Jump to content

चेतना

चेतना - (इंग्रजी शब्द - Consciousness)

पृथ्वीवरील सर्व वस्तुमात्रांचे व जीवमात्रांचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

सचेतन आणि अचेतन असे ते दोन प्रकार आहेत. ज्यांच्यामध्ये चेतना आहे ते सचेतन आणि ज्यांच्यात ती नाही ते अचेतन.

चेतना आणि मन

सहसा, चेतना आणि मन या गोष्टी अभिन्न आहेत, असे मानले जाते; पण मानसिक चेतना, जाणीव ही अशी एक निव्वळ मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा त्याची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते. मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन (unconscious), अधोमानसिक (submental) किंवा अधिमानसिक (overmental), अतिमानसिक (supramental) अशा वाटतात. - श्रीअरविंद []

चेतनेच्या अवस्था

चेतनेच्या पुढील चार अवस्था असतात.

आत्म्याचे हे चार पाद आहेत आणि ते ओमकार साधनेतून साध्य होतात असे उपनिषदात सांगितले आहे.

०१) जागृत (Waking state) - अकार - वैश्वानर

०२) स्वप्न (Dream state) - उकार - तैजस

०३) सुषुप्ती - स्वप्नविरहित गाढ निद्रा (Deep-Sleep State) - मकार - प्राज्ञ []

उपरोक्त तिन्ही अवस्थांचा अनुभव सामान्य व्यक्ती घेत असते. परन्तु पुढची तुरिया अवस्था मात्र साधनेनी प्राप्त होते.

०४) तुरिया किंवा तुर्या (Turiya) [] - अमात्र

मांडूक्य उपनिषदामध्ये हा सर्व विचार आलेला आहे. त्यामध्ये तुरिया अवस्थेचे वर्णन असे केले आहे.

आत्म्याची चौथी अवस्था, म्हणजे तुरिया अवस्था, हे त्याचे खरे आणि अंतिम स्वरूप आहे, ज्यामध्ये तो अंतर्ज्ञानी आहे, ना पूर्व प्रज्ञा, ना या दोघांचा संयोग,ना सुगम, न समजण्याजोगा, ना अज्ञान. परंतु अदृश्य, अव्यवहार्य, अग्राह्य, अलक्षण, अकल्पनीय, अव्यपदेश, एकात्मप्रत्ययसार, शांत, शिव आणि अद्वैत, जेथे जग, आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील भेदाचे अस्तित्व नाही (मंत्र ७वा) []

या अवस्थेत स्वतःचे मन, इंद्रिये यांच्याकडे साक्षित्वाने पाहता येते. स्वतःच्या स्वरुपाची ओळख झाल्यानंतरच असे साक्षित्व प्राप्त होते. []

चेतनेची उत्क्रांती

श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभाभूत विचार म्हणजे चेतनेची उत्क्रांती.

मूळ सच्चिदानंद ब्रह्मापासून चेतना अंतर्लीन होत गेली - तिचे अवरोहण झाले आणि सृष्टीची निर्मिती झाली. पुन्हा तिचे आरोहण होऊन ती आपल्या मूळ स्वरूपाकडे चालली आहे. चेतनेची उत्क्रांती समजावून घेण्यासाठी आरोहण आणि अवरोहण या दोन संज्ञादेखील महत्त्वाच्या आहेत.[]

पाहा : चेतनेची उत्क्रांती

संदर्भ

  1. ^ Sri Aurobindo (2012). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 28. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  2. ^ Dr.Maithili Joshi. "#EP 9 Mandukya Upanishad - True Self (Atman) and Omkara". Bhandarkar Oriental Research Institute.
  3. ^ a b डॉ.ग.ना.जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ. pp. १०८-१८८.
  4. ^ "मांडूक्योपनिषद". विकिपीडिया. 2023-02-01.
  5. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.