Jump to content

गांधार शैली

पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी "गांधार" नावाने ज्ञात होता. गांधार कला शैली वर ग्रीक कलेचा प्रभाव दिसतो या भागात युरोपीय व पश्चिम आशियातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक व्यापाराच्या व सैनिकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झाले होते.खुद्द ग्रीकांचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्यानंतर ओळीने शक, पल्लव, कुषाण यांची सत्ता प्रस्थापित झाली. येथे आलेल्या कलाकारांना राजसभेत आश्रय दिला गेला. या कलाकारांनी कलाविषयक तंत्र आणि कौशल्ये यासंबंधी धार्मिक व सांस्कृतिक कल्पनाही आपल्या बरोबर आणल्या होत्या. या रुढी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधार शिल्पात प्रतिबिंबीत झाल्या. मूर्तिकामाचा आशय पूर्णपणे भारतीय परंतु अभिव्यक्तीची शैली अभारतीय म्हणजेच गांधार शैली. गांधार देशात महायान पंथाचा प्रसार प्रामुख्याने झाल्याने या शैलीत बुद्धमूर्ती घडविण्यात आल्या असे दिसते.

संदर्भ व नोंदी

१. प्राचीन कलाभारती , माटे म. श्री.