणे वापरीत. अकराव्या राजघराण्यापर्यंत म्हणजे ख्रि. पू. २१३३ ते १९९१ पर्यंत ही भूषणे सोन्याचांदीची, परंतु साधी असत. अठराव्या राजघराण्याच्या काळी (ख्रि. पू. १३६१ ते १३५२) हे अलंकार अधिक सौंदर्यपूर्ण, झगझगीत व शोभिवंत बनले. तुतांखामेनच्या काळातील असे अलंकार कैरोच्या वस्तुसंग्रहालयात आहेत.
कर्णभूषणे ख्रि. पू. १५०० नंतर वापरात आली, ती साध्या आकाराची असत. दुसऱ्या रॅमसीझच्या काळात (ख्रि. पू. १४०४ ते १२३७) या कर्णभूषणांच्या आकारात वैचित्र्य आले. कंठहार-माला ख्रि. पू. ३००० वर्षांपासून वापरात होत्या. श्रीमंत लोक अनेकपदरी मणिमाला घालीत. सोन्याच्या किंवा रुप्याच्या तारांत गुंफलेले निळे, पिवळे व तांबडे मणी, अर्धमूल्यवान तसेच पारदर्शक किंवा अपारदर्शक खडे यांच्या तुतांखामेनकालीन माळा सुंदर आहेत. मध्यकाळात (इ. स. पू. सु. १५००) मण्यावरही नक्षीकाम करीत.
कंठहाराच्या मध्यभागी विशेष नक्षीकाम केलेले सुंदर पदक लटकत असे. त्या पदकावर तारका अथवा फुले यांच्या प्रतिमा कोरलेल्या असून त्यांत रत्ने बसविलेली असत. याच काळात गळ्यातील मालादी अलंकार वज्रटीके प्रमाणे रुंद व सुंदर झाले. उत्तर राजकालातील या गळपट्ट्याची रुंदी आणखी वाढून ते रत्नजडित करण्यात आले. तुतांखामेनचा गळपट्टा प्रेक्षणीय आहे. त्यावर तत्कालीन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गळपट्ट्याखालील उरस्त्राण चौकोनाकृती असे. काही उरस्त्राणे सोन्याची व रत्नजडित असत. जुन्या काळात कंकणे मण्यांची वा पाटल्यांसारखी घडीव सोन्याची होती. मध्यकाळात त्यांची रुंदी आणखी वाढलेली असून ती मनगटावर बसविण्यासाठी त्यास सोन्याची कडी असे.
उत्तरकाळात ही कंकणे भरीव सोन्याची आणि रत्नजडित बनली. त्याचे दोन अर्धवर्तुळाकार भाग बिजागरीने जोडलेले असत. पैंजणही त्या काळी रूढ होते. त्यातील रत्ने व इतर अलंकारातील रत्ने यांची रंगसंगती साधलेली असे. त्यांच्या कड्या वाघ, सिंह यांच्या तोंडाच्या आकाराच्या असत. अंगठीवर वापरणाराचे नाव, पदवी वा शुभसूचक चिन्ह कोरलेले असे. याच काळात विशेषतः सोने, चांदी व ब्राँझच्या अंगठ्या रूढ झाल्या. तुतांखामेनच्या काळात राजाचा कमरपट्टा विशेष प्रकारचा असे. त्याला एक शेपटासारखा मागे लोंबणारा भाग असे. पट्टा सोन्याचा आणि अरुंद असून त्याचा पुच्छभाग मण्यांचा असे.
