गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख | |
---|---|
जन्म | १८ फेब्रुवारी १८२३ गाव- पुणे,राज्य- महाराष्ट्र, देश- भारत. |
वडील | हरी देशमुख |
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लीहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे). मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगिकार करावा असे त्यांनी म्हणले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं
जीवन
सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, - पुणे ऑक्टोबर ९, इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.
इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे.
श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे. [१]
लेखन
रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले. इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.
इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.
मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.
लोकहितवादींचे ग्रंथसाहित्य
- इतिहास : (एकूण १० पुस्तके)
- भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास,१८५१)
- पाणिपतची लढाई (काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
- ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
- ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
- ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
- हिंदुस्थानचा इतिहास - पूर्वार्ध (१८७८)
- गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
- लंकेचा इतिहास (१८८८)
- सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजरातीवरून अनुवादित,१८९१)
- उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
- चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
- पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
- टीप : पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ पृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
- पंडित स्वामी श्रीमद्दयानंद सरस्वती (१८८३)
- पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
- धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
- खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
- गीतातत्त्व (१८७८)
- सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
- स्वाध्याय
- प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
- आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
- आगमप्रकाश (गुजराती, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
- निगमप्रकाश (मूळ गुजराती, इ.स. १८८४)
- राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
- लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
- हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
- स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
- ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
- स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
- समाजचिंतन : (एकूण ५ पुस्तके)
- जातिभेद (१८८७)
- भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
- प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
- कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
- निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
- विद्यालहरी (?)
- संकीर्ण : (एकूण ७ पुस्तके)
- होळीविषयी उपदेश (१८४७)
- महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
- सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
- यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
- पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
- पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तों‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
- शब्दालंकार (१८५१)
- हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
- आत्मचरित्र
- एका दिवसात लिहिलेले पुस्तक
- विचारलहरी
- हिंदुस्थानातील बालविवाह
- लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
- लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
- लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
- निबंध : (एक)
- लोकहितवादींची शतपत्रे : (डाॅ. अ.का. प्रयोळकर यांनी 'लोकहितवादीकृत निबंध संग्रह' या नावाने ह्या शतपत्रांचे पुनःसंपादन करून ती प्रसिद्ध केली आहेत -ललित प्रकाशन)
अन्य सामाजिक कार्य
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्री ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले [२]. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.
त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी ऊर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. गुजरातमध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे वैचारिक उद्बोधनाचे कार्य केले. गुजराथमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते.
गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.
इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.[१]
समाजकार्य
- अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
- हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
- गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
- गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
- गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
- पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
इतर
- अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
- अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बॉंबे
- अध्यक्ष, गुजराती बुद्धिवर्धक सभा
- १८७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
- सन १८८०मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे कौन्सिलचे सदस्य झाले.
पुरस्कार वगैरे
- ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
- १८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.
संदर्भ व नोंदी
- ^ a b फडकुले, निर्मलकुमार. "महाराष्ट्राचे शिल्पकार लोकहितवादी" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. 2016-04-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
- ^ "महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास". 2014-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)