गावठाण
गावठाण
पूर्वी शेतीवाडी असलेल्या परिसरात एका विशिष्ट भागात राहण्यासाठी जागा राखून ठेवली जात होती आणि तेच गावठाण म्हणून ओळखले जाते. गाव तेथे गावठाण असल्याने प्रत्येक गावात गावठाण असते जेथे बरीच कुटुंबे एकत्र राहत असतात. गावाचे नगर,नगराचे शहर असा विकास होत असतो आणि त्यामुळे गावातील गावठाण नष्ट होत जात असतात. परंतु मुंबई शहरात अद्याप काही ठिकाणी गावठाण शिल्लक आहेत. मुंबईत माझगाव, सांताक्रूझ, वांद्रे भागात अद्यापही गावठाण आहेत.
वांद्रे गावठाण
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकात उतरल्यानंतर पश्चिमेला असलेल्या फलाट क्रमांक एक वरून बाहेर पडले की आपण गावठाणाकडे कूच करतो. साधारण चारशे वर्षांचा इतिहास असलेली चोवीस आळ्या आणि पाखाड्यांची वस्ती येथे आहे. आपण नकळत अगोदरच्या शतकात जाऊ लागतो. ब्रिटिशपूर्व काळात वांद्रे परिसरात कोळी-आगऱ्यांची, खिश्चनांची अनेक गावे होती. माहीम ब्रिटिशांच्या ताब्यात होते.वांद्रे पोर्तुगीजांकडे होते. वांद्रे किल्ला मागे असलेल्या टेकाडाच्या सान्निध्यात मानवी वस्त्या होत्या.अनेक चर्चेस असलेला हा परिसर वसाहतींची बहरला होता. प्रमुख वसाहत ईस्ट इंडियन खिस्ती लोकांची होती.आज चुइम, शर्लि,दांडा,पाली,कांटवाडी, रांवर अश्या अनेक गावांत गावठाण संस्कृती शहरीकरणामुळे हरवली असली तरी आपले अस्तित्व टिकवून आहे.
रांवर गावठाण
ह्या गावठाणातून फेरफटका मारताना आपण ३०० वर्ष भूतकाळात जातो.चिंचोळ्या गल्ल्या, शतकांपूर्वीची एकमेकांना खेटून असलेली घरे, प्राचीन सांस्कृतिक परंपरा, बांधीव रस्ते, कौलारू घरे, चौकांना जोडणारे रस्ते, जागोजागी असणारे क्रॉस या साऱ्यांनी वातावरण भारून टाकते. मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दुकानात ईस्ट इंडियन खाद्य संस्कृतीचे दर्शन होते. जुनी म्हातारी माणसे, त्यांचे कपडे, भाषा आणि बोलण्याची विशिष्ट ढब आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. इथली दुकाने , दुकानातील वस्तू, रस्ते,चौक, क्रॉस, भिंतीवर चितारलेली चित्रे,घरे,घरांचे छज्जे त्यावरील जाळ्या ,माणसे,त्यांची भाषा ,वागणे आणि वावरणे,नेसणे,स्थानिक ख्रिस्ती प्रार्थना स्थळांशी आणि ख्रिस्ती मंदिरांशी असलेले नाते तेथील वातावरण भारून टाकतात.कोळी गावठाणातील मातीत रूजलेले सांस्कृतिक संदर्भ, लोकदेवता आणि पोर्तुगीजपूर्व हिंदू आणि पोर्तुगीज-ब्रिटिश ख्रिस्ती परंपरांचा संगम ठळकपणे दिसून येतो.
संदर्भ
महाराष्ट्र टाईम्स सोमवार २ ऑगस्ट २०२१.