Jump to content

गीतरामायण

रामायणातील प्रमुख पात्र.

गीतरामायण (इंग्रजी: The Ramayana in Songs) हा मराठी भाषेतील ५६ गीतमालेचा काव्यसंग्रह आहे, जो भारतीय हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार वर्णन करतो. भारतात दूरदर्शन सुरू होण्याच्या चार वर्षांपूर्वी, १९५५-५६ मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राद्वारे ते प्रसारित केले गेले. ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीतरामायण हे मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. गीतरामायण हे गीत, संगीत आणि गायन यासाठी खूप गाजले. १९५६ या वर्षी माडगुळकरांचे गीतरामायण पुस्तक रुपाने भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.

गीतरामायण हे "मराठी प्रकाश संगीताचा मैलाचा दगड" आणि रामायणाची "सर्वात लोकप्रिय" मराठी आवृत्ती मानली जाते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या गीतरामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला.[]

राम धनुष्य तोडताना.

गीतरचना आणि संकल्पनेचा जन्म

इ.स.१९५४च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. [] गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार इ.स. १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणे' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हापासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.[]

गीत रामायणातील गीतांची रचना छंदवृत्तांमध्ये केली गेली. गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे गीतरामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगाशी किंवा गाण्याशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले- उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी- दशरथा घे हे पायसदान.[] . गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहेत, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे.[]

'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली', 'भावास्तव मी वधिले भावा', 'तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो', 'मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनांतून कल्पनारम्यता; 'फुलापरी ते ओठ उमलती', 'ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनांतून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात []

माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे. या कथाभागात एकूण २७ व्यक्ती येतात. सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.

संगीत

सुधीर फडके (उर्फ, बाबूजी) यांनी भारतीय रागांवर आधारित संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे 'प्रथम गायन' केले. प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली.[]मनसा नारायण यांच्या मतानुसार, मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, यांमुळे जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. एकप्रकारे सुसंस्कार करणाऱ्या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता.[]

मायबोली संकेतस्थळावरील एक लेखक, श्री गजानन यांच्या मतानुसार, गीतरामायणातील आधारभूत रागांची संख्या छत्तीस आहे. त्यातल्या मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, राग भैरवी चार, भीमपलास, मिश्र मांड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत.

२६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.

अमित करमरकर यांच्या मतानुसार, सुधीर फडक्यांना या गीतांच्या संवर्धनासाठी पुढे अनेक वर्षे मिळाली आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मूळ गाण्यांपेक्षा फडक्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित झालेली (१९६५ आणि १९७९) गीते कितीतरी सरस आहेत. निव्वळ सांगीतिक मूल्यांचा विचार करता गीत रामायणातील स्वररचना अत्युच्च दर्जाच्या नाहीत. परंतु त्या काळजाला अशाप्रकारे भिडतात की त्या-त्या प्रसंगासाठी, तो-तो भावार्थ व्यक्त करण्यासाठी त्या केवळ आदर्शच वाटतात. जर ही पदे लिहिताना गदिमा "माध्यम" झाले असतील तर ह्या पदांचे सादरीकरण करताना सुधीर फडके त्या-त्या व्यक्तिरेखा जगले आहेत. सुधीर फडके यांनी ती पदे, ते विचार, ते प्रसंग फक्त रसिकांपर्यंत पोचवले आहेत. मला गाण्यातील किती येते, किती कळते हे घुसडण्याचा अट्टहास केलेला नाही. 'गदिमांचे 'पायसदान' फडक्यांनी अगस्ती ऋषींच्या बाणात रूपांतरित केले आहे. त्यात सेवाभाव आहे, स्वत्वला दिलेली तिलांजली आहे.' []

आपल्या रसग्रहण लेखात अमित करमरकर पुढे म्हणतात, गीतरामायणातील रचना अगदी साध्या आहेत असे नाही. 'शुद्ध सारंग'मधील 'धन्य मी शबरी श्रीरामा' गाऊन बघा. या कडव्यामधील स्वरलगाव आणि कणस्वर फक्त बाबूजीच घेऊ जाणोत. तसेच 'चला राघवा चला'. गदिमांनी त्यात ’ज्या शब्दांनी एका वाक्याची अखेर करायची त्याच शब्दांनी दुसऱ्या वाक्याची सुरुवात' असा प्रयोग केला आहे. पण ते कानांना खटकत नाही. कारण ते ओढून-ताणून केलेले नाही. सहज स्फुरले आहे. []

