Jump to content

चिंचोका

चिंचोके

चिंचेच्या फळाच्या आतील बी. ही साधारणतः द्विदल व चौकोनी असते. याचे बाह्यावरण लालसर कथ्थ्या रंगाचे असते. दोन शकले केली असता आतील भाग हलक्या पिवळसर किंवा पांढरट रंगाचा असतो.याचा वापर चौसर किंवा त्यासारख्या कोणत्याही बैठ्या खेळात सोंगटी पुढे सरकविण्यासाठी किती दान(गुण) मिळाले आहे ते पाहण्यासाठी करतात. दान टाकण्यासाठी चिंचोक्याची चार शकले घेतात, व तळहातात ती खुळखुळवून जमिनीवर फेकतात. किती शकले पाठीवर आणि किती शकले पोटावर पडली यावरून किती दान पडले ते समजते. साधारणतः एकच शक्कल पाठीवर पडले असेल तर एक गुण, असे समजतात. चारही शकले पाठीवर पडली तर चार गुण आणि चारही पोटावर पडली तर आठ गुण मिळाले असे मानतात. जेवढे दान पडले तेवढी घरे त्या खेळातली सोंगटी पुढे सरकते.

चिंचोक्याच्या ऐवजी कवड्याही वापरता येतात.

चिंचोक्याचे अन्य उपयोग

  • चिंचोक्याचे पीठ करून ते शिजवून खळ बनवतात. खळ सुती कपड्याला कडकपणा आणण्यासाठी किंवा पुस्तकबांधणीत कागदांच्या कडा चिकटविण्यासाठी डिंकाऐवजी वापरतात.
  • थायलंडमध्ये चिंचोक्याची पूड कॉफीत भेसळ करण्यासाठी वापरतात.
  • दुष्काळात चिंचोके भाजतात आणि साल काढण्यासाठी भिजत टाकतात. साल निघालेले चिंचोके शिजवतात, तळतात किंवा त्यांचे पीठ करून अन्नपदार्थ बनविण्यासाठी उपयोगात आणतात.
  • हजारो वर्षे कुचकामी समजले जाणाऱ्या चिंचोक्यांच्या गरामध्ये ४६ ते ४८ टक्के या प्रमाणात एक जेली बनविणारा पदार्थ असतो, असा शोध टी.पी. घोष आणि एस. कृष्णा या दोन भारतीय शास्त्रज्ञांनी १९४२मध्ये लावला. मुंबईच्या डॉ. जी.आर. सवूर यांच्या पेक्टिन बनविणाऱ्या कंपनीने या शोधाच्या मदतीने, ’जेलोस’, ’पॉलिओस आणि ’पेक्टीन’ नावाचे जेली बनविण्यासाठी लागणारे पदार्थ बनविण्याचे पेटंट घेतले. फळांपासून मिळणाऱ्या पेक्टीनपेक्षाही हे चिंचोक्यांपासून मिळणारे पेक्टीन सरस आहे. त्यामुळे आता आता जेली, जॅम(मोरंबा) आणि मार्मलेड बनविण्यास सर्रास उपयोग होतो.
  • चिंचोक्यापासून मिळणारे पेक्टीन फळे टिकविण्यास उपयोगी पडते. ते अगदी थंड पाण्यात किंवा दुधात केलेल्या साखरेच्या संपृक्त द्रावालाही जिलेटिनाइज करते.
  • आईस्‍क्रीम, मेयोनेज आणि चीजसारख्या पदार्थांच्या दृढीकरणास हे चिंचोक्यापासून मिळणारे पेक्टीन उपयोगी आहे.

आयुर्वेदिक उपयोग

चिंचोका पोटात घेतल्यास आंतड्यांना स्तंभक आहे. चिंचोक्याचे पीठ शिजवून ते गरम असताना त्याचा पोटीस म्हणून वापर होतो. चिंचोक्याचे चूर्ण पाण्याबरोबर खोकल्याचे औषध म्हणून सेवन करतात. हेच पाणी तोंडात धरून ठेवल्यास शिथिल झालेली उपजिव्हा ठीक होते..