गोवा कला अकादमी
गोवा कला अकादमीची स्थापना गोव्यात इ.स.१९७० साली झाली. त्याच वेळेस तिच्यात १९६७ साली स्थापन झालेल्या नाट्य अकादमीचा अंतर्भाव करण्यात आला.
गोमंतकीय हे मुळातच नाट्यवेडे मानले गेलेले आहेत. गोव्यात खेडोपाडी दरवर्षी हजारभर नाटके सादर केली जायची. गोवा मुक्तिपूर्वीपासून ही परंपरा चालूच होती. खेड्यातील अक्षरशत्रूसुद्धा सदर नाट्यवेडामुळे मास्तरांकडून म्हणजे दिग्दर्शकांकडून नाटकातील संवाद ऐकून पाठांतर करायचे. खेड्यापाड्यातून सादर होणारी ही नाटके विशेष करून ऐतिहासिकच असायची. त्याचे कारण म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामीत खितपत पडलेल्या गोमंतकीय जनतेमधील स्वातंत्र्याची ऊर्मी हे होते. भाषणस्वातंत्र्यावर बंदी असलेल्या गोव्यात आम्हांला पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे आहे सुद्धा भावना व्यक्त करण्याची संधी स्वातंत्र्यप्रिय गोमंतकीय जनतेला याच नाटकांतून उपलब्ध व्हायची. शिवाजी, संभाजीच्या भूमिकेत शिरून नाट्यवेडा गोमंतकीय पोर्तुगिजांआडचा आपला असंतोष व्यक्त करायचा. फक्त मुख्य भूमिकाच नव्हेत तर मावळ्यांची भूमिकासुद्धा त्यांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण करायची. गोव्यात भरभरून ऐतिहासिक नाटके सादर करण्यामागे गोमंतकीयांचे फक्त नाट्यवेडच नव्हे तर मुक्तिवेडही होते. त्यातूनच एकेकाळी घरोघरी नाट्यकलाकार उपजले जायचे.
गोमंतकीयांचे हेच नाट्यवेड लक्षात घेऊन गोवामुक्तीनंतर गोवा सरकारने नाट्यकलेचा पद्धतशीर विकास घडवून आणण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री वि. सु. करमली यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य अकादमीची स्थापना केली. सदर नाट्य अकादमीने १९६७ च्या फेब्रुवारी महिन्यात नाट्यस्पर्धाही घेतली होती.
१९७० साली झालेल्या कला अकादमीच्या स्थापनेनंतर कला अकादमीतर्फे मराठी नाट्यस्पर्धा घेण्यात येऊ लागल्या. मराठीबरोबरच कोकणी नाट्यस्पर्धाही घेण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे गोवा कला अकादमी मराठी नाट्यस्पर्धेबरोबरच कोकणी नाट्यस्पर्धाही जाहीर करू लागली. परंतु कमीतकमी पाच प्रवेशिका कोकणी विभागात येऊ न शकल्यामुळे स्पर्धा जाहीर होऊनही कोकणी नाट्यस्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. शेवटी कोकणीसाठीचा नियम शिथिल करून प्रवेशिका मर्यादा तीनवर आणण्याचाही प्रयत्न त्यावेळी झाला होता. नंतर मात्र पाच प्रवेशिकाही नाट्यस्पर्धेत येऊ नयेत ही बाब नामुष्कीची आहे असा साक्षात्कार कोकणी भक्तांना झाला आणि १९७५ साली कोकणीच्या चळवळीचा एक भाग म्हणून कोकणी भक्तांनी नाट्यसंस्था स्थापन केल्या. कोकणी नाट्यलेखनास प्रारंभ करण्याबरोबरच इतर भाषांतील नाट्यसंहिता कोकणीत आणण्याचे सत्र सुरू झाले. नंतरच्या काळात दरवर्षी कोकणी नाट्यस्पर्धेच्या प्रवेशिकांत भर पडत गेली. कला अकादमीची कोकणी नाट्यस्पर्धा ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी मराठी नाट्यस्पर्धेची दहा वर्षे पूर्ण झालेली होती. एकेकाळी पाच प्रवेशिकासुद्धा कोकणी नाट्यस्पर्धेला मिळू शकणे कठीण होते. त्याच स्पर्धेत नंतरच्या काळात तीस पस्तीस संस्था सहभागी झाल्याची नोंद अकादमीच्या नोंदवहीत झालेली आहे.
असे असले तरी, इ.स. २०१२ सालापासून कोकणी नाट्यस्पर्धांना ओहोटी लागली आहे. त्या वर्षी स्पर्धेसाठी फक्त चार कोकणी नाटके आली. गोव्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देऊ नये अशी मागणी करणाऱ्या भारतीय भाषा सुरक्षा मंच नावाच्या चळवळीतल्या नेत्यांनी कला अकादमीच्या कुठल्याही स्पर्धेत गोमंतकीय कलाकारांनी सहभागी होऊ नये आणि सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या सदर संस्थांची गोची करावी असे जाहीर आवाहन केल्यामुळे कोकणी नाट्यस्पर्धा बंद पडायची वेळ आली.