ग्रीसमध्ये जडजवाहीर व दागिन्यांची कला सु. ३००० वर्षे विकसित होत गेली. ख्रि. पू. २६०० ते १९०० हा पूर्व ब्राँझकाळ किंवा विशेषतः ख्रि. पू. २३०० पासूनचा काळ जडजवाहिराच्या दृष्टीने प्रगत होता. येथील सर्वांत महत्त्वाच्या कलावस्तू ट्रॉयमधून व त्याजवळच्या लेम्नॉस बेटावरून आल्या आहेत. यांच्यावर मेसोपोटेमियन व ॲनातोलियन कलेचा प्रभाव आहे. तत्कालीन ड्रेसपिन, कर्णभूषणे व मुकुट इ. वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सोन्याचा पातळ पत्रा, हलक्या हाताने बनविलेल्या नाजुक साखळ्या व त्यांवरील तारकाम व उठावाचे नक्षीकाम असे कलाकामाचे मूळ स्वरूप होते. विशेषतः कणदार उठावाचे काम फारच सुबक असे. मध्य ब्राँझयुगात (ख्रि. पू. १९०० ते ११००) हे दागिने रत्नजडित होऊ लागले. या काळातील ‘मधमाश्यांच्या पोळ्यावरील परस्पराभिमुख मधमाश्यांची जोडी’ ही कलाकृती उल्लेखनीय आहे. उत्तर ब्राँझयुगात या कलेला बहर आला. या काळातील मुख्य प्रकार म्हणजे घडीव मण्यांच्या माळा आणि त्यांतून लोंबणारी पदके. त्यांवर कोरीवकामाच्या जोडीला ⇨मीनाकामही दिसून येते. ख्रि. पू. ८०० ते ६०० या काळात ग्रीकांनी आपल्या सुसंस्कृत शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविले. त्यामुळे फिनिशियन कारागीर ग्रीसमध्ये येऊन राहिले. त्यांनी स्थानिक लोक या कलेत तयार केले. पुन्हा ही कला ग्रीसमध्ये विकसित होऊ लागली. ख्रि. पू. ६०० ते ३३० या काळात मीनाकामास पुन्हा प्रारंभ होऊन ख्रि. पू. चौथ्या शतकात कर्णभूषणे, कंठहार व अंगठ्या यांचा वापर सार्वत्रिक झाला. या काळात जडजवाहिराचे दागिने वापरत होते. प्राणी व पक्षी यांच्या आकाराची पदके गळ्यातील हारात लटकविलेली असत, तर सोन्याच्या पातळ पत्र्याची वाऱ्याने हलणारी पानेफुले तत्कालीन कर्णभूषणात लावलेली असत.
ख्रि. पू. ३३० ते २७ या काळात अलेक्झांडरच्या स्वाऱ्यांमुळे ग्रीक जगताचे स्वरूप पालटले. पूर्वेकडे ग्रीक साम्राज्य विस्तारले. सुवर्णालंकाराचा वापर सार्वत्रिक बनला. कारण अलेक्झांडरने इराणमधून अफाट संपत्ती जिंकून आणली होती. या काळात जडजवाहिराच्या दागिन्यांचे मूळ स्वरूप जुनेच राहिले पण ख्रि. पू. २०० च्या सुमारास नवे आकार-प्रकार पुढे आले. जडावकामाच्या पद्धतीमध्ये बदल झाला. पूर्वीची कला सुवर्णावरील कोरीवकामातच मर्यादित होती. आता सोन्याच्या जोडीला रत्ने आल्याने दागिन्यांत रत्नांच्या जडावकामाला वाव मिळाला.
रोममधील आभूषणांची कला, रंगाच्या परिणामकारकतेमुळे, अर्धमूल्यवान रंगीत खडे वापरण्यावर केंद्रित झाली होती. खड्याचा आकार लंबवर्तुळाकार असे. कोरीवकामातून पौराणिक व शाही दृश्ये कोरलेली असत. राजकुलातील व्यक्तींची चित्रे कोरलेले काही नमुने फारच सुबक आहेत. रोमन लोकांना मीनाकामही अवगत होते. ब्राँझच्या कोरलेल्या भागात अपारदर्शक लाल व पांढऱ्या काचेची पूड वापरून ते मीनाकाम करीत.
ख्रि. पू. ३२०० ते ३००० या काळात मेसोपोटेमिया आणि इराण यांमधील व्यापार वाढला. मेसोपोटेमियात अर्धमूल्यवान खड्यांच्या दंडगोलाकृती मुद्रा रूढ असल्याचे आढळून आले आहे. टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यातही जडजवाहिराच्या दागिन्यांची कला अस्तित्वात होती . सुमेरियन लोकांच्या कबरीत याचे पुरावे सापडले आहेत. या काळात जवाहिरे व सुवर्णकार यांनी ही कला संघटित रीतीने प्रगत केली. मेसोपोटेमियातील सुमेरियन सुवर्णकारांना आणि जवाहिऱ्यांना प्रत्येक प्रकारचे तांत्रिक ज्ञान अवगत होते. धार्मिक जीवनात जडजवाहिराचे स्थान महत्त्वाचे होते. रत्नांच्या ठिकाणी असलेल्या अद्भुत शक्तीमुळेच नव्हे, तर देवदेवतांना अलंकृत करण्यासाठीही जडजवाहिराच्या दागिन्यांचा उपयोग आवश्यक ठरला. युफ्रेटीसच्या तीरावरील अर या नगरराज्यातील कबरीत सापडलेल्या दागिन्यांवरून या कलेचा दर्जा उच्च होता, असे दिसून येते. त्यांतील शिरोभूषणे, कंठहार, कर्णफुले, केशालंकार, कंकणे इ. कलावस्तूंवरून अर हे या कलेचे तत्कालीन केंद्रच असावे.
