Jump to content

गोंदवलेकर महाराज

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मूळ नावगणपती रावजी घुगरदरे (कुलकर्णी)
जन्म१९ फेब्रुवारी १८४५
(माघ शुद्ध द्वादशी, शके १७६६)
गोंदवले (सातारा, महाराष्ट्र)
निर्वाण२२ डिसेंबर १९१३
(मार्गशीर्ष कृष्ण दशमी,
शके १८३५)
गोंदवले (सातारा, महाराष्ट्र)
समाधिमंदिरगोंदवले (सातारा, महाराष्ट्र)
उपास्यदैवतश्रीराम
संप्रदायसमर्थ संप्रदाय
गुरूश्रीतुकामाई (येहळेगाव)
शिष्यश्रीब्रह्मानंद, आनंदसागर
भाषामराठी
साहित्यरचनाप्रवचने, अभंग
प्रसिद्ध वचनजेथे नाम तेथे माझे प्राण। ही सांभाळावी खूण॥
संबंधित तीर्थक्षेत्रेगोंदवले
वडीलरावजी लिंगोपंत कुलकर्णी
आईगीताबाई
पत्नीसरस्वती

जीवन

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ती, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरूच्या शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी त्यांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचात चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरूशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरूशोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला.

या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकारामचैतन्यांकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरूसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. तुकारामचैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रें निर्माण केली.

गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्‍ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरे, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणता येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसे करावे हे शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला.[]

समाधिमंदिर, गोंदवले

शिष्यपरिवार

ब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्यपरिवार सर्वदूर पसरलेला आहे. त्यापैकी काही शिष्य पुढीलप्रमाणे -

गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील काही बोधवचने

श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांसाठी पहा : ब्रह्मचैतन्यमहाराज यांची प्रवचने Archived 2016-06-29 at the Wayback Machine.

रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे.
नामस्मरण 'समजून' करावे. समजून म्हणजे 'राम कर्ता' या भावनेत राहून.
परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे सुद्धा भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे 'नाम' हे होय."
  • व्यवहारदृष्टया माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे; तो परत जातांना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे.
  • दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक! मी पुढे असो वा नसो, मी जे सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो: तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
  • प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या वागण्या मध्ये, नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रींमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेम स्वरूप आहे,आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे होय. म्हणून, नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच.
  • आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन 'मी दुःखी आहे' असे मानून घेतले आहे.
  • ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काहीना काही तरी गाऱ्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गाऱ्हाणे कधी संपत नाही.
  • मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही. साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा.
  • जगाची आशा, आसक्ती, सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राह्ण्याची अत्यंत जरुरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.
  • ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या अधीन होऊ नका. अधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीती प्राणाबरोबर सांभाळा; आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या, इतके नाम तुम्ही सांभाळा.
  • आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यात फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो.
  • दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहण्याऱ्या माणसाला संतांची भेट झाली की ते त्याचे कल्याण करतात.
  • ज्याप्रमाणे एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते.
  • खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे: आपण नामात रहावे, आणि दुसऱ्यास नामास लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये आणि भगवंताला विसरू नये.
  • आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल.
  • भगवत्प्राप्‍तीसाठी एक सुलभ उपाय आहे: भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्‍नी, तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवतो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत्प्राप्‍ती सुलभ होते.

श्रीक्षेत्र गोंदवले

गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.
[१]

गोंदिवलेकर महाराज यांच्यावरील पुस्तके

  1. ^ Empty citation (सहाय्य)