Jump to content

गनिमी कावा


गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.

शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला.

गनिमी कावा म्हणजे काय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ असे आहेत. 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला.

मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठ्यांचा शत्रू असा अर्थ निघतो.

मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले! 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरुदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वतःचे असे युद्धतंत्र विकसित केले होते, याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.

'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणाऱ्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

'महाराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत.त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : २. लुच्चेगिरी, ३. गुप्तकट, ४. हुलकावणी आणि ५. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.

कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे.पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणाऱ्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते.तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो.मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणाऱ्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.

प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तीने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच छत्रपती शिवाजी महाराज उद्दिष्ट होते.

गनिमी काव्याचे घटक

यात :

  • १. नियोजन व अंमलबजावणी
  • २. समन्वय आणि नियंत्रण

या प्रमुख गोष्टी आहेत.त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे.

गनिमी काव्याचे हेतू

  • १. शत्रूला घाबरविणे किंवा दहशत बसविणे.
  • २. त्याचे मानसिक खच्चीकरण
  • ३. आर्थिकदृष्ट्या शत्रूला अपंग करणे
  • ४. कोंडीत पकडणे.
  • ५. अशी परिस्थिती तयार करणे ज्याने तो शरण येण्यास बाध्य होईल.
  • ६. शत्रूला लढाई मैदान सोडून पळून जावयास लावणे.
  • ७. शत्रुसैन्याची फळी विस्कळीत करणे.
  • ८. त्याला फसविणे.
  • ९. चुकीची माहिती मुद्दाम पुरविणे.
  • १०. त्याची दिशाभूल करणे
  • ११. शत्रूला बेसावध करणे.
  • १२. आपण दुर्बल आहोत किंवा आपल्यात लढाईची हिम्मत नाही असे भासविणे.
  • १३. शरण येण्याची बतावणी करून एकदम आघात करणे.
  • १४. शत्रूला पाठलाग करावयास भाग पाडणे.
  • १५. लढाईचे क्षेत्र आपल्यास अनुकूल असे निवडून शत्रूला कसेही करून तेथे नेणे.
  • १६. शत्रूचे नुकसान करून दरारा निर्माण करणे.
  • १७. म्होरक्यास ठार करणे, ज्याने शत्रुसैन्यात गोंधळ माजतो.

विसाव्या व एकविसाव्या शतकातील गनिमी युद्धे

आफ्रिका

  • ॲंगोलन यादवी युद्ध
  • दारफूर संघर्ष
  • आयवोरियन यादवी युद्ध
  • ऱ्होडेशियन बुश युद्ध
  • सुदान
  • तुआरेगचे उठाव
  • पश्चिम सहारा युद्ध

आशिया

युरोप

  • कोसोव्हो युद्ध

संदर्भ

  • "राजा शिवछत्रपती", लेखक : ब. मो. पुरंदरे
  • "शिवकालीन राजनीती आणि रणनीती" या पुस्तकातून साभार