ख्रि. पू. दुसऱ्या व तिसऱ्या सहस्त्रकात ही कला आशियातील इतर प्रदेशांतही पसरली कारण त्या वेळी वाहतुकीच्या सोयी व व्यापार वाढलेला होता. गुंफणकाम, उठावाचे आणि जडावाचे काम या काळात दर्जेदार होई. कलात्मक दर्जा व तांत्रिक क्षमता चांगलीच वाढली व तिचा प्रसार आशियाई प्रदेशात झाला. ख्रि. पू. तेराव्या शतकात ॲसिरियन जडजवाहिराच्या कलेचे नमुने तेथील पहिली राजधानी आशुर येथे मिळाले आहेत. त्यातील कलेचा दर्जा व तंत्र उत्तम आहे. ॲसिरियन साम्राज्याच्या उत्तरकालात राजे, राण्या, न्यायाधीश आणि सेनाप्रमुख यांनी वापरलेले अलंकार व देवदेवतांचे अलंकार यांच्या दर्जेदारपणाची कल्पना तत्कालीन नमुन्यांवरून येते. ख्रि. पू. नवव्या शतकात इराणमध्येही या कलेची अनेक केंद्रे होती, असे त्या काळातील सापडलेल्या साच्यांवरून दिसते. ख्रि. पू. पहिल्या शतकात ब्राँझचे दागिने इराणमध्ये रूढ होते, त्यांवर प्राणिचित्रे कोरलेली होती. घोड्याच्या खोगिरावरील शोभेचे धातुकाम पश्चिम इराणमधील लुरिस्तान प्रदेशात आढळून आले आहे.
प्राचीन काळापासून भारतात जडजवाहीर व त्यांचे दागिने वापरात आहेत. ऋग्वेदात याचे उल्लेख आढळतात. चेन्हु-दडो हे रत्नजडित दागिन्यांच्या निर्मितीचे केंद्र होते, येथील दागिने ख्रि. पू. ३००० पासून निर्यात होत.
सिंधू संस्कृतीच्या ख्रि. पू. २५०० ते १५०० या काळातील अलंकार उत्खननातून मिळाले आहेत. त्यांत सोन्याची शिरोभूषणे, सोन्याची व ब्राँझची वर्तुळाकृती व कमलाकृती कर्णभूषणे, निरनिराळ्या रंगांचे मणी ओवलेले अनेकपदरी कंठहार तसेच खापरी, ब्राँझ, सोने व चांदीच्या पोकळ बांगड्या व अंगठ्या इत्यादींचा समावेश होतो. कमरपट्टे, पायातील साखळ्या, तोरड्या व पैंजण हेही वापरात असावे. तत्कालीन कारागिरांना धातू वितळविणे, शुद्ध करणे, मिश्रधातू बनविणे. साच्यातील ओतकाम, खोदकाम, उठावाचे व जडावाचे काम इ. प्रक्रिया ज्ञात असाव्या. तसेच तार ओढणे, मणी तयार करून त्यांना भोके पाडणे, खड्यांना झिलई देणे ही कामेही ते करीत. ख्रि. पू. १५०० या काळात भारतात मुकुट, उरोभूषणे, कंठहार, कर्णभूषणे, कमरपट्टे आणि कंकणे इ. अलंकार वापरात होते. वधूंनी घातलेल्या अलंकारांचे वर्णन ऋग्गवेदात आहे. तसेच सोन्यामधील अद्भुत शक्तीचे वर्णन यजुर्वेदात आहे. ख्रि. पू. ४५० या काळातील अलंकार नेपाळात बुद्धाच्या अवशेषासमवेत सापडलेले असून त्यांत सोन्याची फुले, अर्धमूल्यवान रत्नांचे मणी, पोवळे व मोती इ. आढळतात. मौर्यकाळात (ख्रि. पू. ३२१ ते २००) व त्यानंतरच्या सुंगकाळात पुरुष व स्त्रिया जडजवाहिरांचे भारी अलंकार वापरीत असत. तक्षशिला येथे सापडलेल्या ख्रि. पू. पहिल्या शतकातील अलंकारात सोन्याची सुशोभित शिरोबंध व केशबंध होते. मध्य युगात (इ. स. दुसरे ते अकरावे शतक) भटक्या जातीच्या टोळ्यांनी आपले मूल्यवान जडजवाहीर बरोबर घेतले आणि ते पश्चिम यूरोपकडे गेले. त्यामुळे यूरोपात