चाफेकर बंधू
चाफेकर बंधू (नामभेद: चापेकर बंधू) हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांची नावे दामोदर (जन्म २४ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव (जन्म १८८०) अशी होती.
19व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करण्यात या क्रांतिकारकांचा सहभाग होता. पुण्यातील जनता ही नियुक्त केलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या अत्याचारांनी त्रस्त होती. या हत्येत महादेव विनायक रानडे हेही साथीदार होते.
जन्म आणि वैयक्तिक आयुष्य
वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये चिंचवड मध्ये एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.[ संदर्भ हवा ]
वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.[ तारीख?][ संदर्भ हवा ]
प्लेगची साथ
पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवले. जसे की लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.[ तारीख?]
रँडच्या हत्येचा कट
वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रँड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.[ संदर्भ हवा ]
अटक व फाशी
त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभि द्रविड बंधूनी (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) या कटाची बातमी केवळ आर्थिक लाभपोटी (२०,०००रु च्या) सरकारला दिली. नंतर वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चाफेकर बंधू शहीद झाले.[ संदर्भ हवा ]
आत्मचरित्र
दामोदर चाफेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने विठ्ठल गोपाळ खोबरेकर यांनी संपादित करून ते प्रकाशित केले.[१]
चित्रपट
चाफेकर बंधूंवर आणि रॅंडच्या खुनाच्या घटनेवर २२ जून १८९७ हा मराठी चित्रपट निघाला.[२] तर २३ जुलै २०१६ रोजी चापेकर ब्रदर्स हा हिंदी भाषेत अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला.[३]
स्मारक
पुण्यानजीक असलेल्या चिंचवड गावाजवळच्या चौकाला चाफेकर चौक म्हणतात. या चौकात मध्यभागी एका टॉवरमध्ये दामोदर चापेकर यांचा १९७१मध्ये उभारलेला पुतळा होता. मात्र तो पुतळा रस्ता रुंदीकरणाच्या व उड्डाणपुलाच्या कामाच्या कारणाने २०१० मध्ये हलविण्यात आला. त्यानंतर चौकातच चापेकर बंधूंच्या समूह शिल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम याना त्या कारणावरून सतत रखडत होते. क्रांतिकारकांचे पुतळे तीन ते साडेतीन फुटांचे आणि त्यांखाली एक छोटा चौथरा अशा पद्धतीने काम चालू होते. परंतु क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे, बाळकृष्ण पुराणिक आदींनी या प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणल्या. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चालू काम थांबवून नव्याने आराखडा करण्यास सांगितले.[ संदर्भ हवा ]
नव्या आराखड्यानुसार या चाफेकर चौकात दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर यांचे १२ फूट उंचीचे उभे आणि वसुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांचे बसलेले सात फूट उंचीचे पुतळे उभारण्यात आले आहेत. (१०-७-२०१६)[ संदर्भ हवा ]
नोट
सर्वसामान्यपणे चापेकर असा उल्लेख चुकीचा होत असला तरी या क्रांतिकारक बंधूंचे आडनाव 'चाफेकर' असे होते. चापे या नावाचे गाव कोकणात नाही. या खुनाच्या घटनेनंतर चाफेकर बंधू हे आमचे नातेवाईक नाहीत हे पटवण्यासाठी अनेक चाफेकरांनी आपले आडनाव चापेकर आहे असे सांगावयास सुरुवात केली.[ स्पष्टिकरण हवे][ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
- २२ जून १८९७
- चापेकर ब्रदर्स
संदर्भ
- ^ दामोदर चापेकर यांचे आत्मचरित्र - मुंबई पोलिस रेकॉर्ड वरील
- ^ Mehta, Sunanda (16 June 2006). "22 June 1897 will be 25 on Thursday: Milestone for film based on Chapekar brothers who assassinated Rand". The Indian Express. 14 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2009 रोजी पाहिले.
- ^ http://www.filmytown.com/rajsaheb-qualities-chapekar-brothers-dhiraj-mishra/