Jump to content

गृहविज्ञान


आर्थिक कुवत, कुटुंबाचा आकार आणि राहती जागा यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधून, नीटनेटकेपणे प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे जीवन काटकसर करून सर्व दृष्टींनी सुखकर व समृद्ध बनविणे ही जशी कला आहे, तसेच ते शास्त्रही आहे. गृहजीवनाच्या या दृष्टीने आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य इत्यादींचा अभ्यास गृहविज्ञानात येतो.

गृहजीवन हे मुख्यतः गृहिणींवर अवलंबून असल्याने गृहिणींसाठी हे शास्त्र आहे. गृहविज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तिविकास, कौटुंबिक स्वास्थ्य, समाजस्वास्थ्य आणि पर्यायाने राष्ट्र हितही साधले जाते. या शास्त्राच्या अनेक संज्ञा प्रचलित आहेत.

गृह विज्ञान हे अनेक शास्त्रांवर आधारित आहे. त्याच्या अभ्यासासाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, शरीर क्रियाविज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शास्त्रांची बैठक आवश्यक आहे. उदा., भौतिकीच्या अभ्यासामुळे गृहव्यवस्थापनात जड व हलक्या वस्तूंची आखणी कशी करावी; शीतपेटी, पंखा वगैरे विद्युत उपकरणांचा वापर कसा करावा इत्यादींची नेमकी माहिती मिळते.

ऐतिहासिक दृष्ट्या गृहशिक्षणाचा प्रारंभ हा कुटुंबसंस्थेइतकाच जुना आहे. सर्वच प्राचीन समाजांत स्त्रियांचे शिक्षण हे गृहक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. आईकडून मुलीला परंपरागत पद्धतीने गृहकृत्यांचे आणि तत्संबंधित इतर जबाबदारीचे शिक्षण मिळत असे. मुलींना विणकामासारख्या हस्तकलांचे शिक्षण दिले जाई. मात्र गृहविज्ञानाचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर शिक्षण आधुनिक काळातच सुरू झाले.


भारतात अखिल भारतीय महिला परिषदेने १९२७ मध्ये ही गरज ओळखली व १९३२ मध्ये दिल्ली येथे ‘लेडी अर्विन कॉलेज’ स्थापन झाले. त्याच्या प्राचार्यपदी श्रीमती ताराबाई सवूर होत्या. बरीच वर्षे भारतात गृहविज्ञानाचे हे एकच महाविद्यालय होते. मद्रास विद्यापीठाने प्रथम गृहविज्ञानातील बी.एस्‌सी. पदवी सुरू केली. १९५१ साली बडोदा येथे गृहविज्ञानाच्या क्षेत्रामधील भारतीय तज्ञांची सभा भरली होती.