ही जडजवाहिराची कला प्रचलित झाली व पुढे वाढीस लागली. तिकडील अलंकारांत पक्ष्यांच्या प्रतिमा व इतर सुंदर आकृत्या यांवर रत्ने जडविलेली असत. तसेच बाहुभूषणांवर पिळाचे नक्षीकाम करीत. फ्रान्स, ब्रिटन व आयर्लंडमधील उत्खननांतून याचे पुरावे सापडले आहेत. तारेचे गुंफणकाम व उठावाचे काम यांचे मिश्रण आयरिश कलेत झालेले होते. या कलांत रत्नांना पैलू पाडण्याचे कामही पुढे रूढ झाले. वैयक्तिक वापरापेक्षा कुमारी मेरीचे किंवा इतर ख्रिस्ती संतांचे पुतळे अलंकृत करण्यासाठी मूल्यवान रत्नांचा वापर अकराव्या शतकापर्यंत होई.
भारतात कुशाणकाळात (इ. स. ३०० पर्यंत) कर्णभूषणे अधिक लांबीची झाली. कंठहार पीळदार साखळीचे असून त्यांत निरनिराळ्या आकारांचे मणी गुंफलेले असत. बाहुभूषणे रुंद व जडावकाम केलेली होती. बांगड्या सोने, ब्राँझ व काच यांच्या बनवित. अंगठी नक्षीदार असून तिच्यावर पैलूदार हिरा जडविलेला असे. पायांतील पैंजण, साखळ्या यांच्या जोडीला वाळेही वापरात होते.
गुप्तकाळ (३०० ते ६००) हा सुवर्णकाळ असल्यामुळे त्या काळातील लोकांत दागदागिन्यांचा वापर अधिक होता. कर्णभूषणांमध्ये विविध प्रकारची चक्राकार कर्णफुले होती. ५०० ते १२०० या काळातील कंठहारांमध्ये नक्षीकाम केलेली व रत्नजडित गोल पदके असत तसेच कर्णभूषणे कानाजवळ केसात गुंतविलेली असत. बांगड्या सोन्या-रुप्याच्या व अंगठी खड्याची असे. कमरपट्टा मण्यांचा बनविलेला व त्यावर लोंबत्या साखळ्यांचे नक्षीकाम केलेले असे. पायांतीले पैजण, वाळे व तोडे सुंदर नक्षीचे असत.
इ. स. १२०० नंतर भारतात आलेल्या मुसलमानी आक्रमकांनी आपले अवजड पोशाख इकडील उष्ण हवामानामुळे टाकून हलके कपडे आणि दागिने वापरण्यास सुरुवात केली. जडजवाहिराचे दागिने राजमान्यता पावले. मोगल बादशाह अकबर (१५५६ ते १६०५) मोत्यांचा व रत्नांचा कंठा दरबारात वापरी. त्याच्या डोक्यावरील पगडीवर दुहेरी पदरांच्या मोतीमाळांनी बांधलेला शिरपेच व बोटांत पाचूच्या अंगठ्या असत. जहांगीर (१६०५ ते १६२७) कानांत हिऱ्यामोत्यांची कर्णफुले, गळ्यात रुळणारे लांब रत्नहार आणि मोतीहार वापरीत असे. शहाजहानच्या (१६२८ ते १६६६) शिरपेचात कोहिनूर हिरा व इतर रत्ने बसविलेली होती. त्याच्या कंठहारात हृदयाकार रत्नजडित पदक शोभत असे. मध्यभागी लाल रत्ने जडविलेली बाहुभूषणेही तो वापरी. शहाजहानच्या काळात खंजीर व तलवारीच्या मुठी आणि त्यांच्या म्यानाही रत्नजडित असत. तसेच त्याचे मयूरासन रत्नजडित सोन्याचे होते. औरंगजेबानंतरचे बादशाहा रत्नखचित कंकणेही वापरीत. राजस्त्रिया कपाळावर रत्नजडित बिंदी वापरीत. त्यांची कर्णभूषणे व केशभूषणे रत्नजडित व मोत्यांची असत. विवाहीत स्त्रिया मोत्यांची रत्नजडित नथ वापरीत. या काळातील कंठहार, वाकी (भुजभूषणे), बांगडया, अंगठ्या, कमरपट्टे, पैजण, शिरबंध, कर्णफुले, बिंदी व नथ हे सर्व स्त्रियांचे अलंकार सुवर्णाचे व रत्नजडित असत.
