गुरमुखी
ब्राह्मी |
---|
ब्राह्मी परिवारामधील लिप्या |
गुरमुखी (ਗੁਰਮੁਖੀ) ही पंजाबी भाषा लिहीण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. ही लिपी ब्राह्मी कुटुंबातल्या शारदा लिपीपासून विकसित झाली. ह्या लिपीचे प्रमाणीकरण शीखांचे दुसरे गुरू गुरू अंगददेव यांनी १६व्या शतकात केले. गुरू ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ गुरमुखी वापरून लिहिला गेला आहे.
आधुनिक भारतीय भाषांतील पंजाबी भाषेची ही लिपी आहे. गुरुमुखातून निघालेल्या धर्माज्ञा लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग करीत असल्यामुळे या लिपीला ‘गुरुमुखी’ वा ‘गुरमुखी’ हे नाव पडले. शीख लोकांचे धर्मग्रंथ याच लिपीत लिहिले जात. पंजाबमध्ये महाजन (व्यापारी) लोकांमध्ये ‘लंडा’ नावाची महाजनी लिपी प्रचलित होती. या लिपीत स्वरचिन्हे नव्हती. त्यामुळे धर्मग्रंथ शुद्ध रीतीने लिहिता-वाचता येत नसत. ही अडचण दूर करण्यासाठी आणि ते धर्मग्रंथ शुद्ध रीतीने लिहिले-वाचले जावेत, म्हणून शीख गुरू अंगद यांनी नागरीप्रमाणे एक स्वरचिन्हयुक्त लिपी तयार केली. या लिपीचे काश्मीरमधील त्यावेळच्या ⇨ शारदा लिपीशी बरेच साम्य आहे. ‘उ, ऋ, ओ, घ, च, छ, ट, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, भ, म, य, श, ष, स’ हे वर्ण वर्तमान शारदा लिपीतील वर्णांशी मिळतेजुळते आहेत, तर ‘ट, ठ, प, म’ या वर्णांचे वर्तमान देवनागरी लिपीतील वर्णांशी साम्य आहे. ‘आ’ काराचा काना उजवीकडे उभा दंड काढून दाखवितात. ऱ्हस्व ‘इ’ व दीर्घ ‘ई’ देवनागरीप्रमाणेच व्यंजनाला अनुक्रमे डावीकडे व उजवीकडे लावीत असून ऱ्हस्व ‘उ’ आणि दीर्घ ‘ऊ’ देवनागरीपेक्षा भिन्न आहेत. ऱ्हस्व ‘उ’ अक्षराच्या खाली एका आडव्या लहान रेघेने, तर दीर्घ ‘ऊ’ अक्षराच्या खाली दोन आडव्या रेघांनी दाखवितात. हाच नियम व्यंजनांतर्गत ‘उ’ आणि ‘ऊ’ लाही लागू आहे. गुरुमुखीतील अंक नागरीवरूनच घेतलेले आहेत. एक ते पाच अंक गुरुमुखी आणि नागरीमधील एकच आहेत; पुढील अंकांत मात्र थोडासा फरक आहे.
संदर्भ
ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.