गीता हरिहरन
प्रसिद्ध भारतीय इंग्रजी साहित्यिका. कादंबरी, कथा, निबंध आणि वृत्तपत्रलेखन या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. भारतीय महानगराच्या पार्शभूमीवर त्यांनी महानगरांच्या निमित्ताने मानवी हतबलतेची, द्वेषाची वैश्विक संवेदनशीलता त्यांच्या लेखनातून प्रकट केली आहे. नवद्दोतर कालखंडात प्रस्थापित सत्तेविरुद्ध आवाज उठविण्याची जी एक चळवळ सुरू झाली आहे. त्यात गीता हरिहरन यांचे नाव घेतले जाते. जन्म कोएम्बतूर येथे. मुंबई आणि मनिला यासारख्या महानगरात त्यांचे बालपण गेले.
तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयातून पदवी प्राप्त केली. संज्ञापन या विषयातून त्यांनी अमेरिकेच्या फेअरफिल्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. अमेरिकेच्या एका वृत्तपत्र संस्थेसाठी लेखन करून त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली. अनेक वर्ष त्या भारतातील महानगरातून मुक्त पत्रकार म्हणून वावरत होत्या.
द थाऊजंट फेसेस ऑफ नाईट (१९९२), द घोस्ट्स ऑफ वासू मास्तर (१९९४), व्हेन ड्रिम्स ट्रव्हल (२००१), इन टाईम्स ऑफ सीज (२००३), फिज्युटिव्ह हिस्ट्रिज (२००९) या कादंबऱ्या ; द आर्ट ऑफ डाईंग (१९९२) हा कथासंग्रह आणि अलमोस्ट होम (निबंधसंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित झाले आहे. सेकंड थॉट नावाचे सदर ते टेलिग्राफ या वृत्तपत्रातून लिहित होत्या.
अमेरिकेतून मद्रासला परत आलेली मुलगी आणि तिची सासू या दोन पात्रांभोवती द थाऊजंट फेसेस ऑफ नाईट या कादंबरीचे कथानक गुंफलेले आहे. भारतीय स्त्रीच्या मनावर लग्न आणि सांसरिक जीवन यासंदर्भातील अनेक पूर्वग्रह आणि आख्यायिका यांचा प्रभाव आहे. यातील एक पात्र या प्रभावातून सुटू पाहणारे आहे तर दुसरे या प्रभावाला प्रतिसाद देणारे आहे. ही कादंबरी भारतातील महिलांच्या जीवनाची एक सूक्ष्म आणि प्रेमळ कहाणी आहे. दंतकथा, भ्रम, प्रथा आणि परंपरा यात गुरफटलेल्या भारतीय महिलांच्या आयुष्यातील सूक्ष्मतम पदर ही कादंबरी उलगडून दाखविते. फिज्युटिव्ह हिस्ट्रिज ही कादंबरी समुदायांमधील तेढ आणि प्रस्थापिततेची अहंकारी भूमिका उलगडणारी भविष्यसूचक कादंबरी आहे.
असद, माला, सारा आणि यास्मिन या चार पात्रांभोवती ह्या कादंबरीचे कथानक गुंफलेले आहे. वेगवेगळ्या शहरात स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना गटातटातील द्वेषाला सामोरे जावे लागते हा या कादंबरीचा विषय आहे. त्यानिमित्ताने जागतिकीकरण, बेरोजगारी, सामाजिक विलगता आणि प्रस्थापित मनोभूमिका ही विचारसूत्रे या कादंबरीत चर्चिले गेले आहेत. निरीक्षण आणि खोल करुणेच्या मांडणीतून त्यांनी आजच्या भारतातील वाढत असलेला द्वेष आणि हिंसा या बाबी या कादंबरीतून चिन्हांकित केल्या आहेत. द घोस्ट्स ऑफ वासू मास्तर ही कादंबरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निवृत्त शिक्षकाची कहाणी विदित करते. अर्थात शिक्षण देण्याघेण्याच्या प्रक्रियेत मानवी जीवनातील तत्त्वज्ञान, त्याची शोधक वृत्ती, त्याच्यातील संकटांना सामोरे जाण्याचे धाडस इत्यादी बाबी या कादंबरीत तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून अभिव्यक्त झाल्या आहेत. शैली आणि प्रतिमा यांची नाविन्यता दर्शविणाऱ्या समकालीन भारतीय जीवनातील वीस कथा त्यांच्या द आर्ट ऑफ डाईंग या कथासंग्रहात आहेत. नवदोत्तरी कालखंड हा द्विअक्षीय संघर्षाचा कालखंड आहे. लिंग जाणीवेतील स्त्री-पुरुष हा संघर्ष, गरीब-श्रीमंत, भांडवलदार-कामगार, पर्यावरण आणि विकास, स्थलांतरित-मूळनिवासी यांसारख्या द्विअक्षीय संघर्षाचे प्रतिबिंब एकूणच गीता हरिहरन यांच्या सर्व प्रकारच्या साहित्यातून शब्दांकित झाले आहे.
गीता हरिहरन यांची विचारक लेखक आणि कृतीशील लेखक अशा ओळख आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये कॉमनवेल्थ लेखक पुरस्कार (१९९७) आणि भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय यांची वरिष्ठ लेखक वृत्ती यांचा समावेश होतो.