चीनमध्ये जडजवाहिरांचे दागिने वापरण्याऐवजी ते पोशाखावर जडविण्याकडेच त्यांचा कल होता कारण त्यांचे कपडे संपूर्ण शरीर झाकणारे असत. त्यामुळे पाश्चात्त्य देशांच्या तुलनेने चीनमध्ये ही कला अप्रगत वाटते. कंठहार, कंकणे, कर्णभूषणे हे प्रकार चीनमध्ये क्वचितच दिसत पण शिरोभूषणे व केशभूषणे यांचा वापर आहे. स्त्रिया मणिमाळांचा उपयोग गळ्यात, डोक्यावर किवां कमरेस बांधण्यास करीत. हे अलंकार वापरण्यामागील त्यांचा हेतू वैभवप्रदर्शनाचा नसून निव्वळ वैयक्तिक सौंदर्यदृष्टी हाच असावा. शांग राजकाळात (ख्रि. पू. १२०० ते १०००) हाडे व हस्तिदंताचे [→ हस्तिदंतशिल्पन] कचबंध लोकप्रिय होते. त्यांवर प्राणी किंवा पक्ष्यांचे आकार कोरलेले असत. ख्रि. पू. चारशेच्या काळात चिनी स्त्रीपुरुष कमरपट्टे वापरीत असावेत, असे दिसते. पट्ट्यांच्या आकड्यावर काल्पनिक सौंदर्याकृती, पक्षी किंवा ड्रॅगनचे आकार ब्राँझमध्ये कोरलेले असून त्यांवर सोने, चांदी व रत्ने यांचे जडावकाम केलेले असे. थांग राजकाळात (६१८ ते ९०६) तारेचे गुंफणकाम व कणदारीकाम केलेले केसातील आकडे, कंगवे, कर्णफुले वापरात होती. कपड्यावरील भरतकामासाठीही अशीच कलाकुसर केलेली फुले वापरीत. सुंगकाळात (९६०–१२७९) या केशभूषणांवर फुलपाखरे किंवा फुलांचे आकार आले व काहींवर मोती किंवा लहान खडे जडविले जाऊ लागले. याच काळात चालताना हालणारी केशभूषणेही वापरात होती. मिंगकाळात (१३६८ ते १६४४) उठावाचे व जडावाचे काम केलेले दागिने होते पण ते साध्या आकाराचे व हलक्या प्रकारचे असून त्यांवर अर्धमूल्यवान खडे वापरलेले असत. एकंदरीत चीनमध्ये मूल्यवान रत्नांचा वापर फार कमी आहे. ख्रि. पू. २०० ते इ. स. ६०० या काळात जपानमध्ये अंगभर कपड्यांमुळे दागिन्यांचा वापर फारसा नसे. १६१६ ते १८६८ या काळात गेशा आणि राजस्त्रिया केशभूषणे वापरीत. सामान्य लोकांत दागिन्यांचा वापर नसल्यामुळे ही दागिन्यांची कला जपानमध्ये अप्रगत राहिली. इ. स. १६४० मध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचा शोध हॉलंडमध्ये लागला व त्यामुळे जडजवाहिराच्या दागिन्यांचे स्वरूपच पालटून गेले. स्पेनमध्ये ही कला अधिक प्रगत झाली. पानाफुलांनी युक्त अशा सौंदर्याकृती तयार करून त्यांवर पैलू पाडलेले हिरे बसवित. इतर यूरोपीय प्रदेशात सतराव्या शतकात सोन्याऐवजी चांदीचा उपयोग करून त्यावर रत्न जडवित. हिऱ्याला २४ ते ३६ पैलू असत. त्यांमुळे त्यांचे तेज व चमक वाढली. पुढे हिऱ्याचे पैलू आणखी वाढून ते ५० पर्यंत झाले. रत्नलंकार किंवा अंगठीमध्ये आता पूर्वीप्रमाणे एकच मोठे रत्न जडविण्याऐवजी अनेक पैलूदार लहान लहान खडे वापरले जाऊ लागले. त्यांतील वैचित्र्य व विविधता वाढली. कंठहार व त्यांतील रत्नजडित पदके, डोक्यावरील केसांत किंवा टोपीवर एक खडा व पिसे इ. वापरण्याचा प्रघात रूढ झाला. धनुष्याकृती अलंकार अधिक लोकप्रिय होते. सतराव्या शतकाच्या अखेरीस हिऱ्याच्या पैलूंची संख्या ५८ पर्यंत वाढली व तो अधिकच तेजस्वी बनला. हिरेमोती जडविलेल्या उठावाच्या प्रतिमा कंठहारात व पदकात असत.