गीतरामायणातील गीते डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर यांनी गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत.[]

आकाशवाणी प्रसारण

पुण्याच्या आकाशवाणी, केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले.[] १ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी, पुणे ने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण ५६ गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात झाले.[]

प्रयोग

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशांत केले.[]

गीतरामायणातील गीते

१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायण कार्यक्रमात निवेदन पुरुषोत्तम जोशी यांचे होते. प्रसारित गीते आणि त्यात सहभागी झालेल्या गायक-गायिकांची नावे:[]

क्र.गीतरागतालमूळ गायक/गायिकागायक पात्रप्रसारण दिनांकगायन कालावधी (मिनिट.सेकंद)संदर्भ
"कुश लव रामायण गाती" भूपाळीभजनीसुधीर फडकेनिवेदक१ एप्रिल १९५५१०:११
"शरयू-तीरावरी अयोध्या" मिश्र देशकारभजनीप्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडेकुश आणि लव८ एप्रिल १९५५९:४१
"उगा का काळीज माझे उले" मिश्र काफीकेहरवाललिता फडकेकौसल्या१५ एप्रिल १९५५९:१५
उदास का तू?देसभजनीबबनराव नावडीकरदशरथ२२ एप्रिल १९५५८:२३
दशरथा, घे हे पायसदानभीमपलासभजनीसुधीर फडकेअग्नी२९ एप्रिल १९५५७:११
राम जन्मला ग सखेमिश्र मांडजानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर (आणि समूह)समूहगान६ मे १९५५१०.२२
सावळा गं रामचंद्रमिश्र पिलूललिता फडके
ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथाबसंतराम फाटक
मार ही त्राटिका रामचंद्राराग?राम फाटक
१०चला राघवा चलाबिभासचंद्रकांत गोखले
११आज मी शापमुक्त जाहलेराग?मालती पांडे
१२स्वयंवर झाले सीतेचेराग?सुधीर फडके
१४मोडु नको वचनासराग?कुमुदिनी पेडणेकर
१५नको रे जाऊ रामरायाराग?ललिता फडके
१६रामावीण राज्य पदी कोण बैसतोराग?सुरेश हळदणकर
१७जेथे राघव तेथे सीताराग?माणिक वर्मा
१८थांब सुमंता, थांबवि रे रथराग?समूहगान
१९जय गंगे, जय भागिरथीराग?समूहगान
२०या इथे लक्ष्मणा बांध कुटीराग?सुधीर फडके
२१बोलले इतुके मज श्रीरामराग?गजानन वाटवे
२२दाटला चोहीकडे अंधारराग?सुधीर फडके
२३माता न तू वैरिणीराग?वसंतराव देशपांडे
२४चापबाण घ्या करीराग?सुरेश हळदणकर
२५दैवजात दुःखे भरताराग?सुधीर फडके
२६तात गेले, माय गेली, भरत आता पोरकाराग?वसंतराव देशपांडे
२७कोण तूं कुठला राजकुमार?राग?मालती पांडे
२८सूड घे त्याचा लंकापतीयमनयोगिनी जोगळेकर
२९तोडिता फुले मीराग?माणिक वर्मा
३०याचका थांबू नको दारातराग?माणिक वर्मा
३१कोठे सीता जनकनंदिनीराग?सुधीर फडके
३२ही तिच्या वेणींतील फुलेराग?सुधीर फडके
३३पळविली रावणें सीताराग?राम फाटक
३४धन्य मी शबरी श्रीराम!राग?मालती पांडे
३५सन्मीत्र राघवाचा सुग्रीव आज झालाराग?व्ही. एल्. इनामदार
३६वालीवध ना, खलनिर्दालनराग?सुधीर फडके
३७असा हा एकच श्री हनुमानराग?वसंतराव देशपांडे
३८हीच ती रामांची स्वामीनीराग?व्ही. एल्. इनामदार
३९नको करुंस वल्गनाराग?माणिक वर्मा
४०मज सांग अवस्था दूता, रघुनाथांचीराग?माणिक वर्मा
४१पेटवी लंका हनुमंतराग?प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे
४२सेतू बांधा रे सागरीराग?समूहगान
४३रघुवरा बोलता का नाही?राग?माणिक वर्मा
४४सुग्रीवा हे साहस असलेराग?सुधीर फडके
४५रावणास सांग अंगदाराग?सुधीर फडके
४६नभा भेदूनी नाद चाललेराग?प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे
४७लंकेवर काळ कठीण आज पातलाराग?व्ही. एल्. इनामदार
४८आज का निष्फळ होती बाणराग?सुधीर फडके
४९भूवरी रावण वध झालाराग?समूहगान
५०किती य्त्‍ने मी पुन्हां पाहिलीराग?सुधीर फडके
५१लोकसाक्ष शुद्धी झालीराग?सुधीर फडके
५२त्रिवार जयजयकार रामारागसमूहगान
५३प्रभो, मज एकच वर द्यावारागराम फाटक
५४डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझेराग?माणिक वर्मा
५५मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे?जोगियालता मंगेशकर
५६गा बाळांनो, श्री रामायणराग?सुधीर फडके१९ एप्रिल १९५६

