गांधारी
character in the Hindu epic Гандхари с завязанными глазами поддерживает Дхритараштру (когда тот стал совсем стар и немощен, из-за чего решил уйти в лес) и следует за Кунти | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | महाभारतातील व्यक्तिरेखा | ||
---|---|---|---|
येथे उल्लेख आहे | |||
| |||
गांधारी ही मूळची गांधार (म्हणजे हल्लीचा अफगाणिस्तान) या देशाची राजकन्या होती. (म.आदिपर्व ९०.६१). गांधार देश भारताच्या वायव्य दिशेला होता. त्याची तक्षशिला ही राजधानी होती. आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे. बाल्यकाळातच गांधारीने रुद्राची आराधना करून शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते. हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी तिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता (म.आ.१०३. ९-१०).
यथावकाश, महाभारतातील पितामह भीष्म यांनी [गांधार|गांधारच्या]] सुबल नावाच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि कन्या गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुनीला पसंत पडला नाही. गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्राच्याप्रमाणेही स्वतःलासुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य व्यतीत केले.
महाभारतात अन्यत्र हिला द्वैपायन व्यासाच्या आशीर्वादानें शंभर पुत्र प्राप्त झाल्याचा निर्देश आढळतो. (म.आ.१०७.७-८).
हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता असलेली गांधारी ही गांधार देशाधिपती सुबल राजाची कन्या असली तरी ती दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती, असे म्हणतात (म.आ.६१९८). एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात तिचे स्वभावचित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे तिच्या मनाची झालेली तडफड महाभारतात अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे.
आख्यायिका
गांधारी ही महाभारतातील १०० पुत्रांची व एका कन्येची माता होती. मुळात तिने केवळ एका मासांच्या पिंडाला जन्म दिला होता. परंतु व्यासांनी या पिंडाचे १०१ तुकडे करून ते एका तुपाच्या रांजणात ठेवण्यास सांगितले व १०१ कौरवांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. सर्वप्रथम दुर्योधन जन्माला आला त्यानंतर दुःशासन व इतर कौरवांचा जन्म झाला. सरतेशेवटी कन्या दुःशीलाचा जन्म झाला.
गांधारीला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने तिने आपला अपुऱ्या दिवसांचा गर्भ बाहेर काढला. त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड तिला पुत्र म्हणून प्राप्त झालला, आणि ती शोकातिरेकाने रडू लागली. गांधारीची ही अवस्था पाहून व्यासांस दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करून ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. काही काळाने तिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे तिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले (म.आदिपर्व भा.१०७१०-१४). कन्याप्राप्तीची तिची इच्छाही व्यासांनी तिला दुःशला नामक कन्या प्रदान करून पुरी केली (म.आ.१०७.३७).
गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. कौरवांची वागणूक खलनायकाप्रमाणे असली तरी महाभारतात गांधारीची वर्तणूक अतिशय सालस व धार्मिक होती. ती नेहेमी धृतराष्ट्र व आपले पुत्र यांना राजधर्म व चांगल्या वागणुकीसाठी बोलत असे. पांडवांचे कौरवांशी कितीही टोकाचे वैर असले तरी त्यांना गांधारीच्या बाबतीत परम आदर होता. द्रौपदी वस्त्रहरणाचे हीन काम चालू असताना सर्व कुरुसभा चिडीचूप होती त्यावेळेस केवळ गांधारीनेच येऊन मध्यस्थी केली व निर्वेध चाललेले वस्त्रहरण बंद पाडले. तिने धृतराष्ट्राला स्त्रीच्या शापापासून होणाऱ्या नुकसानाची कल्पना दिली व द्रौपदीला मानसन्मान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
हितकारक उपदेश
- दुर्योधनाने पांडवांशी अकारण वैर सुरू केल्यानंतर गांधारीने त्यास नानापरीने समजाविण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाच्या दुष्ट आणि मत्सरी स्वभावाबद्दल, तसेच द्रौपदी-वस्त्रहरणप्रसंगीच्या त्याच्या ओंगळ वर्तनाबद्दल तिने त्याची स्पष्ट शब्दात कान उघाडणी केली (म.उ.१२७). परंतु धृतराष्ट्राच्या द्विधा आणि कमकुवत मनोवृत्तीमुळे तिचा नाइलाज झाला . पांडवांना वनातून बोलावून आणून त्यांना अर्धे राज्य देण्याचा तिचा प्रयत्नही या कारणानेच निष्फळ ठरला (म.उ.१२७-१२८). म्हणूनच संभाव्य युद्धाला धृतराष्ट्र हाच जबाबदार असल्याची स्पष्टोक्ती गांधारीने त्याला ऐकविली होती (म.उ.१२७.१०-१५).
