Jump to content

गोसीखुर्द धरण

गोसीखुर्द धरण
अधिकृत नाव गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प
धरणाचा उद्देश सिंचन व वीजनिर्मिती
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
वैनगंगा नदी
स्थान पवनी (भंडारा)
धरणाचा प्रकार गुरुत्वीय
बांधकाम सुरू २२ एप्रिल १९८८
ओलिताखालील क्षेत्रफळ २,५०,८०० हेक्टर
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय इंदिरा सागर

भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने इंदिरासागर किंवा गोसीखुर्द (गोसेखुर्द) धरणाची स्थापना गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प म्हणून झाली. धरणाचा पाया २३ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवला होता. या ठिकाणी ९२ मीटर उंच आणि ६५३ मीटर लांबीचे कन्जेंट गुरुत्व धरण आहे. हे धरण सुमारे २४९ गावांचच्या पुनर्वसनानंतर तयार झाले आहे. सध्या, धरणाची ठिकाणे आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील सिंचन आणि विजेची गरज पूर्ण होते.[]

या प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती. हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे,याची किंमत वाढत वाढत सन २०१० मध्ये रुपये ११,५०० कोटी झाली होती. या प्रकल्पाची सुमारे ९०% कामे झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. दोन विमोचक, चार उपसा सिंचन योजना व आसोलामेंढा तलावाच्या नुतानिकरनाद्वारे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

संबंधित नद्या व प्रकल्प

पवनी तालुक्यातील गोसीखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.[]

बाधित गावे

या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३४ पूर्णतः तर अंशतः १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावे बाधित झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टरपैकी १२ हजार ३६१ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे, तर नागपूर जिल्ह्यातील ३३.३६ हेक्टरपैकी २७.६६ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६८२ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ६३२ हेक्टर शेतजमीन संपादित झाली आहे.[]

सिंचन क्षमता

भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या ३ जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर आहे. या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाला दोन कालवे असून, डाव्या कालव्याची लांबी २३ किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ९९ किलोमीटर आहे.[]

पर्यटन

पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होते.[]

संदर्भ

  1. ^ "गोसेखुर्द धरण | भंडारा जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत". 2023-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2021-09-18). "दहा प्रकल्पांच्या पाण्याचा भार एकट्या गोसेवर". Lokmat. 2023-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ a b author/lokmat-news-network (2022-01-11). "भूमिपूजनानंतर तब्बल ३४ वर्षांनी भरला गोसेखुर्द प्रकल्प; २४५.५० मीटर जलपातळी". Lokmat. 2023-01-07 रोजी पाहिले.
  4. ^ author/lokmat-news-network (2021-12-13). "बोचऱ्या थंडीत पर्यटकांची पावले 'गोसी खुर्द'कडे". Lokmat. 2023-01-07 रोजी पाहिले.