गोपाल नायक
गायक गोपाल नायक यांचा जन्म १२व्या शतकातला. हे देवगिरीच्या रामदेवराव राजाच्या दरबारात एक छंदप्रबंध (ध्रुपद गायनाचे पूर्वस्वरूप) गायक होते.
इ.स. १२९७मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचे राज्य जिंकले तेव्हा त्याने गोपाल नायक यांचे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली. गोपाल नायक सतत सहा दिवस गाणे ऐकवत राहिले. त्यावेळी अल्लाउद्दिनाने आपल्या सिंहासनाखाली अमीर खुसरोला लपविले होते. तिथ बसून अमीर खुसरोने गोपाल नायकाच्या गायन पद्धतीचे ध्यानपूर्वक श्रवण केले. त्यामुळे जेव्हा अमीर खुसरो आणि गोपाल नायक यांच्यांत गायनाची स्पर्धा सुरू झाली तेव्हा अमीर खुसरोने त्याला अडवायला सुरुवात केली. गोपाल नायक गात असलेला राग हा ’मूळ राग’ नसून तो एका फारसी रागावर बेतलेला राग आहे, असे अमीर खुसरो म्हणाला, आणि त्याने तो तथाकथित फारसी राग गाऊन दाखविला. . असे अनेकदा झाल्यावर गोपाल नायक याने आपला पराजय मान्य केला.
गोपाल नायक यांची खरी योग्यता अमीर खुसरो जाणून होता. त्यामुळे त्याने गोपाल नायक आणि असे अनेक गायक दिल्लीला नेले, आणि देवगिरीला जन्मलेले हिंदुस्तानी संगीत उत्तरी भारतात पोहोचले.
१३व्या शतकातल्या आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ शारंगदेव याने लिहिलेल्या ’संगीत रत्नाकर’ या ग्रंथावर टीका लिहिताना ’चतुर कल्लीनाथ’ याने ’ताल-व्याख्ये’च्या संदर्भात गोपाल नायकाचा उल्लेख केला आहे. गोपाल नायक हे एक पखवाज वादकही होते. त्यांनी संगीतातल्या ’देवगिरी बिलावल’ नावाच्या एका रागाची निर्मिती केली.
गोपाल नायक यांनी सुरू केलेली गानपद्धती पुढे किराणा घराणा या नावाने प्रसिद्ध झाली. त्या घराण्याचे पाचव्या पिढीतले गायक अब्दुल करीम खान यांनी किराणा गायकी लोकप्रिय केली.
एक आख्यायिका
गोपाल नायक जेव्हा बैलगाडीने प्रवास करीत तेव्हा बैलांच्या मानेभोवती, त्या त्या वेळेनुसार रागवाचक नाद करणाऱ्या घंटा बांधत असत. त्यामुळे बैलगाडी धावू लागली की त्या विशिष्ट रागातले संगीत ऐकू येई.