Jump to content

चंद्रकांत कामत

चंद्रकांत कामत
जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १९३३
धुळे, महाराष्ट्र
मृत्यू २८ जून, इ.स. २०१०
पुणे, महाराष्ट्र
निवासस्थानपुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९५५ ते इ.स. २०१०
मूळ गाव पुणे
अपत्ये सुभाष कामत आणि भरत कामत
वडील मास्टर शांताराम कामत

चंद्रकांत कामत' (२६ नोव्हेंबर, इ.स. १९३३; धुळे, महाराष्ट्र - २८ जून, इ.स.२०१०) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीमधले तबलावादक होते.

बालपण आणि उमेदीचा काळ

पंडित चंद्रकांत कामत यांना संगीत आणि नाटकाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील, मास्टर शांताराम हे गायक-नट होते. त्यांनी मास्टर दीनानाथांबरोबरदेखील अनेक भूमिका केल्या होत्या. चंद्रकांत कामतांनीही रंगपटापासून ते स्त्रीभूमिका करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या. मराठीप्रमाणेच काही हिंदी-उर्दू नाटकांतही त्यांनी काम केले. कंपनी दौऱ्यावर असताना मिळेल त्या ठिकाणी आणि भेटेल त्या तबलावादकाकडून कामत यांनी तबलावादनाचे विविध ढंग आत्मसात केले. शंकर शिवलकर, रामभाऊ वष्ट, पंढरपूरचे दिगंबर वस्ताद, पं. जी. एल. सामंत अशा अनेकांकडून एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी विद्या मिळवली. काही काळ नृत्याचेही धडे घेतले. त्यामुळे आपोआपच कामत यांची पावलेही त्याच दिशेने वळली आणि रंगपटापासून सुरुवात करून पुढे त्यांनी स्त्री-भूमिकाही साकारल्या. मराठीसोबतच उर्दू आणि हिंदी नाटकांतही त्यांनी कामे केली. लहानपणी ज्या वयात त्यांनी आपले वडील गायक नट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर बालनट म्हणून काम करायला सुरुवात केली त्याच वयात तबला शिकण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. पुढे त्यांची नाटक कंपनी बंद पडल्यामुळे कामत पुण्यात आले.

चंद्रकांत कामत हे स्वतः उत्तम तबलावादक असले तरी त्यांनी स्वतंत्र तबलावादनाचे कार्यक्रम क्वचितच केले. आपले सारे कलाआयुष्य त्यांनी तबल्यावर साथसंगत करण्यात घालवले. कलावंतांबरोबर साथ करणे ही काही केवळ तांत्रिक आणि यांत्रिक गोष्ट नसते. प्रत्येक कलावंताची प्रतिभा वेगळी, त्याची मांडणी वेगळी, स्वभावाचे कंगोरे वेगळे आणि प्रत्यक्ष मैफलीत त्याच्या कलेला फुटणारे निर्मितीचे धुमारेही वेगळे असतात. या सगळ्यांची जाणीव ठेवून साथ करणारा कलाकार हा तेवढय़ाच उंचीचा असतो. चंद्रकांत कामत यांनी ती उंची गाठली होती.

कारकीर्द

ज्येष्ठ कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यासह त्यांनी पंधरा वर्षे तबलासंगत केली. पं. मोहनराव कल्याणपूरकर यांनी कामत यांना तालाची पाऊण, सव्वा, अडीच पट करणे, नृत्याचे बोल चटकन तबल्यात बदलणे आणि पाठांतर या बाबतीत वारंवार शाबासकी दिली होती. याच काळात भावगीतांचे कार्यक्रम आणि संगीत नाटकांनाही ते तबल्याची साथ करत होते. कामत यांनी इ.स. १९५५ ते इ.स. १९९१ या काळात आकाशवाणीत स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम केले. या काळात जी. एल. सामंत यांच्यासारख्या कसलेल्या गुरूकडून आणि सामता प्रसाद यांच्यासारख्या दिग्गजाकडून तबलावादनातील अनेक नवे धडे कामतांनी घेतले. तिथेच अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केले. मिळालेल्या या संधीचे त्यांनी सोने केले. इ.स. १९६४ साली ते बनारस घराण्याचे तबलावादक पं. सामता प्रसाद यांचे शिष्य झाले. त्यांचे तबलावादनातील कौशल्य पाहून पं. मोहनराव कल्याणपूरकर यांनीही त्यांची पाठ थोपटली होती. इथेही त्यांनी अनेक बुजुर्गांना साथसंगत केली.

पं. कामत यांचे पं.भीमसेन जोशी, पं.वसंतराव देशपांडे आणि माणिक वर्मा या तीन श्रेष्ठ कलाकारांशी भावबंध जुळले. या तीनही कलाकारांबरोबर कामत यांची साथ अविस्मरणीय ठरली. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबरतर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य कामतांना लाभले. गायक आणि संगतकार यांच्यात अद्वैत निर्माण झाल्याशिवाय गाणे खुलत नाही. भीमसेन जोशींच्या अनेक अजरामर मैफलींमध्ये हे अद्वैत हजारो रसिकांनी अनुभवले आहे. भारतातील इतरही मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी कामत यांना मिळाली. तबल्यावर लय धरताना कलावंताचा मूड समजून घेणे आवश्यक असते. कलावंताला नवे काही सुचण्यासाठी साथीदार तयारीचा असावा लागतो. केवळ लय पकडून ठेवली म्हणजे गाणे रंगते असे होत नाही. कलावंताला त्या स्वरांसाठी लयीचे कोंदण मिळवून देणे तेवढेच महत्त्वाचे असते. कामत यांच्या तबलावादनात या सगळय़ा गोष्टी होत्या. आजकाल मैफलीत साथ करणारे वादक काही वेळा आगाऊपणा करतात. कलावंतापेक्षा आपणच काकणभर सरस कसे आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसा सोस कामत यांनी कधी केला नाही. त्यामुळेच भावगीतापासून ते अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत सगळ्या संगीतप्रकारात त्यांनी आपली मुद्रा उमटविली. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधील त्यांची हजेरी कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही आश्वासक असे.

गौरव

त्यांच्या कलाजीवनात त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळालेच, पण पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला.

बाह्य दुवे

  • [आंतरजालातील लेख मराठी] (मराठी मजकूर)