अठराव्या शतकांत कर्णभूषणे व कंकणे यांची रंगसंगती साधण्याकडे लोकांचा कल वाढला. खरे हिरे सामान्य लोकांना घेणे व वापरणे अशक्य होत गेल्यामुळे कृत्रिम हिरे प्रचारात आले. या शतकाच्या मध्यकाळात जडजवाहिराच्या दागिन्यांमध्ये पूर्वीपेक्षा साधेपणा अधिक वाढला व रत्नांतील रंगसौंदर्याबाबतची अभिरुचीही बदलली. आता फुलापानांचे नैसर्गिक आकार बनविताना हिऱ्याभोवती पाचू, माणिक, लाल, पुष्कराज, नील अशी इतर रत्ने जडवून ती अधिक वास्तव बनविण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागला. एकोणिसाव्या शतकात यूरोपमध्ये अर्धमूल्यवान जडजवाहिराला महत्त्व आले. रोजच्या वापरासाठी सामान्य मध्यमवर्गीय लोकांना त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. उठावाचे नाजुक नक्षीकाम–तारकामयुक्त आणि काळ्या वा निळ्या रंगाचे मीनाकाम केलेल्या कोंदणात बसविलेल्या रत्नांचे अलंकार (कॅमीओ) वापरात आले. रत्नजडित कंकणे आणि लोंबती कर्णभूषणे रंगसंगती सांधलेल्या लांबलचक कंठहाराबरोबर लोकप्रिय झाली. ब्राझील व मेक्सिकोमधून अर्धमूल्यवान पुष्कराज (टोपाज), जांभळी व हिरवी रत्ने (ॲमेथिस्ट्स, ॲक्वामरिन्स) यूरोपमध्ये येऊ लागली. नकली सोने वापरून जडजवाहिराचे दागिने आता मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले व वापरात आले. विसाव्या शतकात सोन्यासारख्याच मूल्यवान अशा प्लॅटिनम धातूचा उपयोग दागिने बनविण्यासाठी होऊ लागला. अमेरिकेत जडजवाहिराच्या दागिन्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यंत्रांचाही उपयोग जडण–घडणीच्या कामात होऊ लागला. घडणीचे तंत्र व साहित्य यांत अतिशय वाढ व प्रगती झाली आहे. स्त्रियांच्या दागिन्यांच्या संचाप्रमाणे पुरुषांचेही रत्नसंच प्रचलित झाले. त्यांत सिलाच्या अंगठ्या, तपकिरीच्या डब्या, टायपिन, स्कार्फपिन, सिगारेटच्या डब्या, प्रज्वलक व होल्डर, बटने किल्ली–साखळ्या, घड्याळांची आवरणे व साखळ्या इ. विविध नित्योपयोगी वस्तू असतात. अमेरिकेतील अंगठ्यांमध्ये रंगसंगत हिरे बसविलेले असतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्लॅटिनम दुर्मिळ झाल्यामुळे पॅलॅडियम धातूचा उपयोग होऊ लागला. आता सोन्या–चांदीचा मुलामा दिलेल्या मिश्रधातूचा उपयोग केला जातो. कृत्रिम हिरे व मोती अलिकडे खऱ्या हिऱ्यामोत्यांपेक्षा तेजस्वी व चमकदार बनतात व माफक किंमतीमुळे ते लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे रत्नजडित सेफ्टीपिनची जागा रत्नकंकणांनी घेतली आहे. आधुनिक पद्धतीच्या जडजवाहिरांच्या दागिन्याचे उत्पादन आता अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर होते.
