Jump to content

गांडूळ

गांडूळ

गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा उभयलिंगी प्राणी आहे. हा ॲनेलिडा (वलयी) संघाच्या कीटोपोडा वर्गातील ऑलिगोकीटा गणातील प्राणी आहे. गांडुळाच्या अनेक जाती आहेत. यांपैकी फेरेटिमा पोस्थ्यूमा ही जाती भारतभर मुबलक आढळते, म्हणून हिचा उपयोग प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी केला जातो. पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी सु. १५ सेंमी. असते. ऑस्ट्रेलियात सापडणाऱ्या मेगॅस्कोलेक्स गांडुळाची लांबी जवळजवळ ३ मी. असते. जैव (सेंद्रिय) पदार्थ व आर्द्रता असलेल्या मातीत हे आढळतात.

हे दंडगोलाकार असून दोन्ही टोकांकडे, विशेषतः अग्र टोकाकडे, निमुळते होत जातात. शरीराचे खंडीभवन (खंड किंवा भाग पडणे) झालेले असून १००–१२० समखंड (सारखे दिसणारे खंड) असतात. १४, १५ व १६ या खंडांभोवती ग्रंथिमय ऊतकाची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाची) झालेली पर्याणिका (त्वचेचा फुगलेला ग्रंथिमय भाग) असते.

मुख व गुदद्वार यांशिवाय शरीरावर एक स्त्रीजनन-रंध्र, दोन पुंजनन-रंध्रे व शुक्र-ग्राहिका-रंध्रांच्या (शुक्राणू साठविण्याकरिता असलेल्या पिशवीच्या बाहेरच्या छिद्रांच्या) चार जोड्या असतात. प्रत्येक खंडाभोवती मध्यावर कायटिनी (कायटीन नावाच्या पदार्थाच्या बनलेल्या) शूकांचे (लहान, राठ व ताठ केसांसारख्या रचनांचे) एक वलय असते. पहिले १२ खंड सोडून सर्व खंडांच्या मध्यपृष्ठभागावर देहगुहेला (शरीराच्या पोकळीला) जोडलेली सूक्ष्म छिद्रे असतात. देहगुहेचे पटांमुळे (पडद्यांमुळे) खंडीभवन होते. आंतरिक व बाह्य खंडीभवन हे एकमेकांशी जुळणारे असते.

मुख, मुखगुहिका (तोंडाची पोकळी), ग्रसनी (मुखगुहेच्या लगेच मागे असणारा अन्ननलिकेचा स्‍नायुमय भाग), ग्रसिका (ग्रसनीपासून आंत्रापर्यंतचा आहारनालाचा भाग), पेषणी (अन्न बारीक करणारे साधन), आंत्र (आतडे), मलाशय (आहारनालाचा अखेरचा भाग) व गुदद्वार हे पचन तंत्राचे (पचन संस्थेचे) प्रमुख भाग होत. सव्विसाव्या खंडापासून गुदद्वाराच्या अलीकडील तेवीस ते पंचविसाव्या खंडांपर्यंत आंत्रवलन (आंत्राच्या गुहिकेत गेलेली आंत्रभित्तीची पृष्ठीय, मध्य व अनुदैर्घ्य दुमड) असते.

श्वसन त्वचेमार्फत होते त्यासाठी त्वचा ओलसर असावी लागते. रक्ताचा रंग लाल असतो. परिवहन तंत्रात (रुधिराभिसरण संस्थेत) पृष्ठीय रुधिरवाहिनी, अधर रुधिरवाहिनी व अधस्तंत्रिका वाहिनी (तंत्रिकारज्‍जूच्या म्हणजे मज्‍जारज्‍जूच्या खाली असणारी वाहिनी) या प्रमुख वाहिन्या आणि पार्श्व व पार्श्वांत्रीय (आतड्याच्या बाजूला असलेली) हृदये हे मुख्य भाग आहेत.

उत्सर्जन तंत्र हे पटीय (देहगुहेतील पटांशी निकट संबंध असलेल्या), अध्यावरणी (देहभित्तीच्या आतील पृष्ठाला चिकटलेल्या) व ग्रसनीय (ग्रसनीभोवती असणाऱ्या) वृक्ककांचे (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या नळीसारख्या इंद्रियांचे) झालेले असते. वृक्कक कुंडलित (वेटोळी पडलेले) असून प्रारूपिक (नमुनेदार) वृक्ककाचे एक टोक देहगुहेत व दुसरे त्वचेवर उघडते.

तंत्रिका तंत्राचे (मज्‍जासंस्थेचे) केंद्रीय (मध्यभागी असलेले) तंत्रिका तंत्र व परिघीय (मध्यापासून दूर असलेले) तंत्रिका तंत्र असे दोन भाग पडतात. केंद्रीय तंत्रिका तंत्र ग्रसनीच्या वर असलेली गुच्छिकांची (तंत्रिका कोशिकांच्या समूहांची) एक जोडी, परिग्रसनी (ग्रसनीच्या भोवती असलेल्या) संयोजकांची (जोडणाऱ्या तंत्रिकांची) एक जोडी, अधोग्रसनी (ग्रसनीच्या खाली असणाऱ्या) गुच्छिकांची एक जोडी व अधर तंत्रिकारज्‍जू यांचे झालेले असते. गुच्छिका व संयोजकांपासून सर्व शरीरभर जाणाऱ्या तंत्रिका निघतात. या तंत्रिकांचे परिधीय तंत्रिका तंत्र झालेले असते.