भारतीय युद्धानंतर
- या युद्धामध्ये झालेल्या आपल्या पुत्रांच्या संहाराने गांधारी दुःखाने वेडीपिशी बनली. दुर्योधनाच्या निर्घृण वधाबद्दल, तसेच दुःशासनाच्या मांडीतील रक्त पिण्याच्या अघोरी कृताबद्दल तिने भीमास नानापरीने दूषणे दिली. ‘दुःशासनाचे रक्त आपले दात आणि ओठ यांच्या आत गेले नाही,’ या भीमाच्या पोरकट उत्तरांनी तिचा संताप अधिकच वाढला (म.स्त्री.१४.१४). तिच्या नजरेला नजर देण्याचे युधिष्ठिर टाळू लागला. तेव्हा तिने एक जळजळीत दृष्ष्टिक्षेप त्याच्या पायाच्या नखांवर टाकला. त्यायोगें ती काळीठिक्कर पडली (म.स्त्री.१५.७). आपल्या मृत पुत्रांसाठी शोक करणाऱ्या द्रौपदी आणि कुंतीचे तिने सांत्वन केले (म.स्त्री.१५.१७). तिचे परोपरीने सांत्वन करू पाहणाऱ्या कृष्णाला तिने धुडकावून लावले. रणभूमीतील स्वपुत्रांची छिन्नविच्छिन्न झालेली प्रेते त्यास दाखवून या सर्व अनर्थास कृष्ण हाच जबाबदार असल्याचे त्यास परखडपणे सुनावले, आणि छत्तीस वर्षाच्या आत त्याचा संपूर्ण कुलक्षय होण्याचा शाप त्याला दिला.गांधारीच्या क्रोधाच्या या आवेगामुळे कृष्ण गांगरून गेले. आपला कुलक्षय होणार असल्याचे आपणांस अगोदरपासूनच ठाऊक आहे, असे म्हणून त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला (म.स्त्री.२६.४१-४३). परंतु यादवांच्या महाभयानक संहारसत्राच्या वेळी तसेच स्वतःच्या निर्याण प्रसंगी पतिव्रता गांधारीची शापवाणी त्यास पुन्हा आठवली (म.मौ.५.२१; कृष्ण १ पहा).
मृत्यू
- युद्धसमाप्तीनंतर गांधारी आणि धृतराष्ट्र पांडवांसमवेत हस्तिनापुरी राहू लागले. सुस्वभावी युधिष्ठिर गांधारीची सर्वतोपरी काळजी घेत असे. परंतु भीम मात्र तिला एकसारखे उणेदुणे बोलून तिच्या पूर्वदुःखाच्या स्मृती ताज्या करीत असे. भीमाच्या या अशिष्ट वर्तनाने तिच्यात वैराग्य उत्पन्न झाले आणि ती, धृतराष्ट्र, कुंती आणि विदुर यांच्यासमवेत वनात गेली. तेथे व्यासाने तिला, कुंतीला आणि धृतराष्ट्राला मृत पुत्रांचे दर्शन घडविले (म.आश्र.४०). तदनंतर गंगाद्वारानजीकच्या वनामध्ये लागलेल्या दावानलात गांधारी, धृतराष्ट्र आणि कुंती एकत्र जळून भस्म झाले. (म.आश्र.४५; भा. १.१३.२७; ९.२२-२६)
गांधारीविषयी लिहिली गेलेली पुस्तके
- गांधारी (हिंदी, लेखक - कृष्णेश्वर डींगर)
- गांधारी (लेखिका - सरोजिनी शारंगपाणी)
- गांधारी की आत्मकथा (हिंदी, लेखक - मनु शर्मा)
- महासती गांधारी (भास्कर महाजन)
- मी... गांधारी (सुधाकर शुक्ल)
- सत्यप्रिय गांधारी (डॉ. सुमती क्षेत्रमाडे)