Jump to content

चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)

चळवळीचे दिवस हे प्रा. अरुण कांबळे यांचे आत्मचरित्र(?) आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्वाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, मंडल आयोग, बौद्धांच्या सवलती, दलित राष्ट्रपती आदी बाबींवरील भूमिका स्पष्ट होते तसेच यादरम्यान घडलेले वाद, आलेली विघ्ने व त्यातून काढलेला मार्ग हेही दिसतात. यांत कांबळे यांची आपल्या तत्त्वांसाठी झगडण्याची वृत्ती दिसून येते.

आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे अरुण कांबळे यांचे वडील ‘आबा’ हे शंकरराव खरात, बंधु माधव यांचे शिक्षक होते. उत्तम गायक असणारे, निरीश्वरवादी, आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष प्रबुद्ध भारताचा अंक लहानग्या अरुणकडून वाचून घ्यायचे. सकाळी शाळा, संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणाऱ्या, रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणाऱ्या आबांनी वाचनालय, बोर्डिंग सुरू केले. कवितावाचन, वक्तृत्वांत बक्षिसे मिळविणाऱ्या व पुढे उत्तम व्याख्याने देणाऱ्या अरुणचे, जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण यांची सांगलीच्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली, तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती. ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता. आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अरुण कांबळेंवर होता. त्यांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनता दलातील दिवस’ मधून वयाच्या तेविसाव्या वर्षी दलित पॅंथरचे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी, देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तान्त पुस्तकात आला आहे. कांबळे यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणाऱ्या मराठवाड्यातील आमदारांसमोर ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले.
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार समतावादी पक्ष, संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटनाछे वर्णन पुस्तकात आहे. युद्धछावणीचे स्वरूप आलेले औरंगाबाद शहर, सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे, रात्रंदिवस सभा, परिषदा, मोर्चे, जेलभरो यांमुळे अवेळी जेवणे, जागरणे, प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट या पुस्तकामुळे डोळ्यांसमोर उभा रहातो.

काँग्रेसविषयी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचीकता कांबळेसरांमध्ये होतीच. वसंतदादा, यशवंतराव, शरद पवार यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच ज्यांना सुरुवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या वसंतदादांनीच कांबळेसरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली. विश्वस्त(?) मंडळावर(?) आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय, चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा (कुणी, कुणाला?)जाहीर केला. पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केले, ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकाऱ्यांनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, आणि त्यांनी राजीनामा दिला. या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.

पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्याकांबद्दल तळमळ असणाऱ्या वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय कांबळ्यांनी घेतला. अनता दलाचे अखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला. सरांनी प्रा.मधू दंडवते,प्रमिला दंडवते आदींच्या सहकार्याने धर्मांतरित बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.
‘महाराष्ट्र टाइम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा, संदर्भसंपृक्ततेचा, शब्दप्रभुत्वाचा, वाक्चातुर्याचा अनुभव देतात. इंदिरा गांधी,मोरारजी देसाई, एस.एम जोशी, वि.प्र सिंग यांच्याशी दलित हक्कांवर चर्चा, बैठकी होत असत. रोखठोक भाषेत, बुद्धिचातुर्य बळावर कांबळे आपले मुद्दे पटवून देत असत.

अरुण कांबळ्यांच्या अभ्यासू, स्वाभिमानी, निःस्वार्थी, तत्त्वनिष्ठ वृत्तीचे, लेखन वाचनाच्या व्यासंगाचे दर्शन या छोटेखानी पुस्तिकेतून घडते.