जगदंबामाता मंदिर (टाहाकरी)
टाहाकरी हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे. या मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीत स्त्रियांच्या कोरीव मू्र्ती आहेत.
मंदिराची रचना
हे मंदिर भूमिज प्रकारचे असून त्याचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा आहे.[१]
हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मुखमंडप, त्यामागे दोन बाजूस एक एक अंतराळयुक्त उपगर्भगृह असलेला मंडप, त्यामागे अंतराळ व मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपाला वामनभिंत असून त्यावर प्रत्येक बाजूस पाच वामनस्तंभ आहेत. याबरोबरच पुढे दोन आणि मागे दोन असे एकूण चार मुख्य स्तंभ आहेत. एकूण बारा स्तंभांवर मंडपाचे घुमटाकार छत पेललेले आहे. या छताच्या उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या वर्तुळाकार भागांमध्ये ठरावीक अंतरावर नर्तकांच्या आणि वादकांच्या मूर्ती आहेत. मंडपाच्या मुख्य स्तंभांवर खांबाच्या चारी बाजूंवर ठरावीक पातळीत असणाऱ्या पट्ट्यांवर आकृतीशिल्पे आहेत. स्तंभावर कीचकहस्त आहेत. अर्धस्तंभ आणि चतुर्थकस्तंभ तुलनेने साधे असून त्यावर नागशीर्षहस्त आहेत. अंतराळाला आयताकृती छत असून त्यात मधोमध छोटा घुमट आहे. अंतराळाच्या मागे चौरसाकृती गर्भगृह असून त्यात मागील बाजूस मूर्तीकरिता पीठ आहे.
मंदिराचे बाह्यांग साधे आहे. खाली पीठांचे तीन थर आहेत. सर्वात वरच्या थरावर चौकटची नक्षी आहे. त्यावर कलश आणि मंची आहे. गर्भगृहाच्या बाहेरील तीन भद्रांवर तीन देवकोष्ठे आहेत.
राष्ट्रीय संरक्षित स्मारक
या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[२]
संदर्भ
- ^ हेन्री कझिन्स. मेडिईव्हल टेम्पल्स ऑफ दि दख्खन (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]