मराठी साहित्यातून आणि ग्रंथांतून घेतलेली दखल

गीतरामायणाच्य्या पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशन पुणे आकाशवाणीने केले.[ संदर्भ हवा ] विद्याताई माडगूळकर (गदिमांच्या पत्‍नी) यांनी त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या आत्मचरित्रात विद्याताईंनी गीत रामायण घडतानाच्या काही आठवणींची दखल घेतली आहे.[] गीत रामायणाची निर्मितीचा वेध 'गीत रामायणाचे रामायण' नावाचा ग्रंथ घेतो. त्याचे लेखन आनंद माडगूळकर यांनी केले.[] .अजरामर 'गीत रामायण शब्द-स्वर-स्मृती मधुकोष' हा ग्रंथ अरुण गोडबोले यांनी लिहिला आहे.[]

आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्य सृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबर माडगूळकरांचे नाव देखील. -- कविवर्य बा. भ. बोरकर[ संदर्भ हवा ]

अनुवाद

आजपर्यंत गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगु, मल्याळी, संस्कृत व कोकणी भाषेत अनुवाद झाले आहे. ब्रेल लिपी मध्ये पण ह्याचे अनुवाद प्रकाशीत झाले आहे.[]

बंगाली
कमला भागवत; कलकत्ता येथील अज्ञात कलाकारांनी साकारले.
इंग्रजी
निवृत्त न्यायाधीश उर्सेकर; शेक्सपियरची शैली वापरली.
गुजराती
हंसराज ठक्कर (मुंबई); हंसराज ठक्कर आणि कुमुद भागवत यांनी गायले आहे.
हिंदी
रुद्रदत्त मिश्रा (ग्वालीयर); नागेश जोशी यांनी प्रकाशित केले; वसंत आजगावकर यांनी गायले आहे.
हरि नारायण व्यास; बाळ गोखले यांनी गायले आहे
कुसुम तांबे (मध्य प्रदेश)
बाळ गोखले (बडोदा)

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h "अजरामर गीतरामायण गदिमा, बाबूजी आणि सीताकांत लाड". २९ जून २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ आनंद माडगूळकर डॉट कॉम या संकेतस्थळावर Archived 2016-03-04 at the Wayback Machine. माझे शब्द >> गीतरामायणाचे रामायण >> भाग ३ हा लेख, दिनांक २९ जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनिटांनी जसा दिसला
  3. ^ a b c d e गीत रामायण: गम्य आणि रम्य -लेखक:अमित करमरकर;मटाApr 19, 2013, 01.02AM IST महाराष्ट्र टाइम्स संकेतस्थळावरील[permanent dead link] लेखक:अमित करमरकर यांचे गीतरामायणावरील रसग्रहण जसे दिनांक २९ जून २०१३ भाप्रवे दुपारी १३ वाजून १० मिनिटांनी जसे अभ्यासले
  4. ^ a b c अजरामर 'गीत रामायण शब्द-स्वर-स्मृती मधुकोष लेखक : अरुण गोडबोले; बुकगंगा डॉटकॉम संकेतस्थळावरील मजकूर दिनांक २९/६/२०१३ रोजी भाप्रवे दुपारी १५ .४० वाजता जसा अभ्यासला
  5. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; लेखक गजानन नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13042293.cms?prtpage=1[permanent dead link] गीतरामायण हे चिरंतन टिकणारे वाङ्मय-मटा प्रतिनिधी पुणे मटा संकेतस्थळ वृत्त] दिनांक २९/६/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ११.३० वाजता जसे अभ्यासले

गीतरामायण संकेतस्थळे