Jump to content

छाया महाजन

डॉ. छाया महाजन Archived 2021-11-23 at the Wayback Machine. या एक मराठी लेखिका आहेत. त्या औरंगाबाद येथील इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या आहेत.

महाजन यांनी मुन्शी प्रेमचंद, मोपॉंसा, सॉल बेलो आदी लेखकांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. डॉ. छाया महाजन यांची तपशीलवार माहिती www.chhayamahajan.com Archived 2021-11-23 at the Wayback Machine. ह्या संकेतस्थळावर मिळेल.

पुस्तके

  • An Inspirational Journey: Pratibha Devisingh Patil (सहलेखिका - रसिका चौबे)
  • एकादश कथा (कथासंग्रह)
  • ओढ (कथासंग्रह)
  • कॉलेज (कादंबरी)
  • गगन जीवन तेजोमय (ललित)
  • तन अंधारे (कादंबरी)
  • दशदिशा (ललित निबंध)
  • धुळीच्या चमकत्या पडद्याआड (ललित लेखसंग्रह)
  • नकळत (लघुकथासंग्रह)
  • पाण्यावरचे दिवे ((ललित लेखसंग्रह)
  • मानसी (कादंबरी)
  • मुलखावेगळा
  • मोरबांगडी (ललित लेखसंग्रह)
  • यशोदा
  • राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
  • राहिलो उपकाराइतुका (कथासंग्रह)
  • वळणावर (कथासंग्रह)
  • स्पर्श (कथासंग्रह)
  • हरझॉग (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - सॉल बेलो)
  • होरपळ (अनुभवकथन)

पुरस्कार आणि सन्मान

  • पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार.
  • ६वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जालना येथे १७/१८ जानेवारी २०१५ या काळात झाले; अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या.
  • ’कॉलेज’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा वि.स. खांडेकर पुरस्कार (नोव्हेंबर २००७).
  • विनायकराव चारठाणकर फाउंडेशनचा पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार

मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. छाया महाजन यांनी केलेले भाषण

भाषेचा विषय आला की मराठीचा उपयोग इंग्रजी व हिंदीस बहिष्कृत करण्यासाठी होतो. फाजील भाषा भांडणे वा मातृभाषेची कळकळ दाखवणे सोडून या निरुत्पादक चर्चा त्वरित थांबवल्या पाहिजेत. उलट भाषेने सर्वसमावेशक राहून इतर भाषांमधील रुळलेले शब्द विशिष्ट अर्थासह स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते, असे प्रतिपादन डॉ. छाया महाजन यांनी केले.

आपली भाषा आपला प्रांत, देशाला बांधून ठेवणारी नाळ असते. आपली मने तिच्याशी जुळलेली असतात. भाषा संस्कार व संस्कृतीशी बांधून ठेवणारी असते. मी इंग्रजीत का लिहीत नाही, असे अनेकजण विचारतात. परंतु माझ्या अंतकरणातून ती भाषा उमलली नाही, परंतु ती भाषा समृद्ध आहे. सध्या मराठीच नव्हे, तर सर्व भारतीय भाषांसमोर इंग्रजी प्रश्नरूपाने उभी आहे. तिला शत्रूसारखे मानले जाते. भारतात द्विभाषिकच नव्हे, तर बहुभाषिक लेखक आहेत. मराठीत लिहिले तर अस्सल आणि इंग्रजी लिहिले तर खोटे होते काय? इंग्रजी साम्राज्य अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अनेक बेटांमध्ये होते. तेथे ही भाषा टिकली आणि तिला आपोआप महत्त्व आले. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचा परिणाम भाषेवर आपोआप होतो.

नवीन मराठी शाळा चालू न करण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे भाषेच्या नाळेवरच आघात होईल. परंतु या निर्णयाविरोधात किती मराठी भाषिक उभे ठाकले, हा प्रश्न आहे. मराठीच्या भवितव्याची चिंता वाहणाऱ्यांची मुले इंग्रजी शाळांमध्ये जाताना दिसतात. प्रथम भाषा म्हणून सोडाच, परंतु तृतीय भाषा म्हणूनही मराठीचा आग्रह धरला जात नाही. सध्या आरोग्य, विज्ञान, कृषी, पर्यटन आदी माहितीपर साहित्य पुस्तकांच्या स्वरूपात येत आहे. यात वाङ्मयीन साहित्य अंग चोरून उभे आहे. वाङ्मय रूची व वाङ्मय दर्जाचे प्रश्न भेडसावत आहेत. वाचन संस्कृतीची घसरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मोबाईल, व्हॉटसॲपवरील संदेश, संगणक ई-मेल यातून नवीनच लिखित भाषा तयार होत आहे.

महदंबेचे जन्मस्थळ

महदंबा जालना जिल्ह्यातील होती, असा उल्लेख मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या कार्यवाह संजीवनी तडेगावकर यांनी प्रास्ताविकात केला. परंतु कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण येथील असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषण संपताना सभागृहात उपस्थित असलेले महदंबा मासिकाचे कार्यकारी संपादक उद्धवराज प्रज्ञासागर उभे राहिले आणि महदंबा जालना जिल्ह्यातल्या रामसगावची असल्याचे सांगितले. संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी मात्र महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.

महानुभाव पंथातील महदंबा ही आद्यकवयित्री मानली जाते, असे सांगून ती कोणत्या जिल्ह्यातील होती यावर वाद करण्याची गरज नाही, असे छाया महाजन म्हणाल्या.