चंदगड तालुका
चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. चंदगड हा महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो.
चंदगड तालुक्याला जवळपास शहाण्णव लाख हेक्टर्स एवढे विस्तृत क्षेत्रफळ लाभले आहे. या विस्तृत क्षेत्रफळावर सर्वत्र एकसारखी भौगोलिक परिस्थिती आढळत नाही. साधारणपणे तालुक्याची पश्चिम आणि पूर्व अशा दोन विभागामध्ये सरळ-सरळ विभागणी करता येते. यापैकी पश्चिम भाग अतिपावसाळी, डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेला आहे. तर पूर्वेला तुलनेत कमी पाऊस आणि सुपीक जमीन लाभली आहे. त्यामुळे दोन्ही विभागात शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आणि घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्येही थोडाफार फरक दिसून येतो. पूर्वेला भातपेरणी (धुळवाफ) केली जाते. म्हणजे भात मातीत कुरीने पेरले जाते तर पश्चिमेला चिखल करून रोप लागण केली जाते. पश्चिमभाग कोकणी भाषिक प्रदेशाशी सलग्न आहे तर पूर्व भाग कानडी भाषिक प्रदेशाशी सलग्न आहे. त्यामुळे दोन्ही विभागात सांस्कृतिक भिन्नत्व दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटकी बेंदूर आणि पश्चिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. त्यामुळे तालुक्यात चंडगडी बोलीची वेगवेगळी रुपे प्रत्ययास येतात, पूर्व चंदगडी आणि पश्चिम चंदगडी असे उपवर्गीकरणही तेथील बोली भाषेचे करता येते.