हा प्राणी उभयलिंगी (द्विलिंगी) आहे पण तरीही स्वनिषेचन (एकाच व्यक्तीच्या शरीरातील शुक्राणू व अंडी यांचा संयोग) आढळत नाही. वृषणांच्या (शुक्राणू उत्पन्न करणाऱ्या इंद्रियांच्या) दोन जोड्या असतात. अंडाशयांची (अंडी उत्पन्न करणाऱ्या इंद्रियांची) एक जोडी असते. अंड्यांचे निषेचन (फलन) कोकूनमध्ये (अंडी व शुक्राणू आत बंद करून ठेवणाऱ्या कोशामध्ये) होते. कोकूनमध्ये एका वेळी एकाच अंड्याचे परिवर्धन (विकास) होते. गांडूळ पावसाळ्यात अंडी घालते आणि कोकून जमिनीवर टाकते. एका कोकूनमध्ये कित्येक अंडी असतात. पिले जमिनीत जातात. गांडूळाची विष्ठा सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त असून ते अमोनियम सल्फेटाच्या तोडीचे आहे. ईजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यातील जमीन अशा खताने सुपीक करण्यात आली आहे.

गांडुळाच्या माती खाऊन जमिनीच्या आत बिळे करून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे शेतातील जमीन भुसभुशीत होते. जमिनीतून हवा खेळती राहून पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते आणि पिकांची वाढ चांगली होते. हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानात ते सुमारे २ मी. खोलीपर्यंत जमिनीत आढळतात. मातीतील वनस्पतींचे अवशेष हे गांडुळाचे मुख्य अन्न आहे. गांडुळाने विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकलेल्या मातीमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजन पाच पट, सल्फर सात पट, पोटॅशियम अकरा पट, तर मँगॅनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये दुपटीने जास्त असतात. ही विष्ठा जमिनीतील पिकांना सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त आहे. गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून इतर काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचाही उपयोग पिकांच्या वाढीसाठी होतो. मृत झालेल्या गांडुळाच्या शरीराचा देखील खत म्हणून उपयोग होतो. त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते.

लुम्ब्रिसिडी कुलातील ईसेनिया फेटिडा (Eisenia fetida) ही मूळ युरोपातील गांडुळाची जाती गांडूळ खत प्रकल्पासाठी भारतात मुद्दाम आयात केली जाते. जमिनीच्या पृष्ठभागालगत त्याचा वावर असतो. त्यामुळे साखर कारखान्याची मळी, कुजण्यायोग्य पाने, ऊस गाळल्यानंतरचे अवशेष इत्यादिंपासून गांडूळ खत बनविण्यासाठी ही जाती उपयुक्त आहे. त्यामुळे ४० ते ६० दिवसांत सेल्युलोजचे उत्तम खतामध्ये रूपांतर होते. या जातीच्या तांबड्या रंगामुळे या गांडुळाचे नाव ‘ब्लड वर्म’ असे पडले आहे. त्याची व्यवस्थितपणे हाताळणी केल्यास त्याच्या त्वचेमधून घाणेरडा वास सोडला जातो. त्यावरून तिचे नाव फेटिडा असे पडले आहे. म्यानमार, युगांडा व भारतात पाणी विरहित स्वच्छतागृहांमधील मलकुंडामध्ये (Septic tank) या गांडुळाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकाराच्या गांडुळांच्या जातीचा समावेश मेगॅस्कोलेक्सिडी (Megascolecidae) कुलात केला जातो. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या मेगॅस्कोलेसीड ऑस्ट्रॅलिस (Megascolides australis) या गांडुळाची लांबी जवळजवळ ३ मी. असून हे जगातील सर्वांत मोठे गांडूळ आहे. महाराष्ट्रात मेगास्कोलेक्स कोकनेंसिस (Megascolex kokanensis) आणि बॅरोगॅस्टर प्रशाडी (Barogaster prashadi) या दोन जातींची मेगॅस्कोलेक्सिडी कुलात नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट वनांमध्ये जाड गांडुळासारखे दिसणारे देवगांडूळ आढळते. परंतु, ते उभयचर वर्गाच्या अपोडा (Apoda) गणातील असून त्याचा गांडुळाशी कसलाही संबंध नाही.

गांडुळाच्या शरीरात असलेल्या रक्त द्रवातील (Plasma) हिमोग्लोबिनमुळे त्याचा रंग तांबडा दिसतो. फेरेटिमा पोस्थ्यूमा या गांडुळाचा रंग लाल-तपकिरी वा मातकट असतो. यूरोपमध्ये आढळणाऱ्या लुम्ब्रिकस टेरेस्ट्रिस (Lumbricus terrestris) या जातीचा रंग लालसर तपकिरी, ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या मेगॅस्कोलेसीड ऑस्ट्रॅलिस या जातीचा रंग निळसर करडा, तर ग्रेट ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या अलोलोबोफोरा क्लोरोटिका (Allolobophora chlorotica) ही जाती हिरव्या रंगाची असते.

गांडुळामध्ये ऐकण्याची किंवा पाहण्याची क्षमता नसते. परंतु, ते प्रकाश आणि कंपनांच्या बाबतीत संवेदनशील असतात. तसेच गांडुळामध्ये पुनर्जननाची (शरीराचा नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची) क्षमता असते.

गांडूळ हे अनेक पक्षी आणि प्राण्यांचे खाद्य आहे. मासेमारीसाठी त्याचा आमिष (Fish bait) म्हणून वापर करतात, त्यामुळे त्याला एंजेल वर्म (Angle worm) असेही म्हणतात. गांडुळाचे आयुष्य सर्वसाधारणपणे ३—१० वर्षांचे असते.

गांडूळात पुनर्जननाची (शरीराचा नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची) क्षमता असते. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रूपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत हवा खेळती राहते. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात. गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.

संदर्भ