गिरिधर स्वामी
समर्थसंप्रदायातील एक संतकवी.[१]
जन्म : निर्देश आढळत नाही
समाधि : इ.स.१७२९, शके १६५१.
समर्थसंप्रदाय
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं मुख्यत्वेकरून धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
गिरिधरस्वामींची गुरुपरंपरा
गिरिधर स्वामी हे समर्थकालीन संतकवी असावेत. त्यांना समर्थांचा सहवास लाभल्याविषयी महाराष्ट्रभाषा भूषण श्री. ज. र. आजगांवकर यांनी 'प्राचीन मराठी संतकवी' या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात उल्लेख केला आहे. गिरिधरस्वामींची गुरुपरंपरा अशी सांगितली जाते -
समर्थ रामदास स्वामी
↓
वेणाबाई
↓
बायजाबाई (बयाबाई)
↓
गिरिधरस्वामी
गिरिधरस्वामींचं मूळ घराणं मिरज-तासगावकडील असून ते गुरुंच्या आज्ञेवरून मराठवाड्यातील 'ईट' या गावी मठ स्थापून राहिले. त्यांच्या जन्मशकाचा निर्देश आढळत नाही. पण समर्थांचा सहवास लाभल्याचं त्यांनी 'समर्थप्रताप' या ग्रंथात त्यांनी निवेदिलं आहे. त्यांचा समाधि शक १६५१ म्हणजे इ.स.१७२९ असा आहे.
गिरिधरस्वामींचे लेखन
गिरिधरस्वामींच्या लेखनावर समर्थ विचारांचानी समर्थ -साहित्याचा फार मोठा प्रभाव आहे. त्यांचं लेखन अक्षरशः प्रचंड आहे. महानुभाव साहित्यिकात ग्रंथसंक्षेप करण्याची किंवा ग्रंथातील विषयाची सूची देणारी रचना करण्याची प्रवृत्ति होती, ती गिरिधरस्वामींमध्येही दिसते. त्यांच्या एकूण चाळीस रचनांपैकी श्रीग्रंथभावार्थ ग्रंथान्वय, श्रीदासबोधमहाराज भावार्थ हे ग्रंथ अशा प्रकारचे आहेत. सहा रचना गुरुशिष्यविषयक आहेत.
श्रीराम हे समर्थसंप्रदायाचे उपास्य दैवत. त्याविषयी काही रचना आहे. समर्थांनी रामायणाचं सुंदरकांडनी युद्धकांड लिहिलं तर गिरिधरस्वामींनी अद्वा, मंगळ, छंदो, सुंदर, संकेत इ. रामायणं लिहिली. ती पाहिली की मोरोपंतांच्या १०८ रामायणांचं स्मरण होतं.
समर्थसंप्रदायांत 'हनुमंनस्वामींच्या बखरी' सारखी बखर लेखनाची परंपरा होती. त्याप्रमाणे गिरिधरस्वामींनी 'हकीकतवाक' लिहिला आहे. 'समर्थप्रताप' हा त्यांचा समर्थचरित्रविषयक ग्रंथ. त्यांच्या श्लोक-पदादी स्फुट रचनेची संख्या सुमारे पंधराशे असावी.
रामोपासनेची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रुपं गिरिधरस्वामींच्या लेखनात आढळतात. आपण सगुण श्रीरामाची उपासना केली की, आपल्याला सर्वचराचरात रामच दिसतो. त्यामुळे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसल्याचं, म्हणजेच आपल्यामध्ये 'अद्वैत' असल्याचं, आपल्याला जाणवतं. हे सांगताना स्वामी म्हणतात -
दृढमनीं रामरूप हे धरिलें दृश्य हेसारिले कैसे पहा
पहा पहा आतां कल्पना संभ्रम राम राम राम राम जाला
राम जाला हा ब्रम्हगाळ हा सकळ येकेक प्रांजळ बोलूं आतां
बोलूं आता लोक मला दिसती राम सीतापती सर्व जाले
सगुणोपासना ही मूलत: निर्गुणोपासना आहे, हा विचार समर्थांच्या सगळ्याच लेखनात आपल्याला आढळतो तयाचं प्रतिबिंब गिरिधरस्वामींच्या लेखनातही उमटलं आहे. त्यांनी आपल्या 'श्रीरामसूद' या ग्रंथात अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे. भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग याप्रमाणंच ज्ञानाचंही महत्त्व लक्षात घेऊन आपण ज्ञानमार्ग कसा स्वीकारावा याविषयी गिरिधरस्वामींनी 'आत्मानुभव' या ग्रंथात पुढील विवेचन केलं आहे -
येकांता वनीउपवनीं एकांत भुवनी ब्रम्हभुवनीं
गुरुदेव सदनी परमात्मसदनी अध्यापन ग्रंथ पहावे
नाना सुमन वाटिका आरामे देवदेवालये एकांत धामें
श्रवण मनन पूर्णकामे अध्यात्म ग्रंथ वाचावे
नाना परोपकाराकारणे सद्गुरुनाथें केले धांवणें
वेदशास्त्रसंमत वचने अध्यात्मग्रंथ विवरावे
हे तिन्ही मार्ग एकारलेले नसावेत तर ते परस्परपूरक असावेत, अशी स्वामींची धारणा आहे.
समाजाच्या विविध स्तरांतील लोकजीवनांचा अत्यंत सूक्ष्म निरीक्षण स्वामींच्या 'लोकस्वभाव' या ग्रंथात प्रकट झाला आहे. त्यातून कुठलाही वर्ण श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो व कोणत्याही वर्णाच्या लोकांनी एकमेकांना दोष न देता सामंजस्यानं सहजीवन व्यतीत करावं अशा प्रकारचं प्रतिपादन स्वामींनी केलं आहे -
जो जो प्राणी जन्मासी आला तो तो देहाभिमानेंचि गेला
त्यामध्ये कोणी विरळा प्रबोध निवळा निवळला
जो तो म्हणे 'आम्ही थोर' कोण पाहे सारासार ?
माझी वर्तणूक परपार पाववी भवाच्या
परपार हेहि नाही मीच अवघा सर्व कांही
साधुसंत कैचें काई कोठून आले?
शुद निंदिती ब्राम्हणास ब्राम्हण निंदिती आणिकास
परस्परे यातीपातीस थोरपणे उडविती
संदर्भ
- ^ "गिरिधर स्वामी : लेखक - डॉ.यू.म.पठाण". २६ जुलै २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
बाह्य दुवे
- [ ]
- [ ]
- [ ]