भारतात मोगल सत्ता नष्ट होऊन ब्रिटिश राजसत्ता आली, त्यामुळे कलाकारांना राजाश्रय उरला नाही. तसेच पूर्वीप्रमाणे जडजवाहिराच्या दागिन्यांच्या कलाकुसरीचे काम होईनासे झाले. शुद्ध सोन्याचे पण साधे व हलके दागिने तयार होऊ लागले व ते लोकप्रिय झाले. चांदीचा वापर अधिक होऊ लागला. मीनाकामाचा दर्जाही खालावला. या काळात म्हैसूर, सावंतवाडी, विशाखापट्टणम् आणि विजयानगर या ठिकाणी जडावाच्या दागिन्यांचे परंपरागत प्रकार फार सुबक तयार होत. कमीत कमी सोन्याचा व अल्पमूल्य रत्नांचा वापर करूनही तेथील कलाकारांनी या दागिन्यांचे कलात्मक मूल्य वाढविले. उठावाच्या कामातील दर्जेदारपणामुळे हे दागिने पोकळ व हलके असले, तरी भरगच्च व ठसठशीत दिसत. पंजाब व काश्मीर येथेही उच्च दर्जाचे दागिने तयार होत. तांबूस सोन्यामधील तारकाम, जडावाचे काम व मीनाकाम हे त्यांचे विशेष होते. कलेच्या दृष्टीने हलके, परंतु मनमोहक असे दिल्लीचे दागिनेही लोकप्रिय होते. चांदीसोन्याचे तारगुंफणयुक्त जाळीदारकाम कटकप्रमाणेच डाक्का, मुर्शिदाबाद, तंजावर व त्रिचनापल्ली येथेही होत असे. दक्षिण भारतात तयार होणाऱ्या दागिन्यांचा विशेष म्हणजे त्यांवरील पौराणिक घटनाप्रसंगाचे चित्रण. ख्रिस्ती धर्मपंथियांना आवडणारे क्रॉस किंवा हृदयकार असलेले ताईत तसेच जपमाळा व मणिबंध हे त्रिचनापल्ली येथील जवाहिऱ्यांचे खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानमधील जुन्या संस्थानांमध्ये दागिन्यांच्या रूपात जडजवाहीर विपूल प्रमाणावर आहे. त्यात स्त्रीपुरुषांचे सर्व प्रकारचे अलंकारच नव्हे, तर मिरवणुकीच्या हत्ती–घोड्यांचेही अलंकार आहेत. जयपूर येथील महाराजांच्या कंठ्यातील मोती गोटीएवढे मोठे आहेत.
भारतीय स्त्रियांचे अलंकार डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत वापरता येतील, इतक्या विविध प्रकारचे आहेत. उदा डोक्यावर मोत्यांची जाळी व पिंपळपान कपाळावर बिंदी नाकात नथ वा चमकी कानात डूल, कुडी, बाळी, भोकरे, वाळी किंवा बुगडी केसांच्या वेणीवर मूद, अग्रफुले व गोंडे गळ्यात मंगळसूत्र, डोरले, साज, लफ्फा, तन्मणी, वज्रटिका, सरी, चंद्रहार, चपलाहार, एकदाणी व इतर अनेक प्रकारचे कंठहार दंडात वाकी, बाजूबंद मनगटात पाटल्या, गोठ, तोडे, बिलवर बोटात अंगठी पायात साखळ्या (तोडे), पैंजण, वाळे, तोरड्या पायाच्या बोटात जोडवी, विरोदी व मासोळी इत्यादी. भारतीय पुरुषांचे अलंकारही विविध आहेत. उदा., पागोट्यावर कलगी–तुरा, शिरपेच कानात भिकबाळी गळ्यात कंठा हातात सलकडी, पोची बोटात अंगठी व छल्ले इत्यादी. परंतु बोटात अंगठी व गळ्यात लॉकेट यांशिवाय पुरुषी अलंकार फारसे वापरात नाहीत. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यानच्या काळात जपानी कल्चर्ड मोती भारतात आले. त्यानंतर अमेरिकन कृत्रिम मोती आणि रत्ने आली. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे त्याचा कमीत कमी वापर करून जडजवाहिराचे दागिने नवीन, सुंदर व आकर्षक घाटांचे तयार होऊ लागले आहेत व ते लोकप्रिय होत आहेत. अलिकडे स्त्रियांची दागिन्यांची फॅशन वाढत आहे. सातत्याने नवीन प्रकार येत आहेत. पूर्वीचे अनेकपदरी चंद्रहार, चपलाहार इ. मागे पडले असून त्यांची जागा अनारकली, चंपाकली, अभिनेत्री या हारांनी घेतली आहे. गोठ–तोड्यांऐवजी फुगीर कंगन लोकप्रिय होत आहे. आता आकृतिबंध आणि खडे यांची रंगसंगती साधणारे या दागिन्यांचे संच अधिक लोकप्रिय होत आहेत. जुन्या प्रकारांपैकी लफ्फ्याची लोकप्रियता अजून टिकून आहे. मोत्यांची नथ व खड्यांचा साज असलेले जडावाचे कारवारी मंगळसूत्र नव्यानेच लोकप्रिय होत आहे.
दागिने घडविण्याचे सर्व काम सोनार हाताने करतो. सोने तापविण्यासाठी भट्टी (शेगडी) व भाता असतो. सोने वितळविण्यासाठी मूस लागते. तीतून सोन्याचा झालेला द्रव साच्यात ओततात. तो थंड झाल्यावर त्यातून सोन्याची लांब पट्टी तयार होते. ती ऐरणीवर हातोडीने ठोकून ठोकून तिला आवश्यक तो आकार व जाडी दिली जाते. चिमटा, पकड, कात्री, छिन्नी व कानस यांचे लहान मोठे प्रकार लागतात. एक बाकदार टोकाची फूंकनळी व नक्षीकामाचे विविध ठसे सोनाराजवळ असतात. सोन्याचांदीची तार ओढण्याचे उपकरण असते. तसेच झाळकाम व झिलई करण्यासाठी काही रसायने वापरतात. ग्रामीण सोनार दागिने घडविण्याचे काम एकटाच करतो. जवळच्या तुटपुंज्या साधनसामग्रीमुळे तो आपल्या कसबी हातावरच विसंबून असतो. शहरांमधून दागिन्यांचे उठावकाम, जडावकाम, नक्षीकाम, गुंफणकाम, मीनाकाम व जोडकाम करणारे निरनिराळे कलाकार आपापल्या कामांत निष्णांत असतात. परिणामतः त्या सर्वांच्या संघटित कामामुळे तयार होणारा दागिना निर्दोश परिपूर्ण होतो.
मुंबई भारताचे प्रवेशद्वार असल्यामुळे तेथिल जडजवाहिराचे दर्जेदार दागिन्यांचे उत्पादन सर्वात अधिक आहे. येथील जवाहिरे प्राचीन व आधुनिक दोन्ही पद्धतींचे दागिने तयार करतात. जडजवाहिराच्या दागिन्यांचे उत्पादन व व्यापार करणाऱ्या अनेक उद्योगसंस्था मुंबईत आहेत. देशातील सर्व थरांमधील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संस्था आवश्यक त्या त्या प्रकारचे कसबी कलाकार पदरी ठेवतात. जडजवाहिरांच्या दागिन्यांचे आधुनिक प्रकार मुंबईत चांगले तयार होत असले, तरी जुन्या प्रकारच्या दागिन्यांच्या बाबतीत दिल्ली, जयपूर, लखनौकडील कला अजुनही उच्च दर्जाची मानली जाते. मूल्यवान नव्हे, तर सौंदर्यवर्धक म्हणून जडजवाहिराचे दागिने भारतात गरीब व श्रीमंत सर्वांना सारखेच प्रिय आहेत.
भारतातून रत्ने व जडजवाहिरांची फार मोठी निर्यात होऊ लागलेली आहे. निर्यात होणाऱ्या एकूण मालामध्ये रत्ने व जवाहिर यांच्या निर्यातीच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा ३०० टक्के वाढ झाली आहे. ती १९७१–७२ मध्ये ७२ कोटींची व १९७३–७४ मध्ये १०५ कोटी रूपयांपर्यंत वाढली. जडजवाहिरांच्या निर्यातीमध्ये खरे हिरे, पाचू, निल, माणिक, रत्ने व कृत्रिम जवाहीर इत्यादींचा समावेश आहे.